आयुष्यभर मनात जपून ठेवीन..; ‘छावा’ फेम अभिनेत्रीचा दुर्दैवी शेवट, ताराबाईंच्या भूमिकेबद्दल व्यक्त केली होती भावना

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या चित्रपटात भूमिका साकारलेल्या अभिनेत्रीचा दुर्दैवी शेवट झाला. रविवारी संध्याकाळच्या सुमारास राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतला. संचिता उगळे असं या अभिनेत्रीचं नाव आहे.

आयुष्यभर मनात जपून ठेवीन..; छावा फेम अभिनेत्रीचा दुर्दैवी शेवट, ताराबाईंच्या भूमिकेबद्दल व्यक्त केली होती भावना
संचिता उगळे
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 15, 2026 | 1:40 PM

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री संचिता उगळेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. आईवडील आणि बहिणीसोबत नालासोपारा इथं राहणाऱ्या संचिताने रविवारी संध्याकाळच्या सुमारास स्वत:चं आयुष्य संपवलं. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा ती घरात एकटीच होती. संचिताने असं का केलं, यामागचं कारण अद्याप समोर आलं नाही. ती टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा होती. तिने बऱ्याच लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. मात्र विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटातील भूमिकेमुळे ती अधिक प्रकाशझोतात आली होती.

‘छावा’मधील भूमिका

संचिता उगळेनं लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात ताराबाईंची भूमिका साकारली होती. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली होती. यामध्ये रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, डायना पेंटी, दिव्या दत्ता, आलोक नाथ, आशुतोष राणा यांच्यासह इतरांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘छावा’मध्ये अभिनेता वरुण बुद्धदेवने छत्रपती राजाराम महाराजांची भूमिका साकारली होती. तर संचिता त्यांची पत्नी ताराबाईंच्या भूमिकेत होती.

Loading...

या चित्रपटाबद्दल संचिता एका मुलाखतीत म्हणाली होती, “या यशस्वी चित्रपटाचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. इतिहासातील इतकी महत्त्वपूर्ण भूमिका साकारायला मिळणं हा एक आशीर्वाद होता. मी आयुष्यभर हा अनुभव माझ्या मनात जपून ठेवीन. इतक्या प्रसिद्ध कलाकारांसोबत आणि टीमसोबत काम करणं हा माझ्यासाठी शिकण्याचा अनुभव होता. मला अशाच आणखी सुंदर भूमिका साकारायला आवडतील. मला प्रेक्षकांकडून सोशल मीडियावर खूप प्रशंसा आणि कौतुक मिळालं.”

करिअर आणि आयुष्याच्या बाबतीत इतकी सकारात्मक असलेल्या संचिताने असं टोकाचं पाऊल का उचललं, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. संचिताने ‘कुमकुम भाग्य’, ‘वागळे की दुनिया’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. संचिताने आत्महत्या का केली, याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. यादरम्यान तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आत्महत्येच्या काही तासांपूर्वीचा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us