
‘संकर्षण via स्पृहा’ या कवितांच्या कार्यक्रमानिमित्त अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि संपूर्ण टीम अमेरिकेला गेली होती. जवळपास महिनाभर अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरात ‘संकर्षण via स्पृहा’ कार्यक्रमाचे प्रयोग झाले. या प्रयोगांदरम्यानचे अविस्मरणीय अनुभव संकर्षणने सोशल मीडियावर शेअर केलेत. यातलाच एक अनुभव म्हणजे संकर्षणच्या शाळेतल्या मराठीच्या बाई त्याला अमेरिकेत भेटल्या. यावेळी त्यांनी संकर्षणला खास बक्षीस दिलं. हा अनुभव शेअर करताना, कार्यक्रमानंतर प्रेक्षकांना भेटण्यासाठी तसा मी शांत उभा असतो पण, शाळेतील जपेबाई समोर आल्या तेव्हा खरंच भिती वाटली…, असं संकर्षणने म्हटलं आहे.
माझ्या शाळेच्या “मराठीच्या बाईंनी मला बक्षीस दिलं हो…”😭
माझ्या परभणीतल्या शाळेत मला मराठी शिकवायला ह्याच जपे बाई होत्या … नेहमि मला वर्गात ऊठवायच्या आणि
“कऱ्हाडे ; धडा वाच … कऱ्हाडे , अक्षर अतीशय घाण आहे…,
तुझं ऱ्हस्वं दीर्घ कधी सूधरणार …??? असं म्हणायच्या…
पोरांना शिकायचा कंटाळा आला (जो नेहमिच आलेला असायचा) कि, “कऱ्हाडे … गाणं म्हण” असं म्हणायच्या… आज त्याच माझ्या मराठीच्या बाई कवितांच्या कार्यक्रमाला अमेरिकेत आल्या आणि मला कवितांसांठी बक्षीस दिलं … मला खूप भरून आलं…
प्रेक्षकांना भेटतांना तसा मी शांत ऊभा असतो पण , बाई भेटायला आल्या आणि मला खरंच भिती वाटली…
माझी आज शब्दांशी “जर मैत्री असेल” … तर ती बाईंनीच करून दिलीये…
हे नातं तेंव्हाचं आहे जेंव्हा शाळेतल्या बाईंना “बाईच” म्हणायचो..
समजा शाळेतले गुरूजी … भाजी मंडईत जरी दिसले तरी भिती वाटायची… आणि घाबरून चालत्या सायकल वरून ऊडी मारायचो…
अभ्यासात मी कधीच हूशार नव्हतो त्यामुळे तेंव्हा बक्षीस मिळवून घरी पळत जाउन आई बाबांना ते आनंदाने सांगण्याचं सुख कधी मिळालं नाही… पण आज सांगतो आई बाबांना , बायको आणि माझ्या छोट्या मुलांनाही कि ; “माझ्या बाईंनी मला बक्षीस दिलं”
‘संकर्षण via स्पृहा’ या कवितांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे कविता सादर करतात. या दोघांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळतोय. रसिक या कार्यक्रमाचा प्रेक्षक मनमुराद आनंद लुटत असतात. नुकतंच या कार्यक्रमाचे अमेरिकतेच प्रयोग झाले.