मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्स थ्रिलर; ’23 वा मजला’ लवकरच रंगभूमीवर

शिरीष देखणे यांच्या लेखणीतून उतरलेल्या आणि विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या नाटकात शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव, मयुरी वाघ, सुजित देशपांडे प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य, अजित परब यांचं संगीत आणि शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना या नाटकाला वेगळ्याच उंचीवर नेते.

मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्स थ्रिलर; 23 वा मजला लवकरच रंगभूमीवर
Shashank Ketkar and Aniket Vishwasrao
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 16, 2026 | 3:28 PM

मराठी रंगभूमीवर जेव्हा एखादं थ्रिलर नाटक येतं, तेव्हा प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणण्यासाठी तेवढंच पुरेसं नसतं; तर ते नाटक आशय आणि विषयाने कसदार असणंदेखील गरजेचं असतं. अशाच एका उत्कंठावर्धक नाटकाची घोषणा झाली आहे – ’23 वा मजला’. सवाईगंधर्व, नाट्यपुष्प आणि अथर्व थिएटर या तीन महत्त्वाच्या संस्थांची निर्मिती असलेलं हे नाटक मुंबईतील एका आलिशान उंच इमारतीत घडतं आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतं. आकाश भडसावळे, स्फूर्ती श्रीकांत तटकरे आणि समिता भरत काणेकर यांची निर्मिती असणारी ही सस्पेन्स थ्रीलर गोष्ट लवकरच रंगभूमीवर येण्यासाठी सज्ज झाली आहे.

दोन यशस्वी लेखकांची दीर्घकाळाची मैत्री, त्यातून उभी राहिलेली व्यावसायिक भागीदारी आणि पुढे हळूहळू उलगडत जाणारी एकमेकांची रहस्यं व कारस्थानं, या सगळ्यातून रंगतो सूडाचा एक धोकादायक खेळ. मित्रप्रेम, लोभ आणि धावपळीच्या युगात सहजपणे होणारा विश्वासघात यावर हे नाटक जोरदार प्रकाश टाकतं. उत्कंठा, पांढरपेशी विनोद, गूढ हालचाली आणि प्रत्येक क्षणी येणारी अनपेक्षित वळणं यातून “पुढे काय घडणार?” हा प्रश्न प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवतो.

Loading...

या नाटकात तरुण लेखकाची मध्यवर्ती भूमिका साकारणारे अभिनेते शशांक केतकर आपल्या अनुभवाबद्दल उत्साहाने बोलतात. “नाटक म्हटलं की कलाकाराच्या अंगात वेगळीच ऊर्जा संचारते. त्यातही विजय केंकरे सरांसारख्या दिग्गज दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली काम करणं ही माझ्यासाठी नेहमीच पर्वणी असते,” असं ते सांगतात. “सस्पेन्स, मर्डर मिस्ट्री आणि मानवी स्वभावाचे ‘ग्रे शेड्स’ उलगडणारी पात्रं साकारायला मला खूप आवडतात, कारण अशा भूमिकांमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि नवे प्रयोग करण्यासाठी भरपूर वाव असतो”, असंही ते नाटकाबद्दल बोलताना म्हणाले.

आपल्या भूमिकेबद्दल शशांक सांगतात, “मी एका तरुण लेखकाची भूमिका करतोय, जो आपल्या पार्टनरसोबत मालिका, चित्रपट आणि नाटकं लिहितो. कला क्षेत्रात अथांग यश आणि श्रीमंती मिळाल्यानंतर, त्या यशाच्या सावलीत लपलेली काही रहस्यं जेव्हा बाहेर येतात, तेव्हा काय घडू शकतं, हे या नाटकात दिसेल. दोन मित्रांमधले क्रिएटिव्ह वाद जेव्हा वैयक्तिक पातळीवर येऊन जीवावर बेततात, तेव्हाची भीषण अस्वस्थता यात अनुभवायला मिळेल.”

या नाटकात अनिकेत विश्वासराव एका अत्यंत वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहेत. “आमचं नवं कोरं सस्पेन्स नाटक लवकरच रंगभूमीवर येतंय आणि मी प्रचंड एक्साइटेड आहे,” असं ते म्हणतात. “अमित यादव सारखं कोणतंही पात्र मी रंगभूमीवर यापूर्वी कधीही साकारलेलं नाही. हे पात्र नक्कीच माझ्यासाठी आणि माझ्या चाहत्यांसाठी वेगळं ठरेल”, असा विश्वास ते व्यक्त करतात.

अनिकेत यांनी साकारलेला अमित यादव हा एक तरुण, हुशार, क्रिएटिव्ह आणि पुरस्कारप्राप्त लेखक आहे. शेखर देशमुख आणि तो – हे दोघे लेखक – एकत्र काम करतात. त्यांचे लेखन एवढे हिट असते की, प्रेक्षक त्यांना मराठीतले ‘सलीम-जावेद’ म्हणून ओळखत असतात. पण परिस्थिती अशी बनत जाते की या नात्यामध्ये मैत्रीबरोबरच अनेक रहस्य आणि गुपितं यांचा शिरकाव होतो. असं थरारक आणि ‘ग्रे शेड’ असलेलं पात्र आपण रंगभूमीवर पहिल्यांदाच साकारत असल्याचं अनिकेत आवर्जून सांगतात.

“बाहेरून यशस्वी आणि हुशार दिसणाऱ्या अमितचं खासगी आयुष्य मात्र वेगळंच आहे. तो बेफिकीर आहे, आलेला पैसा पाण्यासारखा उधळण्याची त्याला सवय आहे, आणि त्यातून कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. त्यातून बाहेर पडण्याची कसरत, मनातली इन्सिक्युरिटी आणि न्यूनगंड, या सगळ्याचा प्रवास नाटकात उलगडतो. तो या परिस्थितीशी कसा सामना करतो आणि पुढे काय घडतं, हे प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल. यात अनेक थ्रिलिंग स्टंट्स आणि ट्विस्ट्स आहेत, जे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवतील आणि विचार करायला लावतील,” असं अनिकेत सांगतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us