Resham Tipnis: दार उघडलं की माझी वाट बघणारं कोणीच नसतं..; रेशम टिपणीसला हवाय आयुष्याचा जोडीदार, व्हिडीओ चर्चेत
Resham Tipnis: अभिनेत्री रेशम टिपणीसने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. दिवसाच्या शेवटी आपली वाट पाहणारं कोणीतरी असावं, असं तिने म्हटलंय.

Resham Tipnis: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रेशम टिपणीस सध्या एका खास व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. आपल्या अभिनयाने आणि बिनधास्त स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या रेशमने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मनातील एक भावना व्यक्त केली आहे. आयुष्यात सर्व काही असलं, तरी दिवसाच्या शेवटी आपली वाट पाहणारं कोणीतरी असावं, असं तिला वाटू लागलं आहे. घरी गेल्यानंतर प्रेमाने मिठी मारणारी, गरमागरम कॉफी देणारी आणि दिवसभरातील गोष्टी शांतपणे ऐकून घेणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात असावी, अशी इच्छा तिने व्यक्त केली. तिच्या या व्हिडीओमुळे ती पुन्हा लग्न करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
रेशम टिपणीसने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती म्हणते की, ती एक स्वावलंबी आणि सशक्त स्त्री आहे. आयुष्यात अनेकदा अडचणी आल्या, संघर्ष करावा लागला; पण प्रत्येक वेळी स्वतःला सावरून तिने नव्या जोमाने कामाला सुरुवात केली. स्वतःच्या हिमतीवर आयुष्य जगताना तिने अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. मात्र, आता दिवसाच्या शेवटी घरी परतल्यावर आपली वाट पाहणारं कोणीतरी असावं, असं तिला वाटू लागलं आहे. घराचं दार उघडल्यानंतर समोर कोणीच नसण्याची भावना तिने व्हिडीओमध्ये व्यक्त केली. आपल्याला पाहून आनंदी होणारी, प्रेमाने मिठी मारणारी आणि दिवसभर काय घडलं हे विचारणारी व्यक्ती आयुष्यात असावी, अशी तिची इच्छा आहे. म्हणूनच तिने गंमतीशीरपणे आपण ‘श्रीमानच्या शोधात’ असल्याचं सांगितलं.
पहा व्हिडीओ-
रेशमने आपल्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षाही अगदी साध्या आणि मनाला भिडणाऱ्या शब्दांत सांगितल्या आहेत. दिवसभर काम करून घरी आल्यानंतर कोणीतरी प्रेमाने स्वागत करावं, एक उबदार मिठी मारावी आणि गरमागरम कॉफी द्यावी, असं तिला वाटतं. तसंच, दिवसभरात काय घडलं, कोणत्या अडचणी आल्या किंवा कोणत्या गोष्टीमुळे आनंद झाला, हे सांगताना समोरच्या व्यक्तीने शांतपणे ऐकून घ्यावं आणि समजून घ्यावं, अशीही तिची अपेक्षा आहे.
या व्हिडीओसोबत तिने कॅप्शनमध्येही आपल्या भावना व्यक्त केल्या. कधी कधी आयुष्यात कोणीतरी सोबत असावं असं वाटतं आणि एका नव्या सुरुवातीची प्रतीक्षा असते, असं तिने म्हटलं आहे. रेशम टिपणीसने 1993 मध्ये अभिनेता संजीव सेठ यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नाच्या सुमारे 11 वर्षांनंतर 2004 मध्ये दोघं विभक्त झाले. या नात्यातून तिला मानव आणि रिशिका अशी दोन मुलं आहेत. त्यानंतर रेशमने आपल्या करिअरवर आणि वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित केलं.