बॉलीवूडची पहिली ‘बॉम्बशेल’.. ही अभिनेत्री होती दिलीप कुमार यांची वहिनी, अमेरिकी सैनिक खिशात ठेवायचे फोटो

बेगम पारा या दिलीप कुमार यांचे भाऊ नासिर खान यांच्या पत्नी होत्या. त्या त्यांच्या काळातील एक धाडसी अभिनेत्री होत्या, ज्यांना 'पहिली बॉम्बशेल' म्हणून ओळखले जात असे. अभिनेते अयुब खान यांच्या आई असलेल्या बेगम पारा यांनी संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या, रणबीर कपूरच्या 'सावरिया' चित्रपटातही काम केलं होतं.

बॉलीवूडची पहिली बॉम्बशेल..  ही अभिनेत्री होती दिलीप कुमार यांची वहिनी, अमेरिकी सैनिक खिशात ठेवायचे फोटो
| Updated on: May 20, 2026 | 1:30 PM

हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेते, ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचं आयुष्य, त्यांची प्रेमप्रकरण आणि चित्रपटही खूप चर्चेत राहिले. मात्र त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांचे कुटुंबिय, भाऊ यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहीत असेल. दिलीप कुमार यांना 12 भावंडं होती. त्यामध्ये सहा भाऊ आणि पाच बहिणींचा समावेश होता. दिलीप कुमार यांच्या व्यतिरिक्त, नासिर खान हा त्यांचा भाऊदेखील अभिनेता होता. पण त्यांची चित्रपट कारकीर्द विशेष यशस्वी ठरली नाही. नासिर यांची पत्नी, बेगम पारा, यादेखील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या. प्रख्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ चित्रपटातही त्यांची भूमिका होती. बेगम पारा या स्वत:च्या अटींवर आयुष्य जगल्या. जाणून घेऊया दिलीप कुमार यांचं कुटुंब आणि बेगम पारा यांच्या आयुष्याशी निगडीत हा किस्सा.

अमेरिकन सैनिक खिशात ठेवायचे हा फोटो

आजच्या पिढीला कदाचित माहीत अभिनेत्री बेगम पारा नसतील, पण त्यांच्या काळात, त्या एक दिग्गज अभिनेत्री होत्या. त्या काळाच्या मानाने बेगम पारा या खूप धाडसी होत्या आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य जगायच्या. त्यांना एक ट्रेंडसेटर मानलं जायचं. 1940 आणि 1950 दशकातील त्यांच्या बोल्ड फोटोशूट्स आणि लाइफस्टाइलमुळे त्यांना बॉलीवूडची पहिली ‘बॉम्बशेल’ आणि ग्लॅमरस गर्ल म्हणून ओळख मिळाली. बेगम पारा त्या काळात खूप लोकप्रिय होत्या. असंही म्हटलं जायचं की, अमेरिकन सैनिक त्यांचा फोटो आपल्या खिशात ठेवत असत.

वडील होते न्यायाधीश

बेगम पारा यांचा जन्म 1926 साली पाकिस्तानातील एका प्रतिष्ठित मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचं खरं नाव झुबैदा-उल-हक होते, पण त्यांना प्रेमाने पारा म्हटले जायचे. त्यावेळी पारा यांचे वडील न्यायाधीश होते. त्यांच्या वडिलांची वारंवार बदली होत असे, त्यामुळे पारा यांचे शालेय शिक्षण जालंधरमध्ये झाले. त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून आपले पुढील शिक्षण पूर्ण केले. कॉलेजच्या दिवसांमध्येही बेगम पारा या खूप धाडसी होत्या. त्यांना घोडेस्वारी आणि खेळांमध्ये रस होता. क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ होता. त्यांना अभिनेत्री व्हायचे होते, पण घरच्यांना ते मान्य नव्हतं. बेगम पारा यांच्या भावाचं लग्न बंगाली अभिनेत्री प्रतिमा हिच्याशी झालं आणि ते मुंबईत रहायचे.

चित्रपटात अशी मिळाली संधी

बेगम पारा या जेव्हा त्यांच्या भावाच्या घरी जायच्या, तेव्हा त्यांची वहिनीशी भेट व्हायची. आपल्या भावाचं आयुष्य्, त्यांची लाईफस्टाइल पाहून, त्यांनी चित्रपटांमध्ये काम करायचं ठरवलं. एक दिवस बेगम पारा या त्यांच्या वहिनीसोबत एका शूटिंगला गेल्या आणि त्यांना चित्रपटात काम करायची संधी मिळाली. ‘चांद’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता,त्याद्वारे त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि बेगम पारा एक सुप्रसिद्ध अभिनेत्री बनली. त्यांनी ‘सोहनी महवाल’, ‘जंजीर’, ‘नील कमल’ आणि ‘सुहागरात’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्या काळात त्या सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होत्या.

बोल्ड फोटोशूटची चर्चा

लाईफ मासिकासाठी केलेले त्यांचं बोल्ड फोटोशूट चर्चेचा विषय ठरलं होतं. आपली फिगर चांगली असेल तर बोल्ड फोटोशूट करण्यात काही प्रॉब्लेम नाही, असं बेगम पारा यांना वाटत होतं. बेगम पारा यांनी दिलीप कुमार यांचे भाऊ, नासिर खान यांच्यासोबत काम केले आणि त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. नासिर खान विवाहित होते आणि त्यांचे त्यांच्या पत्नीसोबतचे संबंध तणावपूर्ण होते. नंतर त्यांनी पत्नीपासून फारकत घेऊन बेगम पारा यांच्याशी लग्न केलं.

मात्र दिलीप कुमार हे या लग्नाविरोधात होते. बेगम पारा यांची बोल्ड लाइफस्टाइल, मद्यपान, धूम्रपान आणि पार्ट्या करणं, हे त्यांच्या विरोधाचं कारण होतं. आपला भाऊ भाऊ बेगम पारा यांच्या इच्छा पूर्ण करू शकणार नाही असं दिलीप कुमार यांना वाटत होतं. यामुळे बेगम पारा आणि दिलीप कुमार यांच्यात इतका दुरावा निर्माण झाला की ते एकमेकांचं तोंडही पहायचे नाहीत.

सावरिया चित्रपटात झळकल्या

दिलीप कुमार यांचे भाऊ नासिर खानचे चित्रपट फार चालले नाहीत. त्यांनी निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवले, पण तेही फार यशस्वी ठरलं नाही. बेगम पारा यांनी देखील अनेक व्यवसायांमध्ये नशीब आजमावलं, पण ते सर्व अयशस्वी ठरले. दरम्यान, नासिर खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बेगम पारा दारू पिऊ लागल्या. त्यांना तीन मुलं होती. बेगम पारा आपल्या बहिणीसोबत पाकिस्तानला गेल्या. तिथे उदरनिर्वाह करणं शक्य न झाल्याने त्या मुंबईला परतल्या. बेगम पारा यांचा धाकटा मुलगा अयुब खान हा अभिनेता असून ते अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये दिसले आहेत. संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सावरिया’ चित्रपटात बेगम पारा यांनी सोनम कपूरच्या आजीची भूमिका साकारली होती. 2008 साली वयाच्या 82 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

 

Follow Us