Prahaar Review: या 5 कारणांमुळे राजकुमार रावचा ‘प्रहार’ पाहिलाच पाहिजे; कसा आहे सिनेमा?
मुंबईवरच्या 26/11 च्या हल्ल्यातील एका जिवंत दहशतवाद्याला फासावर लटकवण्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात कसा 'प्रहार' केला, याची ही अंगावर काटा आणणारी कथा या चित्रपटात आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (राजकुमार राव) यांनी अजमल कसाबला फासावर लटकवण्यासाठी केलेल्या संघर्षाचे हे प्रामाणिक चित्रण आहे.

सोनाली नाईक, टीव्ही 9 : काही जखमा अशा असतात ज्यांवर काळाची कितीही वर्षे उलटली तरी त्या ताज्याच राहतात. २६ नोव्हेंबर २००८ ची ती रात्र मुंबईकरच काय, संपूर्ण देश कधीही विसरू शकत नाही. वृत्तवाहिन्यांवर दिसणारे ते धुराचे लोट, सीएसटीवर झालेला रक्ताचा सडा आणि गोळ्यांचा तो भीषण आवाज आजही आठवला की काळजात धस्स होतं. पण त्या हल्ल्यानंतर खरी लढाई सुरू झाली होती कोर्टाच्या चार भिंतींत, कायद्याच्या चौकटीत राहून एका जिवंत दहशतवाद्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देण्यासाठी. ‘किल्ला’ आणि ‘पाताल लोक’ फेम दिग्दर्शक अविनाश अरुण यांनी याच संघर्षावर थेट ‘प्रहार’ केला आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची ही कोर्टरूम लढाई पडद्यावर आणताना कुठेही अभिनिवेश न आणता, कोणताही एकतर्फी अजेंडा न राबवता अतिशय समतोल आणि प्रामाणिक सिनेमा त्यांनी साकारला आहे. संविधानाची चौकट आणि कायद्याचा धाक दाखवणारा हा सिनेमा नक्की कसा झालाय, हे सविस्तर समजून घेऊया.
सिनेमा का पाहावा? 5 कारणे…
• २६/११ च्या भीषण जखमा आणि कोर्टाच्या चार भिंतींत लढलेली ऐतिहासिक कायदेशीर लढाई.
• सरकारी वकील म्हणून राजकुमार रावचा भारदस्त वावर आणि ललित प्रभाकरचा थरकाप उडवणारा अभिनय.
• दिग्दर्शक अविनाश अरुण यांची तोलून-मापून केलेली मांडणी आणि काळजाला भिडणारे संवाद.
• न्यायाच्या लढ्यात उज्ज्वल निकम यांनी आखलेली एक-एक रणनीती प्रेक्षकांना खिळवून ठेवते का?
• देशाच्या अस्मितेवर झालेला हल्ला आणि संविधानाच्या ताकदीची ही गाथा प्रत्येकाने पाहायला हवी का?
सिनेमाची सुरुवात होते ती एका पार्टी ने, ही पार्टी उज्वल निकम यांच्या 1993 बॉम्बस्फोट प्रकरणातल्या विजयाची आहे. पण निकम खुश नाही, कारण या प्रकरणात पाकिस्तान दोषी नहीं सिद्ध झाला, पण काही वर्षानंतर ही संघी चालुन आली आणि मग पडद्यावर सुरू झाल्या २६/११ च्या त्या भयानक आठवणीं. सीएसटी स्टेशनवर अजमल कसाबने निरपराध लोकांवर चालवलेली अंदाधुंद गोळीबार पाहून डोळ्यात चटकन पाणी तरळतं. पोलिसांनी कसाबला जिवंत पकडलं खरं, पण एका लोकशाही देशात त्याला थेट फासावर लटकवता येत नव्हतं. गरज होती ती कायद्याच्या राज्याची आणि पुराव्यांची. ही जबाबदारी सोपवली जाते महाराष्ट्राचे ख्यातनाम विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम (राजकुमार राव) यांच्यावर.
