Jhanak Shukla: ‘कल हो ना हो’मधली चिमुकली जिया आठवतेय? ‘या’ खास व्यक्तीशी केला साखरपुडा
'करिश्मा का करिश्मा' फेम झनक शुक्लाचा साखरपुडा; व्हायरल फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई: 90 च्या दशकातील प्रसिद्ध बालकलाकार झनक शुक्लाने नुकताच साखरपुडा केला. झनकला ‘करिश्मा का करिश्मा’ या मालिकेतून लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने शाहरुख खान आणि प्रिती झिंटा यांच्या ‘कल हो ना हो’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती. यामध्ये ती जिया कपूरच्या भूमिकेत होती. चित्रपटातील चिमुकली जिया आता मोठी झाली आहे. झनकने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत रोका झाला असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. झनकने स्वप्निल सूर्यवंशी याच्याशी साखरपुडा केला.
झनक ही गेल्या काही वर्षांपासून स्वप्निलला डेट करत होती. स्वप्निल हा फिटनेस ट्रेनर आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये झनक आणि स्वप्निल सोफ्यावर बसले आहेत. दोघं एकमेकांकडे प्रेमाने पाहत आहेत. झनकने गुलाबी रंगाचा सलवार-सूट परिधान केला आहे. त्यावर तिने पिवळ्या रंगाचा दुपट्टा घेतला आहे. तर स्वप्निलने जांगळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजमा परिधान केला आहे. सोफ्यावरच साखरपुड्याचे काही भेटवस्तू ठेवलेलं पहायला मिळत आहे.
‘अखेर ऑफिशियल झालं, रोका पार पडला’ असं कॅप्शन झनकने या फोटोला दिलं आहे. झनकची आई सुप्रिया शुक्लासुद्धा अभिनेत्री आहे. ‘खुश रहा, दोघांना खूप प्रेम’ असं लिहित त्यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री अविका गौरनेही झनकला शुभेच्छा दिल्या आहेत.
झनकने मालिकांपासून चित्रपटांमध्येही काम केलं. 15 व्या वर्षी तिने अभिनयातून ब्रेक घेतला. शिक्षणासाठी हा ब्रेक घेतल्याचं तिने स्पष्ट केलं होतं. झनकने मास्टर्स इन आर्कियोलॉजीची पदवी प्राप्त केली आहे.