90s मध्ये जे गाणं भारतीयांनी डोक्यावर घेतलं ते पाकिस्तानातून आलं होतं? व्हायरल व्हिडीओमुळे दाव्याला हवा
९० च्या काळातील गाण्यांची जादू काही औरच होती. आता असंच एक गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हे गाणं पाकिस्तानमधलं जरी असलं तरी मात्र त्याचा भारतातील प्रसिद्ध गाण्याशी संबंध आहे. तो कसा तेच या स्टोरीमधून जाणून घ्या...

‘ना कजरे की धार’… हे गाणं ऐकलं की 90च्या दशकातील मोहरा सिनेमा आणि सुनील शेट्टी-पूनम झावर यांच्यावर चित्रित झालेला रोमँटिक अंदाज लगेच आठवतो. पण आता याच गाण्याच्या चालीवरून सोशल मीडियावर एक दावा व्हायरल होत आहे. पाकिस्तानमधील एका सराइकी गाण्याची चाल नंतर ‘ना कजरे की धार’साठी वापरण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. विशेष म्हणजे एका व्हायरल व्हिडिओमुळे हा एक दावा चर्चेत आला आहे.
एक व्हायरल व्हिडिओ आणि पाकिस्तानचा दावा
देविका चौधरी नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये केवळ गिटारच्या साथीने छलरे छलरे वाल’ हे गाणं सादर करण्यात आलं आहे. साध्या अंदाजातील या सादरीकरणाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळाला. याच व्हिडिओवर पाकिस्तानमधील एका युजरने प्रतिक्रिया देताना हे मूळ पाकिस्तानी सराइकी गाणं असल्याचा दावा केला. तसेच नंतर पंकज उधास यांनी याच चालीवर ना कजरे की धार गायलं, असंही त्या युजरने म्हटलं.
1994 च्या सुपरहिट सिनेमाची पुन्हा चर्चा
‘ना कजरे की धार, ना मोतियों के हार’ हे गाणं 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या मोहरा सिनेमातील आहे. सुनील शेट्टी आणि पूनम झावर यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला प्रेक्षकांचं मोठं प्रेम मिळालं होतं. या सिनेमात अभिनेत्री रवीना टंडनचीही भूमिका होती. पंकज उधास आणि साधना सरगम यांच्या आवाजातील हे रोमँटिक गाणं आजही 90च्या दशकातील लोकप्रिय गाण्यांपैकी एक मानलं जातं.
या गाण्याचं संगीत विजू शाह यांनी दिलं होतं, तर गीतकार इंदीवर होते. या गाण्याच्या चालीचा पाकिस्तानमधील ‘छलरे छलरे वाल…’ या गाण्याशी संबंध असल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र, ‘ना कजरे की धार’ हे गाणं पाकिस्तानच्या गाण्यावरूनच बनवण्यात आलं होतं, असा कोणताही अधिकृत दावा किंवा माहिती समोर आलेली नाही.
त्यामुळे सध्या चर्चेचा विषय आहे तो व्हायरल व्हिडिओ आणि त्यावर करण्यात आलेला दावा. सोशल मीडियावर सुरू झालेल्या या चर्चेमुळे 90च्या दशकातील ना कजरे की धार हे गाणं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.