Pravin Tarde: तो तरडे लय माजोरडा.. बोलण्याच्या पद्धतीवरून टीका करणाऱ्यांना प्रवीण तरडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले ‘आमची आय-माय काढली तर..’

Pravin Tarde: निर्माते-दिग्दर्शक प्रवीण तरडे हे एका मुलाखतीत त्यांच्या बेधडक स्वभावाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. अशा स्वभावामुळे काहींना वाटतं मी खूप माजोरडा आहे, असं सांगत त्यांनी त्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे.

Pravin Tarde: तो तरडे लय माजोरडा.. बोलण्याच्या पद्धतीवरून टीका करणाऱ्यांना प्रवीण तरडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले आमची आय-माय काढली तर..
Pravin Tarde
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 23, 2026 | 10:09 AM

अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि बेधडक स्वभावासाठी ओळखले जातात. यामुळे अनेकदा त्यांच्यावर टीका होते आणि त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. एका मुलाखतीत प्रवीण तरडे याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. आपल्या अशा स्वभावामागचं कारणही त्यांनी सांगितलं. आपल्या अशा वागण्या-बोलण्यामुळे लोकांना अनेक गैरसमज होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. “तो तरडे, तो लय शहाणा आहे, लय माजोरडा आहे… असं म्हणतात. मी काय माज केला बाबा तुझा? काय तुझे दोन रुपये चोरले का? माज केला म्हणजे काय केलं? ते म्हणतात, त्याची बोलण्याची पद्धत बघा.. मग मी कसा बोलू? मी आलोय मुळशी तालुक्यातून,” असं ते म्हणाले.

“प्रत्येकाची बोलण्याची एक पद्धत असते. सुबोध भावे, नागराज मंजुळे, स्वप्निल जोशी.. या सर्वांची बोलण्याची एक पद्धत आहे. कारण त्याला तशी सामाजिक, भौगोलिक पार्श्वभूमी आहे. मी गावाकडचा आहे. दुसऱ्या हाक मारायची असली तरी आम्हाला मोठ्यानेच बोलावं लागतं. पूर्वी ग्रामीण भागातून आलेल्या लोकांना पोटतिडकीने लोकांना एखादी गोष्ट पटवून द्यावी लागायची. तेच करत करत इथवर आलो. आता लोकं ऐकू लागली म्हणून मी अचानक माझं बोलणं बदललं, तर जास्त ट्रोल होईन. त्यापेक्षा मी आहे तसाच बोलणार. वागणं-बोलणं बदललं तर माणूस विचित्र होतो. तो खोटा होतो,” असं तरडेंनी पुढे सांगितलं.

Loading...

आपण अगदी स्पष्ट आणि बिनधास्त बोलणारे आहोत, असं सांगत असतानाच त्यांनी कोणालाही जुमानत नसल्याचंही स्पष्ट केलं. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “माझं बोलणं, माझी स्टाइल.. ही माझ्या सामाजिक, भौगोलिक वातावरणातून आलेली आहे. वाचनाने मी समृद्ध झालोय, बदललेलो नाहीये. अभ्यास तुम्हाला शांत करू शकतो पण तुमचा मूळ स्वभाव बदलू शकत नाही. माझ्याशी कोणी आई-माईवरून बोलायला लागलं तर माझ्याइतका डेंजर माणूस नाही. तुम्ही आमची आय-माय काढली तर आम्ही तुमची आय-माय काढू. पण तुम्ही आम्हाला माऊली म्हणून नमस्कार केला, तर आम्हीसुद्धा तुम्हाला माऊली म्हणून नमस्कार करू. तुम्ही माझ्या देवा-धर्मावर बोललात, तर मी आक्रमक होणारच, मी असा कलाकार नाहीये, जो मूग गिळून गप्प बसेल.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us