परीक्षेत कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी दम देताच घाबरून तो घरीच गेला नाही; जान्हवी किल्लेकरची भावूक विनंती

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत नेटकऱ्यांकडे विनंती केली आहे. अनमोल विश्वकर्मा नावाचा मुलगा बेपत्ता झाला असून तो कुठेही दिसल्यास तात्काळ कळवण्याची विनंती तिने केली आहे.

परीक्षेत कॉपी करताना पकडलं, शिक्षकांनी दम देताच घाबरून तो घरीच गेला नाही; जान्हवी किल्लेकरची भावूक विनंती
Jahnavi Killekar
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 05, 2026 | 2:49 PM

पुण्यातील हडपसर परिसरातून 14 वर्षीय अनमोल मोतीलाल विश्वकर्मा हा मुलगा 9 सप्टेंबर 2026 पासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. अनमोल हा हांडेवाडी रोडवरील सिग्नेट पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकत असल्याची माहिती आहे. अनेक दिवस उलटूनही त्याचा ठावठिकाणा लागलेला नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. दरम्यान, अभिनेत्री आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम जान्हवी किल्लेकर हिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत नागरिकांना अनमोलचा शोध घेण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

परीक्षेतील प्रकारानंतर घाबरल्याची माहिती

जान्हवीने मुलाविषयीच्या माहितीचा पोस्टरसुद्धा व्हिडीओत शेअर केला आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार, शाळेत परीक्षेदरम्यान अनमोल कॉपी करताना आढळला होता. परीक्षेत कॉपी करताना आढळल्यामुळे शिक्षक त्याला ओरडले आणि तुझ्या वडिलांना नाव सांगेन असा दम दिला. त्यामुळे घाबरलेला अनमोल घरी परतलाच नाही, अशी माहिती समोर आली आहे. अनमोल 9 सप्टेंबर रोजी हांडेवाडी रोड परिसरातील शाळेतून बेपत्ता झाला. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.

Loading...

पहा व्हिडीओ

जान्हवी किल्लेकरचं भावूक आवाहन

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर जान्हवी किल्लेकर हिने व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना अनमोलचा शोध घेण्यासाठी पुढे येण्याची विनंती केली. ‘आपलं बाळ हरवल्यानंतर आई-वडिलांना किती मोठ्या मानसिक त्रासातून जावं लागतं, हे फक्त आई-वडीलच समजू शकतात,’ अशा शब्दांत तिने कुटुंबीयांच्या वेदना मांडल्या. अनमोल कुठेही दिसल्यास किंवा त्याच्याबाबत काही माहिती मिळाल्यास ती तातडीने पोलिसांना किंवा कुटुंबीयांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर कळवावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. जान्हवीच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावरही अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत आहेत. अनमोल बेपत्ता झाल्यापासून त्याचे कुटुंबीय त्याच्या शोधासाठी प्रयत्न करत आहेत.

अनमोलचे मित्र तसेच परिसरातील काही परिचयाची लोकं आणि नातेवाईकांकडेही त्याची विचारपूस केली. पण त्याचा पत्ता कुठेच लागला नाही. अनमोल बेपत्ता होऊन आता जवळपास 1 महिना उलटला आहे. त्याचे आई वडील चिंतेत आहेत. जान्हवी किल्लेकरच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत मुलाविषयी काहीही माहिती मिळाल्यास कळवणार असल्याचं सांगितलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us