Tukaram Mundhe: ‘चला हवा येऊ द्या’मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा स्पष्ट नकार; म्हणाले..

Tukaram Mundhe: एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे जर 'चला हवा येऊ द्या'मध्ये आले असते, तर स्किटमध्ये त्यांचं पात्र कोणी साकारलं असतं, असा प्रश्न निलेश साबळे यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला.

Tukaram Mundhe: चला हवा येऊ द्यामध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा स्पष्ट नकार; म्हणाले..
निलेश साबळे, तुकाराम मुंढे
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 18, 2026 | 3:26 PM

महाराष्ट्रात सध्या आपल्या धडक कारवायांमुळे चर्चेत असलेले अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबद्दल मनोरंजन क्षेत्रातही चर्चा रंगताना दिसत आहे. ‘चला हवा येऊ द्या’चे माजी सूत्रसंचालक आणि अभिनेते निलेश साबळे यांना एका मुलाखतीत तुकाराम मुंढे कार्यक्रमात आले असते, तर त्यांची भूमिका स्किटमध्ये कोणी साकारली असती, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर निलेश साबळे यांनी दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे. निलेश साबळे यांनी ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल भाष्य केलं. ‘चला हवा येऊ द्या’मध्ये विविध सेलिब्रिटींच्या भूमिका भाऊ कदम यांनी साकारल्याचा संदर्भ देत निलेश यांनी यावेळी वेगळाच किस्सा सांगितला.

तुकाराम मुंढे यांची भूमिका कोण साकारेल, या प्रश्नावर निलेश साबळे यांनी सुरुवातीला मिश्कीलपणे “तुम्हीच अंदाज बांधा”, असं म्हटलं. त्यानंतर त्यांनी स्वतःचं नाव घेत सांगितलं की, त्यांच्या अंगकाठीमुळे ते काही प्रमाणात मुंढेंसारखे वाटू शकले असते. मात्र, त्यानंतर त्यांनी या भूमिकेचा विचारच का केला नसता, याचं कारणही स्पष्ट केलं. निलेश साबळे यांनी सांगितलं की, ‘चला हवा येऊ द्या’मध्ये एखादा सेलिब्रिटी आला की भाऊ कदम त्याची भूमिका साकारत असत. संबंधित सेलिब्रिटीला भाऊ कदम यांची नक्कल पाहून हसू यायचं आणि त्यातून स्किटमध्ये आणखी रंगत निर्माण व्हायची. मात्र, तुकाराम मुंढे कार्यक्रमात आले असते तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची थेट नक्कल करण्याऐवजी वेगळं स्किट करण्याचा विचार केला असता, असं निलेश यांनी सांगितलं.

यामागचं कारण सांगताना निलेश साबळे यांनी तुकाराम मुंढे यांच्याबद्दल ‘आदरयुक्त भीती’ असल्याचं म्हटलं. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखेची नक्कल करण्याचं धाडस कोण करेल, असा सवालही त्यांनी गमतीने केला. तुकाराम मुंढे सध्या अन्न आणि औषध प्रशासनातील कारवायांमुळे चर्चेत आहेत. हॉटेल्स, कॅन्टीन, रुग्णालये तसेच अन्नपदार्थांमधील भेसळ यासंदर्भात FDAकडून सुरू असलेल्या कारवायांकडे राज्याचं लक्ष वेधलं गेलं आहे. निलेश साबळे यांनी या कारवायांचा उल्लेख करताना हा विषय सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेला असल्याचं सांगितलं. जोपर्यंत तुकाराम मुंढेंसारखी लोकं आहेत, तोपर्यंत सर्वसामान्यांनी भ्यायचं काही कारण नाही, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us