तू माझ्यासाठी थांबू नकोस, डॉक्टरांनी मला सांगितलंय..; लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण सांगताना सचिन पिळगांवकर भावूक
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेते सचिन पिळगांवकर हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाची एक भावूक आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगांवकर आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. दोघांनीही आपल्या अभिनयाने आणि विनोदी शैलीने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्षं राज्य केलं. पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या दोन मित्रांच्या नात्यातही तितकाच जिव्हाळा होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सचिन पिळगांवकर यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयीचा एक भावनिक किस्सा सांगितला. ‘नवरा माझा नवसाचा’ या गाजलेल्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांना महत्त्वाची भूमिका द्यायची होती. मात्र, त्यावेळी ते आजारी असल्याने ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. या आठवणी सांगताना सचिन पिळगांवकर भावूक झाले.
‘लक्ष्या आजही माझ्यात जिवंत’
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी बोलताना सचिन पिळगांवकर म्हणाले की, “लक्ष्या आजही माझ्यात जगतो, इतका तो माझा चांगला मित्र होता.” आज लक्ष्मीकांत बेर्डे असते, तर त्यांनी आणखी अनेक चित्रपट केले असते आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं असतं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे रुग्णालयात होते. आजारपणामुळे त्यांचं काम थांबलं होतं आणि त्यांच्याकडे नवीन चित्रपटही नव्हता. अशा परिस्थितीत सचिन यांनी त्यांची भेट घेऊन आपल्या चित्रपटात काम करण्याची विनंती केली होती.
सचिन यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटात काम करण्याविषयी सांगितलं, तेव्हा त्यांनी आपल्या प्रकृतीची चिंता व्यक्त केली. मात्र, सचिन यांनी त्यांना धीर दिला. ‘मी थांबतो तुझ्यासाठी, काहीच काळजी करू नकोस,’ असं आश्वासन त्यांनी मित्राला दिलं होतं. हे ऐकल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या डोळ्यांत चमक आली होती. मात्र, नंतर त्यांनी सचिन यांना बोलावून एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. डॉक्टरांनी आपल्याला आता पूर्वीसारखी मेहनत करणं शक्य होणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे माझ्यासाठी तू तुझ्या चित्रपटाचं काम थांबवू नकोस, असं लक्ष्मीकांत यांनी सचिन यांना सांगितलं होतं.
‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी साकारलेली बाबू कालियाची भूमिका मूळतः लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासाठी विचारात घेतली होती. चित्रपटाच्या कथानकात ही भूमिका महत्त्वाची होती. लक्ष्मीकांत यांनी ती साकारली असती, तर आपल्या खास विनोदी शैलीत त्यांनी त्या व्यक्तिरेखेला वेगळी उंची दिली असती, असं सचिन यांनी सांगितलं. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं. त्यामुळे त्यांना या चित्रपटात पाहण्याची इच्छा अपूर्ण राहिली.
‘माझ्या विनोदी मित्राला माझा हा विनोद अर्पण’
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणी जपण्यासाठी सचिन यांनी चित्रपटाच्या सुरुवातीलाच त्यांचा फोटो दाखवला होता. त्यासोबत ‘माझ्या विनोदी मित्राला माझा हा विनोद अर्पण’ असा संदेशही दिला होता. चित्रपटगृहात प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहताना लक्ष्मीकांत यांचा फोटो पडद्यावर झळकताच टाळ्यांचा कडकडाट झाला. तेव्हा आपल्याला लक्ष्मीकांत यांचा आशीर्वाद मिळाल्याची जाणीव झाली, असं सचिन यांनी सांगितलं.