Gautami Patil: तिने काही चुकीच्या गोष्टी केल्या हे मान्य पण..; गौतमी पाटीलबद्दल मराठी अभिनेता स्पष्टच बोलला

गौतमी पाटीलसोबत 'देवघर ऑन रेंट' या चित्रपटात काम करतानाचा अनुभव या अभिनेत्याने सांगितला आहे. तिने काही गोष्टी चुकीच्या केल्या, हे मान्य आहे, असं तो म्हणाला. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून निखिल चव्हाण आहे.

Gautami Patil: तिने काही चुकीच्या गोष्टी केल्या हे मान्य पण..; गौतमी पाटीलबद्दल मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
Gautami Patil
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 21, 2026 | 2:01 PM

Gautami Patil: गौतमी पाटील हे नाव सध्या महाराष्ट्रातील मनोरंजनविश्वात चांगलंच चर्चेत आहे. नृत्यांगना म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर आता गौतमी पाटील मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रातही पाऊल ठेवत आहे. तिचा ‘देवघर ऑन रेंट’ हा आगामी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात अभिनेता निखिल चव्हाणसोबत ती स्क्रीन शेअर करणार आहे. या निमित्ताने निखिलने गौतमीसोबत काम करण्याचा आपला अनुभव सांगितला आहे. निखिल चव्हाणने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गौतमीच्या कामाचं कौतुक केलं. त्याच्या मते, गौतमी तिच्या कामाकडे केवळ प्रसिद्धीच्या दृष्टीने पाहत नाही, तर ती त्याला एक कला आणि साधना मानते. तिच्या बोलण्यातून आणि वागण्यातून तिच्या कामाप्रती असलेली गंभीरता जाणवते, असं निखिलने सांगितलं.

गौतमीसोबत काम करताना आपल्याला तिचा मेहनती स्वभाव पाहायला मिळाला, असंही त्याने नमूद केलं. विशेष म्हणजे, शूटिंगचं वेळापत्रक अत्यंत व्यस्त असतानाही तिने कामाबाबत कोणतीही तक्रार केली नसल्याचं निखिलने सांगितलं. गौतमीच्या कामाच्या वेळेबद्दल सांगताना निखिलने एक किस्सा शेअर केला. त्यांचं एका गाण्याचं शूटिंग दुपारी साधारण दोन वाजता सुरू झालं होतं. त्याच दिवशी संध्याकाळी गौतमीचा एक कार्यक्रम होता. शूटिंग पूर्ण करून ती त्या कार्यक्रमासाठी गेली आणि इव्हेंट संपल्यानंतर पुन्हा शूटिंगसाठी परतली. यानंतर रात्री सुरू झालेलं शूटिंग पहाटे साधारण 4 ते 5.30 वाजेपर्यंत सुरू होतं. एवढं व्यस्त वेळापत्रक असूनही गौतमीने सेटवर कामाबद्दल कुरकुर केली नाही, असं निखिलने सांगितलं. तिच्या मेहनतीचं हे उदाहरण देताना त्याने तिच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचं कौतुक केलं.

गौतमी पाटीलच्या कामाचं कौतुक करत असतानाच निखिलने तिच्याशी संबंधित जुन्या वादांवरही आपलं मत मांडलं. तिच्याकडून काही चुका झाल्या आहेत, हे मान्य असल्याचं त्याने सांगितलं. मात्र, नृत्य सादरीकरणाला कला म्हणून पाहिलं गेलं पाहिजे, अशी त्याची भूमिका होती. “तिने काही गोष्टी चुकीच्या केल्या, हे मान्य आहे. महाराष्ट्राचा बिहार झाला नाही पाहिजे. महाराष्ट्रातील गोष्टी वेगळ्या आहेत. जे कलाकृती सादर करतील, त्यांना आधीच सांगा की या पद्धतीचे प्रकार इथे चालणार नाहीत. जर तिला सांगितलं तर ती नाही करणार”, असं तो म्हणाला.

कार्यक्रम आयोजित करताना कलाकारांना आधीच नियम आणि मर्यादा स्पष्टपणे सांगितल्या गेल्या, तर गैरसमज टाळता येऊ शकतात, असंही निखिलने म्हटलं. गौतमीला एखादी गोष्ट योग्य पद्धतीने सांगितली तर ती त्याचा विचार करेल, असं त्याने मुलाखतीत सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us