Kavya Maran- Anirudha Wedding: अनिरुद्धच्या लग्नाची 10 वर्षांपूर्वीच झाली होती भविष्यवाणी? आता IPL टीम मालकीणसोबत थाटणार संसार
Kavya Maran- Anirudha Wedding: प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन यांच्या लग्नाची दहा वर्षांपूर्वीच भविष्यवाणी झाली होती, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबाद संघाची सीईओ काव्या मारन यांच्या लग्नाच्या चर्चांनी सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलं आहे. या चर्चांदरम्यान अनिरुद्धचा एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे, या व्हिडीओमध्ये एका टॅरो कार्ड रीडरने अनिरुद्धच्या होणाऱ्या पत्नीबद्दल काही भाकितं केली होती. आता काव्या मारनचं नाव त्याच्याशी जोडलं जात असल्याने चाहत्यांना या जुन्या भविष्यवाणीची आठवण झाली आहे.
काय होती अनिरुद्धच्या लग्नाबाबतची भविष्यवाणी?
हा व्हिडीओ जवळपास 10 वर्षांपूर्वीचा असून त्यामध्ये एका तमिळ टेलिव्हिजन कार्यक्रमात अनिरुद्धच्या लव्ह लाइफविषयी चर्चा करण्यात आली होती. यावेळी एका टॅरो कार्ड रीडरला अनिरुद्धच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी तिने केलेली भाकितं आता पुन्हा चर्चेत आली आहेत. या टॅरो कार्ड रीडरने अनिरुद्धचं लग्न प्रेमविवाह असेल, असं सांगितलं होतं. तो ज्या मुलीच्या प्रेमात पडेल, तिच्याशी लग्न करण्यापूर्वी वडिलांची संमती घेईल, असंही तिने म्हटलं होतं. त्यामुळे अनिरुद्धच्या लग्नाच्या चर्चांदरम्यान या जुन्या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
या भविष्यवाणीतील आणखी एका गोष्टीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनिरुद्धची होणारी पत्नी चित्रपटसृष्टीशी संबंधित नसेल, असं टॅरो कार्ड रीडरने सांगितलं होतं. ती उच्चशिक्षित असेल आणि तिचा संबंध टेलिकम्युनिकेशन किंवा ब्रॉडकास्टिंग क्षेत्राशी असू शकतो, असंही भाकीत करण्यात आलं होतं. इतकंच नव्हे, तर ती मुलगी अनिरुद्धच्या घरापासून एक ते दोन किलोमीटरच्या परिसरात राहणारी असू शकते, असाही दावा करण्यात आला होता. आता काव्या मारनचं नाव अनिरुद्धसोबत जोडलं जात असल्याने या भविष्यवाणीतील काही गोष्टी त्यांच्याशी मिळत्याजुळत्या असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
कोण आहे काव्या मारन?
काव्या मारन ही सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन यांची कन्या असून ती सनरायझर्स हैदराबाद या आयपीएल संघाची सीईओ आहे. तसंच ती सन टीव्ही नेटवर्कशी संबंधित महत्त्वाची जबाबदारीही सांभाळते. तिने परदेशात मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे ब्रॉडकास्टिंग क्षेत्र आणि उच्चशिक्षणाशी संबंधित जुन्या भविष्यवाणीची चर्चा अधिक रंगली आहे. अनिरुद्ध आणि काव्या मारन हे येत्या 11 नोव्हेंबरला ग्रीसमध्ये लग्न करणार असून 21 नोव्हेंबरला चेन्नईमध्ये रिसेप्शन होण्याची शक्यता आहे.