समोर उभा असतो अत्यंत थंड डोक्याने कत्तल करणारा कसाब (ललित प्रभाकर), जो वारंवार आपल्या वयाचा, अल्पवयीन असण्याचा खोटा बुरखा ओढून आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांचा फायदा घेण्याचा कांगावा करत असतो. कसाबच्या बचावासाठी उभे असलेले वकीलही कायदेशीर पळवाटा शोधत असतात. आपल्याच घरात घुसून माणसांची कत्तल करणाऱ्या या नराधमाला फासावर लटकवण्यासाठी निकम यांना एकेक पुरावा कसा गोळा करावा लागतो, संविधानाची ताकद दाखवत आंतरराष्ट्रीय पातळीवर हा कट कसा उघडा पाडावा लागतो, आणि या संपूर्ण प्रवासात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर, कुटुंबावर काय ताण येतो, याचा अस्वस्थ करणारा लेखाजोखा म्हणजे ‘प्रहार’.
सिनेमा कसा आहे?
2 तास 20 मिनिटांचा हा प्रवास एका सेकंदासाठीही सुस्त पडत नाही. सिनेमाची सर्वात मोठी ताकद म्हणजे अविनाश अरुण यांची दिग्दर्शकीय पकड. कोर्टरूम ड्रामा म्हटलं की बऱ्याचदा फक्त शाब्दिक चकमकी आणि लांबलचक भाषणं असतात. पण इथे प्रत्येक युक्तिवादामागे एक जळजळती भावना आहे. कुठेही मेलोड्रामा नाही, की टाळ्या मिळवण्यासाठी फेकलेले पोकळ देशभक्तीचे नारे नाहीत. सिनेमा अत्यंत निष्पक्षपणे मांडला गेला आहे. कसाबच्या बाजूने लढणाऱ्या वकिलांची भूमिकाही तेवढ्याच गांभीर्याने दाखवली आहे, ज्यामुळे कोर्टातील तणाव नेचुरल वाटतो. मध्यंतरापूर्वीचा प्रसंग काळजाचा ठोका चुकवणारा आहे. तर मध्यंतरानंतर एका लहान मुलीची कोर्टात येऊन कसाबच्या डोळ्यात डोळे घालून साक्ष देण्याचा प्रसंग पाहताना थिएटरमध्ये कुणीच डोळे कोरडे ठेवू शकत नाही. कसाबचा खोटा बुरखा कसा फाडला जातो, यामागची वकिली रणनीती खिळवून ठेवणारी आहे.
लेखन आणि दिग्दर्शन
अविनाश अरुण यांच्या दिग्दर्शनाला तोड नाही. कसाबच्या क्रूरतेची दाहकता दाखवताना त्यांनी कॅमेऱ्याचा वापर अतिशय संयमाने केला आहे. डायलॉग पातळीवर सिनेमा फार उंच भरारी घेतो. कायद्याचा आदर आणि देशाची अस्मिता अधोरेखित करणारे अनेक संवाद थेट मनाचा ठाव घेतात. सिनेमात एक अत्यंत मार्मिक डायलॉग आहे,”आपल्यासाठी दहशतवाद्यालाही संविधान आहे, पण तिथे काही लोकांसाठी दहशतवादच संविधान आहे.” हा एकच संवाद दोन्ही देशांमधील वैचारिक दरी एका क्षणात स्पष्ट करतो. तर पाकिस्तान च्या डिलेगेट्स च्या समोर पुराव्यांच्या पळवाटेवर बोट ठेवताना येणारा संवाद,”आमच्या घरात कत्तल करून, बेल वाजवून खुनी आमच्याकडेच पुरावे मागत आहेत!” कोर्टातल्या त्राग्याची आणि सामान्य माणसाच्या न्यायाच्या भुकेची जाणीव करून देतो.
आणखी एक विशेष बाब म्हणजे, गंभीर कायदेशीर पेचातही उज्ज्वल निकम यांच्या वैयक्तिक श्रद्धा आणि आत्मविश्वास दाखवणारा संवाद,”उज्ज्वल निकमचा जन्म हनुमान जयंतीचा आहे, माझा हिशोबही बजरंगबली घेतील आणि माझ्या शत्रूंचाही!” या सारखे डायलॉग चित्रपटाला दमदार बनवतात. बॅकग्राउंड स्कोअर प्रसंगातील तणाव अचूक पकडतो, गाणी नसल्यामुळे कथानकाची धार कुठेही बोथट होत नाही.
