Sachin Pilgaonkar: मराठीतल्या दिग्गजांनी ते केलंय, जे मला कधीच आवडलं नाही..; सचिन पिळगांवकरांचा रोख कुणाकडे?

Sachin Pilgaonkar: नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेते सचिन पिळगांवकर यांना मराठी कलाकारांना हिंदी चित्रपटांमध्ये दिल्या जाणाऱ्या दुय्यम भूमिकांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं.

Sachin Pilgaonkar: मराठीतल्या दिग्गजांनी ते केलंय, जे मला कधीच आवडलं नाही..; सचिन पिळगांवकरांचा रोख कुणाकडे?
Sachin Pilgaonkar
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 19, 2026 | 11:17 AM

Sachin Pilgaonkar: मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगांवकर आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. चित्रपटसृष्टीतील विविध विषयांवर ते अनेकदा आपली ठाम मतं मांडताना दिसतात. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम भूमिकांवर भाष्य केलं आहे. हिंदी चित्रपटांमध्ये काम मिळतंय म्हणून कोणतीही भूमिका स्वीकारणं योग्य नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हिंदी चित्रपटांमधील भूमिकांचाही उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठी कलाकारांच्या हिंदी चित्रपटांमधील स्थानाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

हिंदी चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांना अनेकदा दुय्यम भूमिका दिल्या जातात, याबाबत विचारलं असता सचिन पिळगांवकर यांनी कलाकारांनीही आपल्या भूमिकांची निवड काळजीपूर्वक करायला हवी, असं सांगितलं. ते म्हणाले, “दुय्यम रोल देणं ही एक गोष्ट झाली, पण दुय्यम रोल घेणं हीसुद्धा एक गोष्ट झाली ना? तुम्ही घेऊ नका ना. जर तुम्हाला तसं वाटत असेल तर घेऊ नका.” पुढे त्यांनी सांगितलं की, एखाद्या कलाकाराला भूमिकेबद्दल आक्षेप असेल, तर ती भूमिका नाकारण्याचा पर्याय त्याच्याकडे असतो. “जर तुम्ही घेतलं तर दोष दोघांना जातो आणि घेणाऱ्यांना जास्त जातो,” असं म्हणत त्यांनी कलाकारांच्या निर्णयक्षमतेवर भर दिला.

Loading...

या मुलाखतीत सचिन पिळगांवकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या हिंदी चित्रपटांमधील कारकिर्दीचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, या दोघांनी हिंदी चित्रपटांमध्ये प्रामुख्याने विनोदी भूमिका साकारल्या. त्यांच्या मते, या कलाकारांनी हिंदी चित्रपटांमध्ये नायकाच्या भूमिका केल्या नाहीत, तर विनोदी कलाकार म्हणून आपली ओळख निर्माण केली. याउलट नाना पाटेकर आणि अमोल पालेकर हे हिंदी चित्रपटांमध्ये नायक म्हणूनही झळकले होते, असं त्यांनी नमूद केलं. प्रत्येक कलाकाराची भूमिका आणि त्याने निवडलेला मार्ग वेगळा असतो, हे सांगताना सचिन यांनी या कलाकारांच्या कारकिर्दीतील फरक अधोरेखित केला.

“माझ्या मते, हिंदी मिळतंय म्हणून कोणत्याही भूमिकेला हो म्हणणं हे योग्य नाही. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीच्या दिग्गजांनी ते केलं आहे. खूप दिग्गजांनी ते केलं आहे, जे मला कधीच आवडलं नाही. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी कधीच हिंदीत दुय्यम भूमिका केल्या नाहीत. नाना पाटेकर आणि अमोल पालेकर हे दोघं हिंदी चित्रपटांचे हिरो होते. तर दुसरीकडे लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे दोघं हिंदीत कधीच हिरो नव्हते. त्यांनी आतापर्यंत कॉमेडियन्स म्हणूनच हिंदीत काम केलं आहे आणि कॉमेडियनला नेहमी दुय्यम भूमिकाच करावी लागते. कॉमेडियन हिरो असू शकत नाही. त्या दोघांना कॉमेडियनच व्हायचं होतं, त्यांना कधी हिरो बनायचंच नव्हतं. आज लक्ष्या असता, तर त्यानेही हेच उत्तर दिलं असतं. त्याच्या वतीने मी हे उत्तर देतोय. कारण तो लक्ष्या आजही माझ्यात जगतो, इतका चांगला मित्र होता तो माझा,” अशा शब्दांत ते व्यक्त झाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us