Jui Gadkari: आजच्या आज डिलिट करा नाहीतर..; त्या व्हिडीओवर जुई गडकरीचा तीव्र संताप
Jui Gadkari: जुईने आता अशा मॉर्फ केलेल्या कंटेंटविरोधात थेट कायदेशीर मार्ग स्वीकारण्याचा इशारा दिल्याने या प्रकरणाकडे चाहत्यांचंही लक्ष लागलं आहे. जुईची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

Jui Gadkari: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे चर्चेत आहे. मात्र याचदरम्यान सोशल मीडियावर तिच्याबाबत पसरलेल्या एका कथित बनावट व्हिडीओमुळे जुई चांगलीच संतापली आहे. युट्यूबवरील एका चॅनेलने जुईचे फोटो मॉर्फ करून त्यावर खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकारावर जुईने थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली असून संबंधितांना व्हिडीओ हटवण्याचा इशारा दिला आहे. जुईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या व्हिडीओचे स्क्रीनशॉट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली. संबंधित व्हिडीओमध्ये तिचे फोटो एडिट किंवा मॉर्फ करण्यात आल्याचे दिसत असून, त्यासोबत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खोटी माहिती देण्यात आल्याचे जुईने म्हटलं आहे.
विशेष म्हणजे, एका मराठी सिनेसृष्टीतील स्टार कपलच्या मुलासोबत जुईचे फोटो मॉर्फ करून तिचा साखरपुडा झाल्याचा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे जुईचा संताप झाला. सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना तिने संबंधित युट्यूब चॅनेलला चांगलंच सुनावलं आहे. केवळ लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी अशा प्रकारचे व्हिडीओ तयार करण्याची गरज काय, असा सवाल तिने केला. तसंच व्हिडीओमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेबाबतही तिने नाराजी व्यक्त केली.
पहा पोस्ट-
जुईने यापुढे आणखी कठोर भूमिका घेतली आहे. हा व्हिडीओ तात्काळ हटवला नाही, तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा थेट इशारा तिने दिला. “आजच्या आज डिलीट नाही झाला, तर लवकरच कोर्टात भेटूया,” अशा शब्दांत तिने संबंधितांना सुनावलं आहे. गेल्या काही काळात कलाकारांच्या फोटो-व्हिडीओमध्ये फेरफार करून त्यांना वेगळ्या संदर्भात वापरण्याचे प्रकार सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. विशेषतः एआय आणि एडिटिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार होणाऱ्या बनावट कंटेंटमुळे कलाकारांच्या प्रतिमेला आणि वैयक्तिक आयुष्याला फटका बसण्याची शक्यता असते. जुईच्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. जुई गडकरी सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत असून मालिकेतील कथानक आणि तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.