अशी महिला धंदा करणारी..; ‘शक्तीमान’चं संतापजनक वक्तव्य, अभिनेत्याचा पलटवार, म्हणाले ‘त्यांचे विचार..’
'शक्तीमान' फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जी मला इंटिमसीची मागणी करते, ती वेश्या असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. यावर आता ललित परिमू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘शक्तीमान’ आणि ‘महाभारत’ यांसारख्या मालिका आणि विविध चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेले अभिनेते मुकेश खन्ना हे अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर ते अनेकदा विविध मुद्द्यांवर बेधडकपणे व्यक्त होतात. मुकेश खन्ना यांनी नुकतंच मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “जर एखादी मुलगी मुलाला बोलत असेल की, मला तुझ्यासोबत इंटिमेट व्हायचं आहे. तर ती मुलगी नाही, ती धंदा करणारी आहे”, असं ते म्हणाले होते. यावर आता दिग्गज अभिनेते ललित परिमू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असला तरी समाज आता बदलला आहे आणि आज महिला आपल्या आवडीनिवडी, गरजांबद्दल अधिक मोकळेपणे बोलत आहेत, असं उत्तर ललित परिमू यांनी दिलं.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत ललित यांना मुकेश खन्ना यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देण्यास विचारलं गेलं. त्यावर ते म्हणाले, “हे पहा, मी मुकेशजींना दोष देणार नाही. पण या बाबतीत ते जुन्या पिढीचे आहेत. आज कदाचित दहापैकी एक मुलगी असं म्हणू शकते. संस्कृती इतकी बदलली आहे की अशा गोष्टी बोलल्या जाऊ शकतात. आजच्या काळात महिलांचे विशेषत: ज्या सुशिक्षित आहेत, पैसे कमावतात आणि इंटिमसीची मागणी करतात, त्यांचं मूल्य वाढलं आहे. लाजाळू आणि मितभाषी अशी स्त्रियांची प्रतिमा आता सर्वसामान्य राहिलेली नाही. याचा अर्थ असा नाही की ती काही चुकीचं करतेय. ती केवळ एक स्त्री म्हणून आपल्या हक्कांचा वापर करत आहे.”
यावेळी ललित परिमू यांनी जगभरातील बदलत्या सामाजिक दृष्टीकोनाकडे लक्ष वेधलं आणि महिलांनी आपल्या इच्छा व्यक्त करणं हे काही असामान्य नसल्याचं मत मांडलं. “अमेरिका आणि युरोपमध्ये, जिथे महिलांच्या स्वातंत्र्याबद्दल खूप बोललं जातं, जिथे महिला कामोत्तेजनाबद्दलही बोलतात, तिथे जर त्यांना लैंगिक संबंधात समाधान मिळालं नाही, तर त्या पुरुषांशी संबंध तोडू शकतात. जिथे अशी संस्कृती आधीच रुजली आहे, तिथे ही एक किरकोळ बाब आहे. मुकेश खन्ना यांनी मांडलेली मतं त्यांची वैयक्तिक आहेत. जर त्यांना तसं वाटत असेल तर ठीक आहे. आपण त्याबद्दल काय करू शकतो? पण ते काळानुसार चालत नाहीयेत”, अशी प्रतिक्रिया ललित यांनी दिली.
मुकेश खन्ना यांच्या वक्तव्याविषयी ते पुढे म्हणाले, “याचा अर्थ असाही होतो की जर त्यांच्या आयुष्यात एखाद्या स्त्रीसोबत नातेसंबंध ठेवायचं झालं, तर त्यांना अशी स्त्री हवी असेल जी यांसारखी अजिबात नसेल. तुमच्या मनात स्त्रीची एक प्रतिमा असते. त्यांच्या मनात असलेली प्रतिमा एका वेगळ्या प्रकारच्या स्त्रीची आहे. ते कदाचित अजूनही 50 किंवा 60 वर्षांपूर्वीच्या भारतीय स्त्रीकडे पाहत असतील.”