Jahnavi Killekar : बिस्लेरीच्या पाण्याने अंघोळ केल्याचा दावा, ट्रोल होताच जान्हवी किल्लेकरचा अवघ्या 2 शब्दांत पलटवार

अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने 'सायको रंगा'च्या कोल्हापूर शूटिंगदरम्यान बिस्लेरी पाण्याने आंघोळ केल्याचा किस्सा सांगितला. त्वचेच्या समस्यांमुळे हा निर्णय घेतल्याचे तिने म्हटले. या विधानामुळे सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले. मात्र जान्हवीने या टीकेला न घाबरता बेधडक प्रत्युत्तर दिलं.

Jahnavi Killekar : बिस्लेरीच्या पाण्याने अंघोळ केल्याचा दावा, ट्रोल होताच जान्हवी किल्लेकरचा अवघ्या 2 शब्दांत  पलटवार
| Updated on: Sep 26, 2026 | 5:24 PM

मराठी चित्रपटसृष्टी आणि टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर. अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केल्यानंतर जान्हवी हिने ‘बिग बॉस मराठी’मध्येही सहभाग घेतला होता. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रिय असून, आपल्या बेधडक स्वभावामुळेही ती नेहमी चर्चेत असते. लवकरच जान्हवी किल्लेकर ‘सायको रंगा’ या आगामी मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कोल्हापुरात आलेला एक अनुभव तिने नुकताच शेअर केला. मात्र, तिच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली आणि तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.

कोल्हापुरात चक्क बिस्लेरीच्या पाण्याने अंघोळ ?

‘सायको रंगा’च्या प्रमोशनदरम्यान जान्हवी यांनी कोल्हापुरातील शूटिंगचा किस्सा सांगितला. ती म्हणाली की, मला त्वचेशी संबंधित काही समस्या आहेत आणि बाहेरच्या ठिकाणचं वातावरण किंवा पाणी त्वचेला लगेच सूट होत नाही. कोल्हापुरात शूटिंगसाठी जातानाही कतिला याच गोष्टीची चिंता होती. मुंबईच्या पाण्याची सवय झाल्यामुळे कोल्हापुरातील पाणी आपल्याला सूट होईल की नाही, अशी भीती तिला वाटत होती.

याबद्दल बोलताना जान्हवी हिने सांगितलं, “ कोल्हापुरात शूटिंग होतं तेव्हा मला टेन्शन आलं होतं. कारण मला खूप स्किन प्रॉब्लेम्स आहेत. मी फूडी नाही, बाहेर कुठे गेले तर तिथलं क्लायमेट मला लगेच सूट होत नाही. कोल्हापूरचं पाणी मला सूट होतच नाही. मुंबईच्या पाण्याची आता सवय झाली आहे. त्यामुळे आता कसं मॅनेज करणार, असं मला वाटलं होतं.” पुढे तिने सांगितलं की, “तेव्हा मी चक्क बिस्लेरीच्या पाण्याने अंघोळ केली. मी मोठ्या पाण्याच्या बाटल्या आणायचे आणि त्याचा खर्चही मी स्वतः करायचे.”

वक्तव्य व्हायरल होताच सोशल मीडियावर ट्रोलिंग

जान्हवी किल्लेकर हिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी तिच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्या. काहींनी तिच्या म्हणण्यावर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी तिला ट्रोल केलं. एका युजरने कमेंट करत विचारलं, “मुंबईचं पाणी कोल्हापूरच्या पाण्यापेक्षा स्वच्छ आहे का मॅडम? म्हणजे तुम्हाला स्वच्छ पाण्याची ॲलर्जी आहे तर…” तर आणखी एका युजरने अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख करत जान्हवीवर टीका केली. अशा अनेक कमेंट्समधून जान्हवीला ट्रोल करण्यात आलं.

ट्रोलर्सना जान्हवींचं दोन शब्दांत उत्तर

मात्र सोशल मीडियावरील या ट्रोलिंगचा जान्हवी किल्लेकर हिच्यावर काहीही परिणाम झालेला दिसला नाही. तिने नेहमीच्या बेधडक अंदाजात ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिलं. व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आलेल्या कमेंट्सपैकी एका कमेंटला तिने थेट उत्तर दिलं. “Trollers welcome” असं लिहीत आणि त्यासोबत टाळ्यांचे इमोजी वापरत अवघ्या दोन शब्दांत तिने ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिलं. जान्हवीच्या या प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ट्रोलिंगला गांभीर्याने न घेता तिने दिलेलं हे उत्तर सध्या लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, ‘सायको रंगा’ हा आगामी मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात झाली असून, कलाकारही विविध माध्यमांमधून सिनेमाबद्दल माहिती शेअर करत आहेत. या चित्रपटात जान्हवी किल्लेकर यांच्यासोबत स्मिता गोंदकर, सुबोध भावे, पुष्कर जोग आणि मिलिंद शिंदे यांसारखे दिग्गज कलाकार झळकणार आहेत. त्यामुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us