हा खऱ्या आयुष्यातही कबीर सिंगसारखाच वागतो..; पापाराझींवर चिडल्याने शाहिद ट्रोल

| Updated on: Apr 23, 2024 | 4:24 PM

जिम, रेस्टॉरंट, कॅफे.. सेलिब्रिटी कुठेही असले की पापाराझी त्यांच्या मागोमाग पोहोचतात. खासगी आयुष्यातही मोकळा वेळ मिळत नसल्याने अनेक सेलिब्रिटी या पापाराझींवर राग व्यक्त करताना दिसतात. शाहिदचा असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हा खऱ्या आयुष्यातही कबीर सिंगसारखाच वागतो..; पापाराझींवर चिडल्याने शाहिद ट्रोल
Shahid Kapoor and Mira Rajput
Image Credit source: Instagram
Follow us on

गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये पापाराझी कल्चर प्रचंड वाढलंय. सेलिब्रिटी कुठेही गेले की त्यांच्या पाठोपाठ पापाराझी तिथे पोहोचलेले असतात. पापाराझी सतत पाठलाग करत असल्याने सेलिब्रिटीसुद्धा अनेकदा वैतागतात. असंच काहीसं अभिनेता शाहिद कपूरसोबत घडलं. शाहिद त्याची पत्नी मिरा राजपूतसोबत नुकताच डिनर डेटला गेला होता. यावेळी पापाराझींनी त्याचे आणि मीराचे फोटो, व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. तेव्हा शाहिदचा राग अनावर झाला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पापाराझींच्या घोळक्यामुळे वैतागलेला शाहिद या व्हिडीओत म्हणतोय, “कृपया तुम्ही हे थांबवणार का? तुम्ही जरा स्वत:ला आवरा.” त्याच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी त्याच्या या वागण्याची तुलना कबीर सिंग या भूमिकेशी केली. ‘कबीर सिंग’ या चित्रपटात शाहिदने अत्यंत तापट स्वभावाच्या मुलाची भूमिका साकारली होती. ‘हा खऱ्या आयुष्यातही स्वत:ला कबीर सिंग समजतोय’, असं एकाने लिहिलं. तर ‘शाहिदचा कबीर सिंह मोड ऑन’ असं दुसऱ्याने म्हटलंय. काहींनी शाहिदचीही बाजू घेतली आहे. ‘सतत पाठलाग केला तर कोणीही वैतागणार’, असं म्हणत नेटकऱ्यांनी शाहिदची बाजू घेतली.

हे सुद्धा वाचा

शाहिद आणि मीराने जुलै 2015 मध्ये लग्न केलं. या दोघांना सात वर्षांची मुलगी मिशा आणि चार वर्षांचा मुलगा झैन आहे. शाहिद हा पंकज कपूर आणि नीलिमा आझमी यांचा मुलगा आहे. त्याचा छोटा भाऊ इशान खट्टर याने ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शाहिद नुकताच ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये त्याने क्रिती सनॉनसोबत भूमिका साकारली होती.

2019 मध्ये शाहिद कपूरचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. मात्र त्यावरून टीकासुद्धा झाली. शाहिदने साकारलेल्या कबीर या भूमिकेवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. गर्लफ्रेंडच्या कानाखाली वाजवणारा अत्यंत तापट मुलगा, अशी चित्रपटात कबीरची प्रतिमा असते.