Laxmikant Berde: लक्ष्याने बायकोचंही कधी ऐकलं नाही, त्याने स्वत:ला संपवलं..; भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांचा मोठा खुलासा
Laxmikant Berde: लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी त्यांचे बंधू पुरुषोत्तम बेर्डे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाले. लक्ष्याने कोणाचंच ऐकलं नाही, त्याने स्वत:लाच संपवलं, असं ते म्हणाले.

Laxmikant Berde: मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा बादशहा, आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. ‘लक्ष्या’ या नावाने घराघरांत लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्याने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवला. मात्र, वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी त्यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला. आता त्यांचे चुलत भाऊ, लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी लक्ष्मीकांत यांच्या स्वभावाबद्दल आणि शेवटच्या काळातील जीवनशैलीबद्दल केलेलं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. लक्ष्मीकांत यांनी स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केलं आणि ते कोणाचंही ऐकत नव्हते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
‘तो स्वतःच निर्णय घ्यायचा, कोणाचंही ऐकत नव्हता’
पुरुषोत्तम बेर्डे यांनी एका मुलाखतीत लक्ष्मीकांत यांच्या स्वभावाविषयी मनमोकळेपणाने सांगितलं होतं. लक्ष्मीकांत यांना लहानपणापासून ओळखत असल्यामुळे त्यांच्या स्वभावाची आपल्याला चांगली जाणीव होती, असं त्यांनी सांगितलं. लक्ष्मीकांत हे स्वतःचे निर्णय स्वतः घेणारे व्यक्तिमत्त्व होते. दुसऱ्याच्या सांगण्यावरून निर्णय बदलणं त्यांना फारसं पसंत नव्हतं. चित्रपटसृष्टीत लोकप्रियता आणि यश मिळाल्यानंतर त्यांच्या जीवनशैलीतही बदल झाला. मात्र, या काळात त्यांनी स्वतःच्या आरोग्याला पुरेसं महत्त्व दिलं नाही, अशी खंत पुरुषोत्तम यांनी व्यक्त केली. जवळच्या व्यक्तींनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यांच्यापर्यंत आपलं म्हणणं पोहोचवणं कठीण होतं, असंही त्यांनी सांगितलं.
“लक्ष्या खूप डॉमिनेटिंग होता. तो कोणाचंच ऐकायचा नाही. या गोष्टींपासून लांब रहा हे मी त्याला शेवटपर्यंत सांगू शकलो नाही. त्याने स्वत:ला संपवलं. अशोक सराफ हेसुद्धा किती प्रोफेशन आहेत. त्यांची पत्नी निवेदिता त्यांच्या सर्व गोष्टींची काळजी घेते. लक्ष्मीकांतने मात्र कोणाचंच ऐकलं नाही. अगदी स्वत:च्या बायकोचंही नाही. तो स्वत:चे निर्णय स्वत:च घ्यायचा. आज तो या जगात नसणं हे खरंच खूप मोठं नुकसान आहे. पण त्याला कारणसुद्धा तोच आहे”, अशी खंत पुरुषोत्तम बेर्डे यांनी व्यक्त केली.
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘धूमधडाका’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’ आणि ‘हमाल दे धमाल’ यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांना मनमुराद हसवलं. विनोदी भूमिका साकारताना त्यांचं अचूक टायमिंग, चेहऱ्यावरील हावभाव आणि सहज अभिनय यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.