प्रसाद नाकारला असता तर तुम्ही..; ट्रोल करणाऱ्यांना रेमो डिसूझाच्या पत्नीचं सडेतोड उत्तर
कोरिओग्राफर रेमो डिसूझाची पत्नी लिझेल हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावरू नेटकरी तिला खूप ट्रोल करत आहेत. गणपती बाप्पासमोर प्रार्थना करताना ती काहीतरी खात असल्याचं या व्हिडीओत दिसलं.

कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाची पत्नी लिझेल डिसूजा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. गणपती विसर्जनादरम्यानचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये लिझेल गणपती बाप्पासमोर प्रार्थना करताना आणि त्याच वेळी प्रसाद खाताना दिसत आहे. याच दृश्यावरून काही सोशल मीडिया युजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता लिझेलनेही टीकेवर मौन न बाळगता थेट उत्तर दिलं आहे. रेमो आणि लिझेल डिसूझा दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत गणेशोत्सव साजरा करत होते. 16 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जनाच्या वेळी विविध धार्मिक विधींमध्ये दोघे सहभागी झाले होते. याचदरम्यान लिझेलचा एक व्हिडीओ समोर आला.
व्हिडीओमध्ये लिझेल गणपती बाप्पाच्या कानात काहीतरी सांगताना दिसते. ती त्यावेळी काहीतरी खात असल्याचंही स्पष्टपणे दिसत होतं. बाप्पासमोर मनोकामना व्यक्त करताना ती प्रसाद खात असल्याचं पाहून काही नेटकऱ्यांनी तिच्या कृतीवर आक्षेप घेतला. विशेषतः पूजा करताना तोंडात काहीतरी असल्याबद्दल सोशल मीडिया युजर्सनी प्रश्न उपस्थित केले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये लिझेलला ट्रोल करण्यात आलं. काही युजर्सनी तिच्या कृतीची खिल्ली उडवली, तर काहींनी पूजा करण्याची पद्धत योग्य नसल्याचं म्हटलं. काही कमेंट्समध्ये तिने आधी प्रसाद खाऊन घ्यायला हवा होता, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या.
सततच्या कमेंट्सनंतर लिझेलने स्वतःच ट्रोलर्सना उत्तर दिलं. तिने स्पष्ट केलं की ती खात असलेला पदार्थ नारळाचा प्रसाद होता. त्यामुळे तो न खाल्ल्यास उलट लोकांनी आपण बाप्पाचा प्रसाद नाकारत असल्याची टीका केली असती, असं तिने म्हटलं. लिझेलने आपल्या उत्तरातून बाप्पाबद्दल श्रद्धा व्यक्त करत “बाप्पा सगळं समजतात” असा आशय मांडला. तिच्या म्हणण्यानुसार, प्रसाद म्हणून मिळालेला नारळ तिने खाल्ला होता आणि त्यामुळे तिच्या भक्तीवर प्रश्न उपस्थित करण्याची गरज नाही.
लिझेल डिसूजा ही रेमो डिसूजाची पत्नी असून ती स्वतःही मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहे. ती प्रोड्यूसर आणि कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम करते. लिझेल आणि रेमो यांनी 1998 मध्ये लग्न केलं असून त्यांना दोन मुलं आहेत.