Salil Ankola : मी दिवसभर नशेत असायचो…हिरो झालेल्या क्रिकेटरच्या नशिबाचे फिरले फासे; सांगितला कठीण काळ!

Cricketer On His Struggle : क्रिकेटपटूनं नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या दारूच्या व्यसनाबद्दल आणि कठीण काळाबद्दल भाष्य केलं आहे.

Salil Ankola : मी दिवसभर नशेत असायचो...हिरो झालेल्या क्रिकेटरच्या नशिबाचे फिरले फासे; सांगितला कठीण काळ!
| Updated on: Oct 26, 2026 | 6:00 PM

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खेळानं ओळख निर्माण करणारा आणि नंतर अभिनय क्षेत्रातही आपला ठसा उमटवणारा माजी भारतीय क्रिकेटपटू सलील अंकोला सध्या त्याच्या आयुष्यातील कठीण काळामुळे चर्चेत आला आहे. क्रिकेटमधील कारकीर्द अचानक थांबल्यानंतर तो दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. एका मुलाखतीत सलीलनं याबद्दल सांगितलं आहे.सलील अंकोलानं १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. विशेष म्हणजे, याच सामन्यात सचिन तेंडुलकरनंही कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. सलीलनं भारतीय संघाकडून एक कसोटी आणि २० एकदिवसीय सामने खेळले. मात्र, दुखापतींमुळे त्याची क्रिकेटमधील कारकीर्द अपेक्षेप्रमाणे पुढे जाऊ शकली नाही. १९९७ मध्ये क्रिकेटपासून दूर झाल्यानंतर त्याला मोठ्या मानसिक संघर्षाला सामोरं जावं लागलं. ज्या खेळासाठी त्यानं आयुष्यभर मेहनत घेतली, तोच खेळ अचानक सोडावा लागल्यामुळे तो निराश झाला होता. या निराशेतून बाहेर पडण्यासाठी त्यानं मद्यपानाचा आधार घेतला. हळूहळू ही सवय व्यसनात बदलली आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही त्याचे गंभीर परिणाम होऊ लागले.

सलीलनं सांगितला कठीण काळ

Loading...

मुलाखतीदरम्यान सलील अंकोला म्हणाला की, ‘मी आधी फक्त संध्याकाळी दारू प्यायचो. पण, २००६ मध्ये मी, माझी आई, बाबा आणि माझा मुलगा आम्ही गाडीतून जात होतो. तेव्हा मी बिअरचा कॅन उघडला. त्यावेळी बाबा मला म्हणाले, ‘दारूची सवय लागू शकते तुला, हे वेळीच थांबावं.’ तेव्हा मी हसण्यावारी नेलं. १९९७ मध्ये क्रिकेट सोडल्यानंतर, मला दारूचं व्यसन लागलं. त्यानंतर मी कधीच खेळू शकणार नव्हतो, त्याचं दुःख होतं. मला अभिनेता बनायचं नव्हतं. पण, मला खूप ऑफर्स आल्या. तेव्हाही मी फक्त संध्याकाळीच दारू प्यायचो. माझ्या पहिल्या बायकोला हे आवडायचं नाही.’

 

‘२००८ मध्ये मला जास्त दारूचं व्यसन लागलं, मी दिवसभर दारू प्यायचो. त्यानंतर मी माझ्या कुटुंबापासून लांब झालो. सेटवरही मी दारू प्यायचो. पण, नंतर खूप त्रास झाला. मी सकाळी दारू प्यायचो आणि सेटवर गेलो तरी नशेत असायचो. कधी-कधी घरी दारू नसली की, मी दारूच्या अड्ड्यावर जायचो. त्यानंतर मी रिहॅब सेंटरमध्ये गेलो. तिथे खूप वाईटरित्या वागवलं जातं. एका खोलीत बंद केलं जातं. १९९७ मध्ये क्रिकेट सोडल्यानंतर काय करावं हे मला समजत नव्हतं. आमचा बिजनेस होता, पण त्यात नुकसान झालेलं. खूप कर्ज होतं. तेव्हा मला मालिकेची ऑफर आली आणि मी ती मालिका करायचं ठरवलं.’ अदिती गोवित्रीकरला दिलेल्या मुलाखतीत सलील बोलत होता.

दरम्यान, सलील अंकोलानं सीआयडी, सावधान इंडिया, कोरा कागझ यांसारख्या २५ हून अधिक टीव्ही मालिकांमध्ये काम केलंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us