म्हातारी, जाड झालीस.. म्हणणाऱ्यांना लारा दत्ताचं मार्मिक उत्तर

| Updated on: Apr 25, 2024 | 3:54 PM

अभिनेत्री लारा दत्ता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ट्रोलिंगविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. जाडी झालीस, म्हातारी दिसतेस.. असे कमेंट्स करणाऱ्यांना तिने मार्मिक उत्तर दिलं आहे.

म्हातारी, जाड झालीस.. म्हणणाऱ्यांना लारा दत्ताचं मार्मिक उत्तर
Lara Dutta
Image Credit source: Instagram
Follow us on

कलाविश्वात काम करणाऱ्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांना त्यांच्या दिसण्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं. लूकमध्ये जराही नकोसा बदल झाला की सोशल मीडियावर त्यांच्याबाबत ट्रोलिंगला सुरुवात होते. ऐश्वर्यापासून सुष्मिता आणि अगदी हल्लीच्या अभिनेत्रीसुद्धा ट्रोलिंगच्या शिकार झाल्या आहेत. त्यावर आता अभिनेत्री लारा दत्ताने प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लाराला ट्रोलिंगविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती मोकळेपणे व्यक्त झाली.

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत लारा म्हणाली, “मी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते. मला जेवढा वेळ त्यावर खर्च करावासा वाटतो, तेवढाच वेळ मी खर्च करते. जर माझी भूक अधिक फॉलोअर्स, कमेंट्स आणि इतर अशा गोष्टींसाठी असेल तर मला त्यासोबतच्या परिणामांसाठीही तयार राहावं लागेल. त्यामुळे सोशल मीडियावर जे प्रामाणिक लोक मला फॉलो करतात, त्यांच्यासाठीच मी काही गोष्टी शेअर करते. म्हणून मला सोशल मीडियावर जास्त फॅन फॉलोईंगसुद्धा नाही. तिथे तीच लोकं आहेत, जे अस्सल आहेत, ज्यांना तिथं राहायचं आहे. जर अशा प्रकारचे लोक असतील तर ते तुम्हाला खाली खेचण्यासाठी तिथे नसतात.”

हे सुद्धा वाचा

“माझ्या मते याबाबतीत मी नशिबवान आहे. मी ट्रोलिंग, असभ्य किंवा आक्षेपार्ह कमेंट्स यांचा सामनाच करत नाही. अर्थात लोकांना थांबवता येत नाही. ते तुमच्याविषयी मतं मांडत राहतील किंवा कमेंट करत राहतील. अनेकजण म्हणतात की अरे ही म्हातारी झाली, अरे ही जाड झाली. पण त्या कमेंट्समुळे माझ्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का? तर याचं उत्तर असेल नाही. अशा अकाऊंटच्या मागे निनावी लोकं असतात हे मलासुद्धा माहितीये. असे लोक त्यांच्या आयुष्यात कोणत्या गोष्टींचा सामना करत आहेत, हे मला माहित नाही. त्यामुळे मी त्यांच्याबद्दलसुद्धा काही मत बनवू शकत नाही”, असं तिने स्पष्ट केलं.

लारा दत्ता लवकरच ‘रणनिती: बालाकोट अँड बियाँड’ या सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिच्यासोबत जिमी शेरगिल, आशुतोष राणा आणि एलनाझ नौरोजी यांच्याही भूमिका आहेत.