Dadasaheb Phalke Award Winner : दिग्गज कन्नड अभिनेते अनंत नाग यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
दिग्गज अभिनेते अनंत नाग यांना यंदा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अवॉर्ड सिलेक्शन कमिटीच्या शिफारसीनंतर केंद्र सरकारने अनंत नाग यांची निवड केली.

Dadasaheb Phalke Award 2024 Winner : केंद्र सरकारकडून 2024 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्याच्या नावाची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने, दादासाहेब फाळके पुरस्काराच्या निवड समितीच्या शिफारशीनुसार, दिग्गज कन्नड अभिनेते अनंत नाग यांना यंदा पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत नाग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ही घोषणा होताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनंत नाग यांचे पुरस्काराबद्दल अभिनंदन केलं.
दिग्गज अभिनेते अनंत नाग यांनी त्यांच्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं. आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवत त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. 22 सप्टेंबर 2026 रोजी 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यादरम्यान अनंत नाग यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. गुजरातमधील केवडिया येथील एकता नगर येथे हा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
🎬THE DADASAHEB PHALKE AWARD 2024 GOES TO…
Shri ANANT NAG
On the recommendation of the Dadasaheb Phalke Award Selection Committee, the Government of India is pleased to announce that the Actor will be conferred the prestigious Dadasaheb Phalke Award 2024 for his contribution… pic.twitter.com/3WKnWZDGs0
— PIB India (@PIB_India) September 16, 2026
पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी अनंत नाग यांचं नाव जाहीर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पोस्ट करत नाग यांचं अभिनंदन केलं. ” दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल दिग्गज अभिनेते अनंत नाग जी यांचं हार्दिक अभिनंदन. अनेक दशकांपासून आपल्या सहजसुंदर अभिनयाने, उत्कृष्ट अभिनयकौशल्याने आणि अष्टपैलू प्रतिभेने त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर, विशेषतः कन्नड चित्रपटसृष्टीवर, खोलवर प्रभाव पाडला आहे. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेत एक वेगळी खोली आणि वास्तवतेची झलक पाहायला मिळते” असं प्तप्रधान मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं.
ದಾದಾಸಾಹೇಬ್ ಫಾಲ್ಕೆ ಪ್ರಶಸ್ತಿಯಿಂದ ಪುರಸ್ಕೃತರಾದ ಪ್ರಸಿದ್ಧ ನಟ ಅನಂತ್ ನಾಗ್ ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳು.
ಕಳೆದ ಹಲವು ದಶಕಗಳಿಂದ, ಅವರ ಸಹಜ ಅಭಿನಯ, ಗಮನಾರ್ಹ ವೈವಿಧ್ಯತೆ ಹಾಗೂ ಶ್ರೇಷ್ಠ ಕಲಾಪ್ರತಿಭೆಯು ಭಾರತೀಯ ಚಲನಚಿತ್ರರಂಗದಲ್ಲಿ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಕನ್ನಡ ಚಿತ್ರರಂಗದಲ್ಲಿ, ಅವಿಸ್ಮರಣೀಯ ಛಾಪನ್ನು ಮೂಡಿಸಿವೆ. ಅವರು ಅಭಿನಯಿಸಿದ ಪ್ರತಿಯೊಂದು… https://t.co/2jimAZM16T
— Narendra Modi (@narendramodi) September 16, 2026
कोण आहेत अनंत नाग ?
अनंत नागरकट्टे, त्यांना चित्रपटसृष्टीत अनंत नाग या नावाने ओळखलं जातं. 4 सप्टेंबर 1948 रोजी कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिराली येथे त्यांचा जन्म झाला. मुंबईत शिक्षण घेत असताना त्यांची अभिनयातील आवड वाढत गेली. 1960 च्या दशकाच्या अखेरीस कन्नड, कोंकणी, मराठी आणि हिंदी नाटकांमधून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. रंगमंचावरील त्यांच्या अभिनयाने लवकरच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी रंगभूमीवरील अनंत नाग यांच्या अभिनयाची प्रतिभा ओळखली. 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंकुर’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर 1970 आणि 1980 च्या दशकातील समांतर सिनेमातील ते एक परिचित नाव बनलं. श्याम बेनेगल यांच्या ‘निशांत’, ‘मंथन’ आणि ‘भूमिका’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या.
‘मालगुडी डेज’ मुळे घराघरांत पोहोचलं नाव
अनंत नाग यांच्या कारकिर्दीत ‘मालगुडी डेज’ या मालिकेचेही विशेष स्थान आहे. आर. के. नारायण यांच्या कथांवर आधारित या लोकप्रिय दूरदर्शन मालिकेचे दिग्दर्शन त्यांचे धाकटे बंधू शंकर नाग यांनी केलं होतं. या मालिकेमुळे ते घराघरांत पोहोचले, नाग यांना देशभरातील प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख मिळाली. बदलत्या काळानुसार त्यांनी नव्या पिढीच्या सिनेमातही आपली उपस्थिती कायम ठेवली. ‘गोधी बन्ना साधारण मायकट्टू’, ‘सरकारी हिरिया प्राथमिक शाले’, ‘777 चार्ली’ आणि ‘केजीएफ: चॅप्टर 1’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.
भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी अनंत नाग यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे, 2025 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्याव्यतिरिक्त नेक वेळा कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर अवॉर्ड्स साऊथ पुरस्कारही जिंकले.