अभिनय
अभिनयाच्या बाबतीत राजकुमार रावने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की तो काळाच्या पुढचा अभिनेता आहे. कोर्टात संथ आवाजात बोलणारा, डोळ्यात न्याय मिळवून देण्याची धग बाळगणारा आणि शब्दांच्या फैरींनी समोरच्याचे खोटे चेहरे उघडे पाडणारा उज्ज्वल निकम त्याने जिवंत केला आहे. देहबोली, मराठी भाषेचा लहेजा आणि वकिली दरारा यात तो पूर्णपणे उतरला आहे.
पण या सिनेमाचं सर्वात मोठं सरप्राइज पॅकेज आहे ललित प्रभाकर. कसाबच्या भूमिकेत ललितने जे काही काम केलंय, ते पाहून अंगावर काटा येतो. कुठेही ओरडणे किंवा अवास्तव हावभाव न करता, केवळ डोळ्यांतील थंड क्रूरता, चेहऱ्यावरचा विकृत उद्दामपणा आणि प्रसंगी निरागसतेचा आव आणणारा त्याचा अभिनय अविस्मरणीय ठरला आहे. ललितने मराठी कलाकाराची ताकद या नेशनल प्लेटफार्म वर सणसणीतपणे दाखवून दिली आहे.
जयदीप अहलावत नेहमीप्रमाणेच आपल्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाने कथेला एक वेगळे वजन देतात. वामिका गब्बीने ठीकठाक काम केले आहे. सिकंदर खेर आणि आशिष विद्यार्थी यांच्या कोर्टातील जागा आणि संवादफेक लाजवाब आहे. ऋत्विक सहोरे आणि अजिंक्य देव आपापल्या छोट्या भूमिकांतही आपली पक्की छाप पाडून जातात. बालकलाकार डायोर रंजू वर्गीस हिने कोर्टातील साक्ष देण्याच्या दृश्यात जे जिवंत भाव मांडले आहेत, ते प्रेक्षकांच्या थेट काळजाला भिडतात.
सिनेमाचे 5 महत्त्वाचे पैलू
1. कायद्याचा आणि संविधानाचा विजय: कोणत्याही बेकायदेशीर मार्गाचा आधार न घेता, केवळ संविधानाच्या बळावर एका दहशतवाद्याला फासापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणादायी लढाई.
2. राजकुमार राव आणि ललित प्रभाकरची जुगलबंदी: एका बाजूला न्यायाचा संयमी पहारेकरी आणि दुसऱ्या बाजूला क्रूरतेचा मुखवटा; दोघांच्याही अभिनयाची जुगलबंदी सिनेमाला वेगळ्याच उंचीवर नेते.
3. सत्य परिस्थितीची निष्पक्ष मांडणी: कोणत्याही एका विचारसरणीचा अजेंडा न राबवता, तपास यंत्रणा आणि कोर्टातील वस्तुस्थितीचा अचूक आणि संवेदनशील समतोल.
4. काटा आणणारे ताकदीचे संवाद: कोर्टातील युक्तिवाद केवळ कायदेशीर कलमं न राहता, देशाच्या आत्मसन्मानाची थेट साक्ष देणारे ठरतात.
5. अविनाश अरुण यांचे संयमी दिग्दर्शन: रक्ताचा अवास्तव बाजार न मांडता केवळ घटनांची दाहकता आणि मानवी भावनांची अचूक पकड.
‘प्रहार’ हा केवळ मनोरंजनासाठी बनवलेला सिनेमा नाही; तर हा प्रत्येक भारतीयाने आपल्या इतिहासाची सत्यता, पोलिस व तपास यंत्रणांचे बलिदान आणि आपल्या संविधानाची अथांग ताकद समजून घेण्यासाठी पाहायलाच हवा असा अनुभव आहे. एका निष्पाप देशावर झालेल्या भ्याड हल्ल्याला भारताने रडत न बसता कायद्याच्या चाबकाने कसं उत्तर दिलं, याचं हे सडेतोड आणि प्रेरणादायी उत्तर आहे. सिनेमागृहातून बाहेर पडताना छाती अभिमानाने भरून येते, भारतीय न्यायव्यवस्था आणि कायद्याच्या रक्षकांसाठी मन आदराने झुकते. हा सिनेमा नक्की थिएटरमध्ये जाऊन पाहावा असाच आहे.