बापटांइतकी नसेल, तरी माझीही मराठी चांगली.., हिंदीत बोलण्यावरून झालेल्या ट्रोलिंगला मराठी अभिनेत्याचं सडेतोड उत्तर

स्वप्निल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, मराठीचा आदर करणं म्हणजे स्वतःला इतर भाषांपासून दूर ठेवणं नव्हे. कलाकार म्हणून देशभरातील आणि जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यकतेनुसार विविध भाषांमध्ये व्यक्त होत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

बापटांइतकी नसेल, तरी माझीही मराठी चांगली.., हिंदीत बोलण्यावरून झालेल्या ट्रोलिंगला मराठी अभिनेत्याचं सडेतोड उत्तर
स्वप्निल राजशेखर, विद्यानंद बापट
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 04, 2026 | 11:32 AM

मराठी भाषा, तिचा अभिमान आणि कलाकारांनी इतर भाषांमध्ये व्यक्त होण्याचा अधिकार या मुद्द्यांवरून सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगताना दिसते. आता प्रसिद्ध मराठी अभिनेते स्वप्निल राजशेखर यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. आपल्या हिंदी भाषेतील एका रीलवर आलेल्या कमेंटला उत्तर देताना स्वप्निल राजशेखर यांनी मराठीवर असलेलं प्रेम स्पष्ट केलं असून, त्याचवेळी इतर भाषांबद्दल संकुचित दृष्टिकोन ठेवण्याची गरज नसल्याचंही ठामपणे सांगितलं आहे.

स्वप्निल राजशेखर यांची पोस्ट-

स्वप्निल राजशेखर यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये एका युजरने त्यांच्या हिंदीतील रीलवर केलेली कमेंट शेअर केली आहे. या कमेंटमध्ये, ‘तुम्हा मराठी कलाकारांना हिंदीत बोलायची फार खाज.. काय गरज आहे हिंदीत व्हिडीओ करायची. तुमच्यासारख्यांमुळे मराठी मरतेय,’ अशा शब्दांत त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. स्वप्निल यांनी सांगितलं की, अशा प्रकारच्या कमेंट्स त्यांना अनेकदा येत असतात. विशेष म्हणजे, संबंधित व्यक्तीच्या अकाउंटवर इंग्रजीमध्ये नाव लिहिलेलं असून त्याच अकाउंटवर दाक्षिणात्य चित्रपटाच्या प्रमोशनशी संबंधित पोस्टही होती, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

‘मातृभाषेवर प्रेम करणं म्हणजे दुसऱ्या भाषेचा द्वेष नव्हे’

स्वप्निल राजशेखर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. मातृभाषेवर प्रेम करणं, तिचा अभिमान बाळगणं, तिचा प्रसार करणं आणि दुसऱ्या भाषांचा द्वेष करणं या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. भाषेच्या प्रेमाला संकुचितपणाची जोड देऊ नये, असा संदेश त्यांनी त्यांच्या उदाहरणांमधून दिला. भारताच्या सागरी इतिहासाचा संदर्भ देत त्यांनी सांगितलं की, एखाद्या क्षेत्रात संकुचित विचार स्वीकारल्यास त्याची किंमत मोठी असू शकते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सामर्थ्य ओळखून स्वतंत्र आरमार उभारलं आणि पारंपरिक मर्यादा तोडण्याचा दृष्टिकोन दाखवला, असंही त्यांनी नमूद केलं.

छत्रपती संभाजी महाराजांचा दाखला

आपली भूमिका स्पष्ट करताना स्वप्निल यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बहुभाषिक व्यक्तिमत्त्वाचाही दाखला दिला. विविध भाषांवर प्रभुत्व असलेल्या संभाजी महाराजांनी वेगवेगळ्या भाषांमध्ये साहित्यनिर्मिती केली आणि आवश्यकतेनुसार विविध भाषांमध्ये संवाद साधला, याचा उल्लेख त्यांनी केला. त्यांच्या मते, मराठीचा अभिमान बाळगण्यासाठी इतर भाषा नाकारण्याची आवश्यकता नाही. उलट अनेक भाषा शिकणं आणि त्यांचा वापर करणं हे व्यक्तिमत्त्वाला अधिक समृद्ध करतं.

स्वतःबद्दल सांगताना स्वप्निल यांनी मराठीशी असलेलं आपलं नातंही मोकळेपणाने व्यक्त केलं. मायमराठी अत्यंत प्रिय असून तिचे विविध लहेजे आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न करतो, असं त्यांनी म्हटलं. मराठीच्या चार-पाच बोली लहेज्यांमध्ये आपण बोलू शकतो, असंही त्यांनी सांगितलं. याच पोस्टमध्ये त्यांनी ‘बापटांइतकी नसेल, तरी माझीसुद्धा मातृभाषा चांगली आहे’, असं म्हणत आपल्याला आपल्या मराठी भाषेचा अभिमान असल्याचं स्पष्ट केलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कोल्हापुरी मायबोलीचा प्रसार आणि तिचा गोडवा सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us