गर्लफ्रेंडवर धर्म परिवर्तनाचा दबाव टाकल्याने ब्रेकअप? अखेर ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याने सांगितलं सत्य

बिग बॉस फेम अभिनेत्यावर गर्लफ्रेंडवर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकल्याचा आरोप झाला होता. या आरोपांवर आता त्याने प्रतिक्रिया दिली आहे. एजाज खानचा काही महिन्यांपूर्वीच गर्लफ्रेंड पवित्रा पुनियाशी ब्रेकअप झाला.

गर्लफ्रेंडवर धर्म परिवर्तनाचा दबाव टाकल्याने ब्रेकअप? अखेर बिग बॉस फेम अभिनेत्याने सांगितलं सत्य
Pavitra Punia and Eijaz Khan
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 03, 2026 | 10:25 AM

अभिनेता एजाज खान 50 वर्षांचा असून आजही तो सिंगलच आहे. काही महिन्यांपूर्वी तो अभिनेत्री पवित्रा पुनियाला डेट करत होते. हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. इतकंच नव्हे तर दोघांच्या लग्नाच्याही चर्चा होत्या. परंतु अचानक त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं. ब्रेकअपनंतर पवित्राने काही मुलाखतींमध्ये धर्म परिवर्तनाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे एजाजने तिच्यावर मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याची चर्चा सुरू झाली होती. एजाजला मी खूप आधीच सांगितलं होतं की मी माझा धर्म कधीच बदलणार नाही, असं वक्तव्य पवित्राने केलं होतं. त्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एजाज त्याच्या अफेअर्स आणि सिंगल राहण्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत एजाज म्हणाला, “जेव्हा तुम्ही मागे वळून एखाद्या नात्याबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करता, तेव्हा जर मी त्यांच्या दोषांबद्दल बोलू लागलो, तर त्यांना मी चुकीचं ठरवल्याचा अर्थ काढला जातो. पण जर का मी त्यांच्या दोषांबद्दल बोललो नाही तर सगळी चूक माझीच होती असं वाटू शकतं. पार्टनरच्या चुका मोजून दाखवल्या तर मी जेंटलमन नाही, असं लोक म्हणतात. त्यामुळे सरळ सांगायचं झालं तर माझे रिलेशनशिप्स या कारणामुळे टिकू शकले नव्हते, कारण आम्हा दोघांकडून चुका झाल्या होत्या. जेव्हा माझ्या एक्सने मुलाखतींमध्ये माझ्याबद्दल काही सांगितलं, तेव्हा त्या गोष्टी मोडून-तोडून चाहत्यांसमोर ठेवल्या. त्यातून गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न झाले.”

“वेगळ्या प्रकारच्या प्रश्नावर दिलेलं उत्तर वेगळ्याच पद्धतीने सादर केलं गेलं. एका पॉडकास्टमध्ये तर असंही म्हटलं गेलं की मी माझ्या एक्स गर्लफ्रेंडला तिचा धर्म बदलण्यासाठी दबाव आणला होता. असं कधी झालंच नव्हतं. नंतर तिने स्वत:ही स्पष्ट केलं होतं की तिने असं काही म्हटलंच नव्हतं. मनातला राग बाहेर काढणं चुकीचं नाही, पण मला माझ्या एक्ससोबत शाब्दिक वाद करायचा नाही”, अशा शब्दांत तो पुढे व्यक्त झाला.

या मुलाखतीत एजाजने लहानपणी त्याच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेचाही किस्सा सांगितला. “बालपणात शारीरिक हिंसा सहन केल्यामुळे बऱ्याच काळापर्यंत मला कोणालाही स्पर्श करतानाही भीती वाटायची. परंतु आता मी खूप पुढे निघून आलोय. बिग बॉसचा अनुभवसुद्धा मला खूप काही शिकवून गेला. आता मला ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने समजली आहे की भांडणात तीच व्यक्ती नियंत्रणात राहते, जी शांत असते”, असं तो पुढे म्हणाला.

Follow Us