‘ये प्रेम मोल लिया’ च्या गाण्यावर माधुरी दीक्षित-शर्वरीने धरला ठेका, धमाकेदार डान्स पाहून चाहते फिदा
शर्वरी वाघने तच्या आगामी 'ये प्रेम मोल लिया' फिल्मच्या टायटल ट्रॅकवर माधुरी दीक्षितसह डान्स केला. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत असून दोघींचं एकत्र नृत्य पाहून चाहते सुखावले. त्याववर विविध कमेंट्सही आल्या. नोव्हेंबरच्या अखेरीस हा चित्रपट रिलीज होणार आहे.

अभिनेत्री शर्वरी वाघ सध्याची चर्चेतली अभिनेत्री आहे. तिने नुकतंच राजश्री सिनेमाच्या वारशाचं अनोख्य अंदाजात सेलिब्रेशन केलं. ‘ये प्रेम मोल लिया’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर शर्वरीने नृत्य केलं, आणि विशेष म्हणजे या परफॉर्मन्समध्ये तिची खास साथ दिली ती सौंदर्यवती अभिनेत्री, बॉलिवूडची धकधक गर्ल – माधुरी दीक्षित हिने. त्यांच्या दोघींच्या नृत्याचा हा व्हिडीओ शर्वरीने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला असून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. माधुरीसारख्या दिग्गज अभिनेत्रीसोबत शर्वरीने केलेलं हे नृत्य, त्यांची जुगलबंदी यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. आपल्या आयडॉलसोबत डान्स करण्याचा हा अनुभव खूपच खास असल्याचे सांगत शर्वरीने या प्रेमासाठी, स्नेहासाठी माधुरीचे विशेष आभार मानले.
माधुरी-शर्वरीचा लोभस डान्स
या खास क्षणामुळे माधुरी दीक्षितच्या ‘हम आपके हैं कौन..’ या सूरज बडजात्या दिग्दर्शित चित्रपटाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय रोमँटिक चित्रपटांपैकी एक असलेल्या या चित्रपटातील गाण्यांची जादू आजही कायम आहे. शर्वरीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती आणि माधुरी दीक्षित या दोघीही ‘ये प्रेम मोल लिया’ या टायटल ट्रॅकवर एकत्र डान्स करताना दिसल्या. दोघींनी गुलाबी रंगाचे पेहराव घातले होते. या खास क्षणी दोघींच्या डान्स स्टेप्स एकमेकांशी उत्तम प्रकारे जुळताना दिसल्या. राजश्री प्रॉडक्शन्सच्या दोन पिढ्यांतील अभिनेत्रींना एकाच मंचावर एकत्र पाहण्याची संधी या व्हिडिओमुळे चाहत्यांना मिळाली आहे. तर व्हिडिओच्या शेवटी शर्वरी वाघने माधुरी दीक्षितला नमन करत प्रेमाने मिठी मारली. आपल्या आवडत्या अभिनेत्रीबरोबर डान्स करण्याची संधी मिळाल्याचा आनंद शर्वरीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता. हा सुंदर क्षण चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून, दोघींच्या या खास भेटीची चर्चा रंगत आहे.
शर्वरीने माधुरी दीक्षितचे मानले आभार
या खास डान्सचा व्हिडीओ शर्वरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आणि त्यासोबत खास कॅप्शनही लिहीली. ‘ सूरज बड़जात्या सरांच्या चित्रपटांमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक असलेल्या माधुरी दीक्षित मॅम यांचं एवढं निखळ प्रेम मिळालं, मी स्वत:ला खूप भाग्यवान मानते. आपल्या आयडॉल सह डान्स करणं, हे तर माझ्यासठी स्वप्नवतच आहे. धन्यवाद मॅम, तुम्ही सर्वोत्तम आहात ! ये प्रेम मोल लिया…27 नोव्हेंबर 2026 ला थिएटरमध्ये ’ असं तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं.
रोमांचित चाहत्यांच्या एकाहून एक सरस कॉमेंट्स
शर्वरी वाघने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये या दोघींना एकत्र पाहून चाहते फारच सुखावले. तिच्या या व्हिडीओवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्यात. “एकाच फ्रेममध्ये इतकं सौंदर्य आणि ग्रेस!” असं म्हणत एका चाहत्याने कौतुक केलं. “ त्या खऱ्या अर्थाने ‘गोल्डन गर्ल’ आणि ‘धकधक गर्ल’ आहेत. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री!” अशी कमेंट दुसऱ्या चाहत्याने या पोस्टवर केली.
तिसरा युजरही माधुरीचं कौतुक करताना थकत नव्हता. “ माधुरीजी शेवटच्या 20 सेकंदांसाठी आल्या आणि संपूर्ण महफिलच काबीज केली. त्यांचे हावभाव, ग्रेस आणि डान्स यांवरून नजर हटवणं अशक्य आहे. खऱ्या अर्थाने क्वीन !” असं त्याने लिहीलं. तर आणखी एका चाहत्याने या क्षणाचे वर्णन ‘आयकॉनिक’ असं केले. अभिनेता आयुष्मान खुरानानेही या डान्स व्हिडिओवर प्रतिक्रिया देत “ WoW!” अशी कमेंट केली.
दरम्यान, आयुष्मान खुराना आणि शर्वरी वाघ यांची प्रमुख भूमिका असलेला ‘ये प्रेम मोल लिया’ हा संगीतमय कौटुंबिक मनोरंजनपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले असून, हिमेश रेशमिया यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. हा चित्रपट 27 नोव्हेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.