Guess Who : 20 वर्षांपूर्वी सोनाली बेंद्रेकडून स्वीकारलं बक्षीस, फोटोमधली ही चिमुकली आजची मराठीतील आघाडीची अभिनेत्री; ओळखलं का?

अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि प्राजक्ता माळी यांच्या भेटीने चाहत्यांना आनंद झाला आहे. २० वर्षांपूर्वी सोनालीने चिमुकल्या प्राजक्ताला एका डान्स शोमध्ये बक्षीस दिले होते. हास्यजत्रेच्या सेटवर या दोघींची पुन्हा भेट झाली, तेव्हा प्राजक्ताने तो जुना फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला. बालपणीच्या बक्षीस विजेतीपासून लोकप्रिय अभिनेत्रीपर्यंतचा प्राजक्ताचा प्रवास या भेटीने अधोरेखित झाला.

Guess Who :  20 वर्षांपूर्वी सोनाली बेंद्रेकडून स्वीकारलं बक्षीस, फोटोमधली ही चिमुकली आजची मराठीतील आघाडीची अभिनेत्री; ओळखलं का?
| Updated on: Oct 14, 2026 | 2:41 PM

Prajakta Mali – Sonali Bendre : 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने आणि मोहक हास्याने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करते. हिंदी चित्रपटांसोबतच तिने मराठी मनोरंजनविश्वातही आपली छाप पाडली आहे. सध्या सोनाली तिच्या आगामी ‘सोहळा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच निमित्ताने ती विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसत आहे. नुकतीच सोनाली बेंद्रेने ‘कोण होणार करोडपती’ या मराठी क्विझ शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिची आणि बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितची पहिल्यांदाच भेट झाली. दोघींच्या गप्पा, त्यांच्यातील धमाल आणि एकत्रित फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. त्यानंतर सोनालीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातही सहभाग घेतला. यावेळी तिने हास्यजत्रेतील कलाकारांसोबत मनमुराद गप्पा मारल्या आणि धमाल केली.

मात्र, या कार्यक्रमातील एका खास गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची सूत्रसंचालक आणि लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्यासाठी सोनालीसोबतची ही भेट केवळ एक साधी भेट नव्हती. कारण, या दोघींची भेट तब्बल 20 वर्षांपूर्वीही झाली होती. प्राजक्ताने सोशल मीडियावर त्या जुन्या भेटीचा फोटो शेअर करत आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Loading...

20 वर्षांपूर्वी सोनाली बेंद्रेकडून मिळालं होतं बक्षीस !

प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील एक फोटो सध्याचा, तर दुसरा जवळपास 20 वर्षांपूर्वीचा आहे. जुन्या फोटोमध्ये सोनाली बेंद्रे एका लहान मुलीला बक्षीस देताना दिसत आहे. उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट होत असताना ही चिमुकली आनंदाने बक्षीस स्वीकारताना दिसते. विशेष म्हणजे, ही छोटी मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून आजची लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आहे.

प्राजक्ताने 2004 मध्ये ‘क्या मस्ती क्या धूम’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी ती अगदी लहान होती. या कार्यक्रमात सोनाली बेंद्रे परीक्षकाच्या भूमिकेत होती. याच शोदरम्यान सोनालीच्या हस्ते प्राजक्ताला बक्षीस मिळाले होते. त्या खास क्षणाचा फोटो प्राजक्ताने आता चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

प्राजक्ताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये जुन्या आठवणींसोबत सध्याच्या भेटीची झलकही पाहायला मिळते. एका फोटोत सोनाली बेंद्रेकडून बक्षीस स्वीकारणारी लहानगी प्राजक्ता दिसते, तर दुसऱ्या फोटोत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील दोघींची भेट पाहायला मिळते. ‘Then and Now’ या स्वरूपात शेअर केलेल्या या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे, ज्या सोनाली बेंद्रेकडून प्राजक्ताने बालपणी बक्षीस स्वीकारलं होतं, त्याच सोनालीसमोर तिला पुन्हा एकदा नृत्य करण्याची संधी मिळाली. यावेळी प्राजक्ताने सोनालीच्याच गाण्यावर तिच्यासमोर डान्स केला. त्यामुळे हा क्षण तिच्यासाठी अधिकच खास ठरला.

प्राजक्ताने या पोस्टसोबत, “तिच्याच गाण्यावर तिच्यासमोर डान्स करण्याची संधी मिळाली. आजचा एपिसोड चुकवू नका,” अशी कॅप्शनही दिली. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत असून, दोघींच्या जुन्या आणि नव्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

प्राजक्ता माळीचा प्रवास

प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी मनोरंजनविश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. त्यानंतर ‘हम्पी’, ‘डोक्याला शॉट’ यांसारख्या चित्रपटांमधूनही तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली. अभिनयासोबतच प्राजक्ता सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती आपल्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण, कुटुंबीयांसोबतचे फोटो आणि चित्रीकरणादरम्यानच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर करते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us