Akshay Kumar: सर्वाधिक टॅक्स भरल्याने आयकर विभागाकडून गौरव झाल्याबद्दल अक्षय कुमारची प्रतिक्रिया, “तुम्ही जे कमावलं ते..”

| Updated on: Aug 03, 2022 | 1:02 PM

बॉलिवूडचा (Bollywood) खिलाडी अर्थात अक्षय कुमार हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला. यानिमित्त त्याला आयकर विभागाकडून सन्मान पत्र देण्यात आलं.

Akshay Kumar: सर्वाधिक टॅक्स भरल्याने आयकर विभागाकडून गौरव झाल्याबद्दल अक्षय कुमारची प्रतिक्रिया, तुम्ही जे कमावलं ते..
Akshay Kumar
Image Credit source: Twitter
Follow us on

काही दिवसांपूर्वीच अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) आयकर विभागाकडून (Income Tax) गौरव करण्यात आला. बॉलिवूडचा (Bollywood) खिलाडी अर्थात अक्षय कुमार हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कर भरणारा अभिनेता ठरला. यानिमित्त त्याला आयकर विभागाकडून सन्मान पत्र देण्यात आलं. त्याचा फोटोसुद्धा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. आता यावर अक्षय कुमारने प्रतिक्रिया दिली आहे. हा सन्मान मिळाल्याने खूश झाल्याचं अक्षयने म्हटलं. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारने आपला आनंद व्यक्त केला. “होय, मला हेच सांगितलं गेलंय. प्राप्तिकर विभागाने माझा सन्मान केला ही अतिशय सन्मानाची आणि आनंदाची बाब आहे. ही एक खूप चांगली भावना आहे. तुम्ही जे काही कमावलंय त्यातून तुम्ही देशासाठीही काहीतरी करू शकता ही चांगली गोष्ट आहे,” असं तो म्हणाला.

सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता

2015 आणि 2019 मध्ये अक्षय कुमार हा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता ठरला होता. या काळात तो जगभरातील सर्वाधिक कमाई करणारा 52 वा अभिनेता ठरला होता. त्यावेळी अक्षय कुमारची संपत्ती ही 386 कोटींच्या आसपास होती. चित्रपटांव्यतिरिक्त ब्रँड एंडोर्समेंट आणि जाहिराती हे देखील अक्षयच्या कमाईचे मुख्य स्त्रोत आहेत.

हे सुद्धा वाचा

सर्वात जास्त कर भरणारा अभिनेता म्हणून गौरवण्यात आलेल्या अक्षय कुमारच्या चाहत्यांनाही त्याच्या या कामगिरीचा खूप अभिमान आहे. चाहतेही अक्षय कुमारवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अक्षय कुमारच्या वतीने त्याच्या टीमने प्राप्तिकर विभागाने दिलेलं हे सन्मान पत्र स्वीकारलं. अक्षय कुमारचा गेल्या सलग 5 वर्षांपासून भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

अक्षय कुमार त्याच्या एका चित्रपटासाठी जवळपास 100 कोटी रुपये मानधन घेतो. चित्रपटांशिवाय अक्षयच्या उत्पन्नाचे इतरही स्रोत आहेत. त्याची एकूण संपत्ती 369 कोटी रुपये आहे. अक्षय कुमारची भारतातच नव्हे तर कॅनडामध्येही बरीच संपत्ती आहे. तो एका खाजगी जेटचाही मालक आहे, ज्याची किंमत सुमारे 260 कोटी रुपये आहे. अक्षय सध्या इंग्लंडमध्ये असून जसवंत सिंग गिल यांच्या बायोपिकचं शूटिंग करत आहे. अक्षय कुमार लवकरच ‘रक्षा बंधन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे. ‘सेल्फी’, ‘राम सेतू’, ‘ओह माय गॉड 2’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हे चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सूर्याच्या ‘सूरराई पोट्रू’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्येही तो दिसणार आहे.