Disha Salian: एवढ्या उंचावरून पडून फक्त तोंडातून रक्त आलं का? दिशा सालियन प्रकरणात न्यायाधीशांचा सवाल

Disha Salian Case: दिशा सालियान मृत्यूप्रकरणी कोर्टातली सुनावणी पूर्ण झाली असून दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे.

Disha Salian: एवढ्या उंचावरून पडून फक्त तोंडातून रक्त आलं का? दिशा सालियन प्रकरणात न्यायाधीशांचा सवाल
Disha Salian
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 28, 2026 | 1:41 PM

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसंदर्भातील याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि भोसले यांच्या खंडपीठासमोर सरकारी वकील शिशिर हिरे यांनी युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान दिशाच्या इंक्वेस्ट पंचनाम्यातील मृतदेहाच्या स्थितीचा उल्लेख, पोस्टमार्टम रिपोर्ट आणि घटनास्थळाशी संबंधित बाबींवरून न्यायालयाने सरकारी वकिलांना काही महत्त्वाचे प्रश्न विचारले. दिशाच्या मृतदेहाबाबतच्या हॉस्पिटलमधील पंचनाम्यात तिच्या शरीरावर कपडे नसल्याचा उल्लेख असल्याचं सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर न्यायालयाने मृतदेहावरील कपडे कोणी काढले आणि संबंधित डॉक्टरांचा जबाब का नोंदवण्यात आला नाही, असा सवाल केला. मात्र, सरकारी वकिलांनी हा पंचनामा घटनास्थळावरील नसून हॉस्पिटलमधील असल्याचं स्पष्ट केलं.

या मुद्द्यावर न्यायालयाने महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली. सध्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा हेतू नसल्याचं न्यायालयाने नमूद केलं. दिशाची हत्या झाली किंवा लैंगिक अत्याचार झाला, असा निष्कर्ष काढायचा नसून, या प्रकरणात प्रत्यक्षात संशय घेण्यासारखं काही आहे का, हे तपासणं महत्त्वाचं आहे, असं न्यायाधीशांनी नमूद केलं. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी दिशाच्या मृत्यूनंतर रुग्णालयातील काही छायाचित्रे न्यायालयासमोर सादर केली. त्यात मृतदेहावर कपडे असल्याचं छायाचित्रही दाखवण्यात आलं. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर न्यायालयाने जखमांबाबत प्रश्न उपस्थित केले. एवढ्या उंचीवरून एखादी व्यक्ती खाली पडली तरी फक्त तोंडातून रक्त आलं का? चेहऱ्यावर मोठ्या जखमा का दिसत नाहीत? असा सवाल न्यायालयाने केला.

यावर सरकारी वकिलांनी दिशा उंचावरून पडताना तोंडावर पडली होती, तिच्या कवटीला फ्रॅक्चर झाल्याचं आणि जबड्याला गंभीर दुखापत झाल्याचं स्पष्ट केले. शरीराच्या इतर भागांवरही जखमा झाल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली. सरकारी वकील शिशिर हिरे यांनी सुनावणीदरम्यान दिशाचे वडील सतीश सालियन यांचं पोलिसांनी पाच वेळा जबाब नोंदवल्याची माहिती दिली. जानेवारी 2024 मधील जबाबात सतीश सालियन यांनी मुलीने आर्थिक नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला होता.

तसंच चर्चेत असलेल्या राजकीय नेत्यांबाबत आणि सेलिब्रिटींबाबत विचारण्यात आलं असता, ते प्रसिद्ध व्यक्ती असल्याने आपण त्यांना ओळखतो; मात्र ते दिशाच्या संपर्कात होते की नाही, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचं त्यांनी सांगितल्याचं सरकारी वकिलांनी नमूद केले. दिशाची आई वासंती सालियन यांच्या जबाबातही अशाच स्वरूपाची माहिती असल्याचे सांगण्यात आलं.

सरकारी वकिलांनी दिशाचा प्रियकर रोहन राय याच्या जबाबाचाही उल्लेख केला. रोहन हा दिशाच्या सर्वाधिक जवळच्या व्यक्तींपैकी एक होता. त्याच्या जबाबानुसार दिशा तणावाखाली होती आणि दारु प्यायल्यानंतर तिने आत्महत्या केली. वडिलांसोबत झालेल्या वादानंतर ती रोहनकडे राहण्यासाठी आली होती, असंही तपासात समोर आल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं. दिशाने आत्महत्येपूर्वी दारुचं किती सेवन केलं होतं, याची माहिती वैद्यकीय अहवालात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याशिवाय मेडिकल रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचाराच्या खुणा आढळल्या नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. दिशाचे पोस्टमार्टम करणारे डॉक्टर कणीराम जाधव यांचाही जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली.

यानंतर आदित्य ठाकरे यांचे वकील सुदीप पासबोला यांनी युक्तिवाद सुरू केला. त्यांनी या प्रकरणातील याचिकेच्या आधारावरच प्रश्न उपस्थित केला. यापूर्वीही याच स्वरूपाची याचिका दाखल करण्यात आली होती आणि ती रशीद खान पठाण यांनी केली होती, असा दावा त्यांनी केला. सतीश सालियन यांनी त्यावेळी कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती, असंही पासबोला यांनी नमूद केलं. ऐकीव माहितीच्या आधारे अनेक गंभीर आरोप करण्यात आले आणि या प्रकरणामागे राजकीय हेतू असल्याचा दावा त्यांनी केला. पासबोला यांनी काही राजकीय नेते आणि माध्यमांमध्ये झालेल्या चर्चांचा संदर्भ देत, त्यातूनच या प्रकरणाला वेगळं स्वरूप मिळाल्याचा युक्तिवाद केला. “माझी दिशाच्या वडिलांबद्दल पूर्ण संवेदना आहे; मात्र त्यांच्या मुलीच्या मृत्यूवरून सुरू असलेलं राजकारण थांबायला हवं,” असा मुद्दाही त्यांनी मांडला.

आता या प्रकरणात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले असून कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे.

Follow Us