बिग बॉसच्या घरात मेरी कोम, बाहेर कायदेशीर संकट; पूर्व पतीने दाखल केली केस

मेरी कोमचे पूर्व पती ऑनलर यांनी त्यांच्याविरोधात मानहानीची केस दाखल केली. त्यांनी मेरीवर काय आरोप लावले आहेत, आणि हे मोठे पाऊल उचलले तरी का ? घ्या जाणून

बिग बॉसच्या घरात मेरी कोम, बाहेर कायदेशीर संकट; पूर्व पतीने दाखल केली केस
| Updated on: Oct 07, 2026 | 6:47 PM

ऑलिम्पिक पदकविजेत्या आणि प्रसिद्ध बॉक्सर मेरी कोम (Mary Kom) सध्या बिग बॉसच्या घरात आहेत. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद काही थांबताना दिसत नाहीत. मेरी कोम यांचे पूर्व पती ऑनलर कोम यांनी त्यांच्याविरोधात क्रिमिनल मानहानीचा खटला दाखल केला आहे. मेरी कोम यांनी टीव्ही तसेच इतर सार्वजनिक व्यासपीठांवर ऑनलर यांच्याबाबत केलेल्या काही वक्तव्यांमुळे आपली प्रतिमा आणि प्रतिष्ठा मलीन झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे प्रकरण भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 356 अंतर्गत दाखल करण्यात आले आहे. या कलमानुसार दोष सिद्ध झाल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहे.

‘माझ्याकडे मजबूत केस आहे…’

Loading...

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, ऑनलर कोम यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. आपण कायदेशीर लढाई लढत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. “माझ्याकडे मजबूत केस आहे. मला भारताच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. प्रकरण विचाराधीन असल्याने मी यावर आणखी कोणतीही टिप्पणी करणार नाही,” असे ऑनलर यांनी सांगितल्याचे समजते. रिपोर्ट्सनुसार, मेरी कोम यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत ऑनलर गेल्या काही काळापासून कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत होते.

मेरी कोम यांनी केले होते आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप

मेरी कोम यांनी यापूर्वी ऑनलर यांच्यावर त्यांच्या आर्थिक संपत्तीशी संबंधित गंभीर आरोप केले होते. आपल्या बॉक्सिंग कारकिर्दीतून कमावलेले कोट्यवधी रुपये गैरव्यवहारामुळे गमावल्याचा दावा त्यांनी केला होता. तसेच त्यांच्या नावावर कर्ज घेण्यात आले, त्यांच्या जमिनीपैकी काही भाग गहाण ठेवण्यात आला आणि काही मालमत्ता त्यांच्या योग्य संमतीशिवाय ऑनलर यांच्या नावावर हस्तांतरित करण्यात आली, असाही आरोप मेरी यांनी लावला होता. मात्र, ऑनलर यांनी हे सर्व आरोप सातत्याने फेटाळून लावले आहेत. एवढंच नव्हे तर त्यांनीही मेरी कोम यांच्यावर काही आरोप केले असून, त्यांच्या दाव्यांचे पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले होते.

आधी शांत होते, आता माफी आणि नुकसानभरपाईची मागणी

ऑनलर यांच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले जात आहे की, त्यांनी सुरुवातीला या प्रकरणाला कायदेशीर वळण देण्याचा निर्णय घेतला नव्हता. आयुष्यात आणखी वाद नकोत, अशी त्यांची भूमिका होती. मात्र, मेरी यांनी केलेले आरोप खरे आहेत का, असे प्रश्न कुटुंबीय आणि मित्रांकडूनही त्यांना विचारले जाऊ लागले. त्यानंतर त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आता ऑनलर मेरी कोम यांच्याकडून माफी आणि नुकसानभरपाईची मागणी करत आहेत. त्यांच्याविरोधात करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचा त्यांचा दावा आहे. या आरोपांमुळे आपल्याला मानसिक आणि सामाजिक तणावाचा सामना करावा लागल्याचेही त्यांचं म्हणणं आहे.

बिग बॉसच्या घरातून मेरी कोम बाहेर पडणार का?

मेरी कोम यांच्याविरोधात सुरू झालेली ही कायदेशीर लढाई त्यांच्या बिग बॉसच्या सहभागावरही परिणाम करू शकते. जर सुनावणीदरम्यान किंवा न्यायालयीन प्रक्रियेत त्यांची वैयक्तिक उपस्थिती आवश्यक ठरली, तर त्यांना काही काळासाठी बिग बॉसच्या घराबाहेर यावे लागू शकते. मात्र, सध्या त्यांना बिग बॉसचा शो सोडावा लागेल की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. पुढील सुनावणी 19 नोव्हेंबर 2026 रोजी निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतरची परिस्थिती न्यायालयाच्या निर्देशांवर तसेच शोच्या नियमांवर अवलंबून असेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us