न्यू ईयरची रात्र गर्लफ्रेंडसोबत रिसॉर्टमध्ये घालवली, त्यानंतर ‘मुन्ना भाई MBBS’ मधला अभिनेता बेपत्ता झाला तो अजून सापडलेला नाही, आज 10 वर्ष होत आली
विशालने आईला त्याच्यासोबत ‘स्टार वार्स: द फोर्स अवेकन्स’ हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये यायला सांगितलं. पण आई सोबत गेली नाही. आजही विशालच्या आईला याची खंत वाटते. कारण ती शेवटची वेळ आहे, जेव्हा त्यांनी मुलाला पाहिलेलं.

बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरुपी घर केलं. संजय दत्त आणि अरशद वारसी यांचा ‘मुन्ना भाई MBBS’ अशाच चित्रपटांपैकी एक आहे. ‘मुन्ना भाई MBBS’ चित्रपटातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत. त्यात विशाल ठक्कर या अभिनेत्याने छोट्याशा रोलमधूनही आपली छाप उमटवलेली. प्रेयसीशी ब्रेक-अप झालं म्हणून तो रुग्णालयात दाखल असताना संजय दत्त त्याची समजूत काढतो. हा रोल विशाल ठक्करने केलेला. ‘मुन्ना भाई MBBS’ चित्रपट 2003 साली आलेला. या चित्रपटामुळे विशालचं नशीब चमकलं. त्याला अनेक चित्रपट आणि टीव्ही सीरिअल्स मिळाले. ‘टँगो चार्ली’ चित्रपटात त्याने काम केलं. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’, ‘थपकी प्यार की’, ‘आहट’ आणि ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिका, चित्रपट केले.
पण 2016 साली विशाल ठक्कर अचानक बेपत्ता झाला, तो कायमचाच. आज 10 वर्ष होत आली, पण विशाल कुठे आहे? काय करतो? या बद्दल काहीच माहिती नाहीय. विशाल सोबत काय झालं, आता या घटनेला 10 पेक्षा जास्त वर्ष होत आली, पण अजून काहीच शोध लागलेला नाही. आज विशालचं वय 40 वर्ष आहे. 31 डिसेंबर 2015 रोजी विशाल आपल्या कुटुंबासह मुलुंड येथील घरी होता. विशालने आईला त्याच्यासोबत ‘स्टार वार्स: द फोर्स अवेकन्स’ हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये यायला सांगितलं. पण आई सोबत गेली नाही. आजही विशालच्या आईला याची खंत वाटते. कारण ती शेवटची वेळ आहे, जेव्हा त्यांनी मुलाला पाहिलेलं.
कुटुंबासाठी त्याने केलेला हा शेवटचा मेसेज
रात्री 10.30 च्या सुमारास विशालने आईकडून 500 रुपये घेतले व घरातून बाहेर पडला. तासाभराने रात्री 1 च्या सुमारास त्याने वडिलांना मेसेज केला की, मी पार्टीला चाललोय. उद्या भेटू. कुटुंबासाठी त्याने केलेला हा शेवटचा मेसेज होता. विशालने 31 डिसेंबरची रात्री गर्लफ्रेंडसोबत अहमदाबाद हाय वे जवळच्या रिसॉर्टमध्ये घालवली अशी माहिती पोलिसांनी दिली. घरी परतताना दोघे घोडबंदर रोडवरच्या फाउंटन हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबलेले. निघताना विशाल अंधेरीत एका मित्राला भेटणार असल्याचं गर्लफ्रेंडला बोलला.
तिथे त्याला एका शूटसाठी जायचं होतं
1 जानेवारीच्या सकाळी 11.45 वाजता विशाल अंधेरीला जाण्यासाठी रिक्षा पकडताना दिसलेला. तिथे त्याला एका शूटसाठी जायचं होतं. त्याचा शेवटचा कॉल रेकॉर्डही घोडबंदर रोडच्या आसपासचा होता. दुपारी 12 च्या सुमारास विशालने फेसबुकवर नव्या वर्षाचा मेसेज पोस्ट केला. हा त्याचा शेवटचा मेसेज होता. यानंतर काही वेळाने त्याचा फोन बंद झाला तो पुन्हा कधी सुरुच झाला नाही.