
‘केडी: द डेविल’ या कन्नड चित्रपटातील ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्याचे बोल अत्यंत अश्लील लिहिल्याची तक्रार केल्यानंतर सर्व प्लॅटफॉर्म्सवरून ते हटवण्यात आलं. नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यावर अनेकांनी टीका केली. त्यावरून चित्रपटाचा दिग्दर्शक प्रेम आणि त्याची पत्नी रक्षिता यांनाही ट्रोल केलं जात आहे. आता रक्षिताने सोशल मीडियावर पोस्ट लिहित या वादावर मौन सोडलं आहे. ‘पिलिंग्स’, ‘ड्रीमम वेकपम’, ‘चोली के पीछे’ यांसारख्या गाण्यांवर का आक्षेप घेतला गेला नाही, असा सवाल तिने केला आहे.
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रक्षिताने लिहिलं, ‘होय, मी सर्व पाहिलंय. मला माहीत आहे की तुम्ही लोक मला विविध पोस्टमध्ये टॅग करत आहात. खरं तर, काय लिहिलं जातंय हे मला माहीत आहे. काय चाललंय हेसुद्धा मला माहीत आहे. मी त्याच्या बाजूने आहे की विरोधात किंवा त्याबद्दल माझी भूमिका काय आहे, याने काही फरक पडत नाही. जेव्हा ‘पिलिंग्स’, ‘ड्रीमम वेकपम’, ‘चोली के पीछे’ यांसारखी शेकडो इतर गाणी आली, तेव्हा सगळ्यांना ठीक वाटत होतं. जेव्हा संपूर्ण चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यामध्ये कलाकार सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त लैंगिक संबंधांबद्दल बोलताना दिसले, तेव्हा सर्वकाही ठीक वाटलं. पण फक्त एका गाण्यामुळे एवढी मोठी बातमी बनवली जात आहे. मी अजूनही त्याचं समर्थन करत नाहीये, मला ते समजून घेता यावं म्हणून मी फक्त प्रश्न विचारतेय.’
आणखी एका पोस्टमध्ये रक्षिताने पुढे म्हटलंय, ‘केवळ एका गाण्यामुळे लेखकाच्या संपूर्ण कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करता येत नाही किंवा त्याला कमी लेखता येणार नाही. या एका गाण्यामुळे तो वाईट गीतकार आहे किंवा हे सर्व फक्त कॉन्ट्रोव्हर्सीसाठी केलंय, असं होत नाही. हे चुकीचं आहे. काही चित्रपट इतरांपेक्षा कमी यशस्वी झाले म्हणून तो एक वाईट चित्रपट निर्माता किंवा दिग्दर्शक आहे, असा अर्थ होत नाही. तुम्हाला त्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे का? तर होय. तुम्ही असं का, हा प्रश्न विचारू शकता. पण तुम्हाला त्याचा अपमान करण्याचा अधिकार नाही. इतरांबद्दल कसं बोलावं, याचं लोकांना थोडं मूलभूत ज्ञान असायला हवं.’
यावेळी रक्षिताने इतर काही चित्रपटांची नाव न घेता उदाहरणं दिली. ‘दररोज चांगली, उत्तेजक बोल असलेली, विशेष गाणी बनवली जातात. आजकाल लोक अधिकाधिक हिंसक चित्रपट आणि चित्रपटांमधील लैंगिक दृश्ये पाहत आहेत. हे सर्व उघडपणे घडतंय. दिग्दर्शक प्रेमला तुम्ही प्रश्न विचारू शकता, काय चूक-काय बरोबर हे सांगू शकता. पण त्याच्या पूर्वीच्या कामाबद्दल काही बोलण्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आजकाल कन्नड दिग्दर्शकांसमोर ओटीटी प्लॅटफॉर्म किंवा कोणत्याही चॅनलला चित्रपट विकणं हे सर्वांत मोठं आव्हान आहे. इतर चित्रपट मार्केटच्या उंचीपर्यंत पोहोचणं किंवा त्याच्या जवळपास पोहोचणंही कठीण आहे. प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणणंसुद्धा मोठं आव्हान आहे. ही प्रत्येक सँडलवूड चित्रपटाची कहाणी आहे. केडी हा चित्रपट म्हणजे आमचं बाळ आहे आणि सरतेशेवटी आम्ही तेच करू जे योग्य आहे. आमच्यावर विश्वास ठेवा’, अशा शब्दांत तिने बाजू मांडली आहे.