Sharad Kapoor : अनेकजण त्याच्या मरणाची वाट बघत होते, अन्…शरद कपूरच्या केअरटेकरचा मोठा दावा
Hema Chaudhary On Sharad Kapoor : शरद कपूरची केअरटेकर हेमा चौधरीनं त्याच्याबद्दल मोठा दावा केला आहे.

बॉलिवूड अभिनेता शरद कपूरच्या अवस्थेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो बऱ्याच काळापासून कामापासून दूर आहे, त्याचबरोबर तो आर्थिक अडचणींचाही सामना करत आहे. सलमान खानपासून सोनू सूदपर्यंत, ‘जोश’ आणि ‘जय हो’ सारख्या चित्रपटांतील या लोकप्रिय अभिनेत्याला मदत करण्यासाठी सर्वजण पुढे आले आहेत. शरद कपूरची मैत्रीण हेमा चौधरीनं अभिनेत्याच्या गंभीर परिस्थितीबद्दल अनेक नवीन आणि धक्कादायक दावे केले आहेत. शरद जिथे राहतो, त्याच इमारतीत हेमा कुत्र्यांना वाचवण्यासाठी गेली होती. ती ‘बेजुबान ट्रस्ट’ नावाची श्वान बचाव संस्था चालवते. हेमानं सांगितलं की, शरद कपूर गेल्या दोन वर्षांपासून आपल्या खोलीतून बाहेर पडला नव्हता, तसंच त्यानं दोन वर्षांत अंघोळही केली नव्हती.
काय म्हणाली हेमा चौधरी?
‘बॉलिवूड कट अनकट’ पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत, हेमा चौधरीनं शरद कपूरच्या कौटुंबिक कलहाबद्दलही संशय व्यक्त केला. हेमानं सांगितलं की, तिनं अभिनेत्याच्या भावाशी संवाद साधला. त्यानं सुरुवातीला सांगितलं की, तो आपल्या लहान भावाला घेण्यासाठी आला होता. मात्र, जेव्हा त्यांनी पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कोणीही उत्तर दिलं नाही. हे मालमत्तेचं प्रकरण असू शकतं.
हेमा चौधरीनं पुढे सांगितलं की, काही लोक अभिनेत्याच्या मरणाची वाट पाहत होते. ती म्हणाली की, ‘तीन-चार लोक तर त्याच्या मरणाचीच वाट पाहत होते. तो जवळपास पूर्णपणे थकून गेला होता, पण कुत्र्यांमुळे मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकले. जेव्हा मी कुत्र्यांना वाचवायला गेले, तेव्हा मी त्याला पाहिलं. त्यानं दोन वर्षांत अंघोळ केली नव्हती किंवा अंथरुणातून उठला नव्हता. कोणी त्याला फोनही केला नाही किंवा जेवण झालं का, असंही विचारलं नाही. अशा प्रकारे तो हळूहळू मृत्यूच्या दिशेनं जात होता.’
जर शरद कपूर त्या अवस्थेत आणखी काही काळ राहिला असता, तर त्याचा जीव गेला असता, असंही हेमा म्हणाली. हेमा तिथं अभिनेत्याच्या कुत्र्यांना वाचवण्यासाठी गेली होती, पण शरदची अवस्था पाहून तिनं अभिनेत्यालाही वाचवलं. आता, शरदच्या कुटुंबीयांच्या अनुपस्थितीत, ती अभिनेत्याची काळजी घेत आहे. शरद कपूर यांचं पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांची नात कोयल बसू हिच्याशी साखरपुडा झाला होता, पण त्यांचं लग्न कधीच झालं नाही, असंही हेमानं सांगितलं.
शरद कपूरला एक गर्लफ्रेंड आहे, पण ती त्याची काळजी घेऊ शकत नाही. अलीकडेच, शरदला एक मूल असल्याची अफवा पसरली होती. हेमा म्हणाली, ‘शरदने मला सांगितलं आहे की, योग्य वेळ आल्यावर मी माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सर्व काही उघड करेन.’ शरद कपूरने आपला पहिला हॉलिवूड चित्रपट साइन केल्याचंही समोर आलं आहे. हेमा म्हणाली, ‘तो मानसिकदृष्ट्या स्थिर नाहीये आणि म्हणूनच तो माध्यमांसमोर असे मोठे दावे करत आहे.’
बार्सिलोनामध्ये फुटबॉल खेळताना शरद कपूरच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झालेलं. परिणामी, तो बराच काळ अंथरुणाला खिळला होता आणि त्याला चालण्यासाठी वॉकरचा वापर करावा लागला. तो डिप्रेशन आणि मानसिक तणावाशीही झुंज देत आहे. आर्थिक अडचणी आणि पायाच्या दुखापतीमुळे तो आपल्या चार पाळीव प्राण्यांची काळजी घेऊ शकला नाही. त्यामुळे, त्याला कुत्र्यांना तात्पुरतं मुंबईतील एका प्राणी निवारागृहात पाठवावं लागलं.