Vishakha Subhedar : विशाखा सुभेदार यांनी का सोडली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’? अनेक वर्षांनी कारण समोर
मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, त्यांना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमामुळे ओळख मिळाली. पण, विशाखा यांनी काही वर्षांपूर्वी अचानक हास्यजत्रा सोडली, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला.

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदार यांनी अनेक वर्ष ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये काम केलं. या कार्यक्रमामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. मात्र, अचानक विशाखा यांनी हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत त्यांनी यामागचं कारण सांगितलं आहे.
विशाखा यांनी सांगितलं हास्यजत्रा सोडण्याचं कारण
मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मात्र, त्यांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमामुळे ओळख मिळाली. पण, विशाखा यांनी काही वर्षांपूर्वी अचानक हास्यजत्रा सोडली, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. अशातच आता नुकत्याच एका मुलाखतीत विशाखा सुभेदार यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्याचं कारण सांगितलं आहे.
विशाखा सुभेदार म्हणाल्या की, ‘खरंच! मला आजही नाटकाच्या प्रयोगाला येणारे अनेकजण विचारतात, तुम्ही हास्यजत्रा का सोडली? आम्ही तुम्हाला खूप मिस करतो. लोक अगदी आठवून माझ्या स्किटचा उल्लेख करतात. खरंतर, मी सातत्यानं तेच करत होते, म्हणून मला जरा ब्रेक हवा होता. कारण, २०११ ते अगदी २०२२-२३ पर्यंत मी सातत्याने स्किट फॉरमॅटमध्ये काम केलेलं होतं. त्यामुळे एक ब्रेक गरजेचा होता.’
‘आपण एकदा कफर्ट झोनमध्ये आलो की, रिलॅक्स होऊन जातो. म्हणून मी तो निर्णय घेतला.अर्थात हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी खूप जास्त अवघड होता. आपल्या सगळ्या गोष्टी सेट असतात महिन्याच्या इएमआय पासून वगैरे सगळंच. त्यामुळे अचानक मग कामातून ब्रेक घेणं हे एखाद्या कलाकारासाठी फार अवघड असतं. पण, तो निर्णय मी तेव्हा घेतला. कारण, मला काहीतरी वेगळं करायचं होतं. आता कॉमेडी भूमिकांमुळे लोक मला ओळखतात याचा मला निश्चित आनंद आहे. पण, या व्यतिरिक्त सुद्धा मी अनेक गोष्टी करू शकते. एक कलाकार म्हणून एक वेगळी भूमिका साकारण्याची फार इच्छा होती. याचा अर्थ असा नाही की, मी विनोदी भूमिका करणार नाही वगैरे.’
‘आता नाटकात मी विनोदी शैलीतील भूमिकाच साकारतेय. फक्त स्किट फॉरमॅटमधून सध्या ब्रेक घेतलाय. कदाचित असंही होईल की, १-२ वर्षाने मी पुन्हा सुरू करेन. हास्यजत्रा सोडणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. आपल्याला काम मिळेल हा विश्वास मनात होता. आता मी जरी तो शो सोडलाय, तरीही आजही अनेकदा मी एपिसोड पाहते. तेव्हा मग मला वाटतं, अरे मला तेव्हा हे करायला मिळालं असतं तर किंवा आज मी शोमध्ये असते तर कदाचित हे केलं असतं असे विचार येतात. सिनेमाच्या बाबतीत सुद्धा असंच होतं. ही भूमिका केली असती तर बरं झालं असतं, असं मलाही कधीतरी वाटतं. पण, शेवटी ज्याच्या नशिबात जे असतं, तेच त्याला मिळतं असंही मला वाटतं.’ असं विशाखा यांनी शेवटी सांगितलं. ‘सिनेविस्टा मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत विशाखा सुभेदार बोलत होत्या.