डॅशिंग ‘शिवा’ला सोज्वळ ‘ज्योती’च्या भूमिकेत स्वीकारतील का प्रेक्षक? अभिनेत्रीला सतावतेय चिंता

'दीपज्योती' ही नवी मालिका येत्या 13 एप्रिलपासून दररोज रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक ज्योतीची मुख्य भूमिका साकारणार आहे.

डॅशिंग शिवाला सोज्वळ ज्योतीच्या भूमिकेत स्वीकारतील का प्रेक्षक? अभिनेत्रीला सतावतेय चिंता
Purva Kaushik
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 06, 2026 | 3:43 PM

झी मराठी वाहिनीवर येत्या 13 एप्रिलपासून ‘दीपज्योती’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या आधीच्या भूमिकांपेक्षा पूर्णतः वेगळी असलेली ‘ज्योती’ ही व्यक्तिरेखा साकारताना तिचा अनुभव, तयारी आणि भावना पूर्वाने व्यक्त केल्या आहेत. पूर्वाने आधी ‘शिवा’ या मालिकेत टॉमबॉय शिवाची भूमिका साकारली होती. त्यामुळे पुन्हा एकदा साध्या मुलीच्या भूमिकेत प्रेक्षक तिला स्वीकारतील का, अशी भीती तिच्या मनात होती.

मालिकेविषयी पूर्वा म्हणाली, “दीपज्योती या मालिकेत माझ्या भूमिकेचं नाव ‘ज्योती’ आहे. माझ्या आधीच्या भूमिकेपेक्षा ही खूप वेगळी भूमिका आहे. ज्योती ही खूप समजूतदार, गुणी, घरगुती आणि साधी, गोड अशी मुलगी आहे. तिला नटण्याची-सजण्याची आवड आहे आणि ती खूप सुंदर दिसते. तिला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे आणि ती आईसोबत राहते. वडीलही आहेत, पण त्यांच्या व्यसनामुळे तिला त्यांच्यावर खूप राग आहे. ज्योतीची ही सोज्वळ भूमिका प्रेक्षकांना नक्की आवडेल. आधीही मी झी मराठीवर ‘शिवा’ नावाची भूमिका साकारली होती, जी खूप वेगळी होती आणि सर्वसामान्य मुलींसारखी नव्हती. त्यामुळे मला भीती होती की त्या भूमिकेनंतर मला पुन्हा मुख्य नायिकेची भूमिका मिळेल का? तसेच, पुन्हा एका साध्या मुलीच्या भूमिकेत प्रेक्षक मला स्वीकारतील का? असा प्रश्न मनात होता.”

“झी मराठीने माझा हा समज मोडून काढला. त्यामुळे ‘ज्योती’च्या भूमिकेसाठी जेव्हा कॉल आला तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. तो क्षण शब्दांत सांगणं कठीण आहे. ही भूमिका माझ्या आधीच्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. या भूमिकेसाठी तयारी करताना माझ्या मनात सतत माझ्या आधीच्या भूमिकेशी तुलना होत राहते. खऱ्या आयुष्यात माझा स्वभाव थोडा थेट आहे. ‘शिवा’ करताना मला एवढी तयारी करावी लागली नव्हती, जितकी ‘ज्योती’साठी करावी लागत आहे. ज्योती ही खूप समजूतदार, नाजूक आणि सोज्वळ मुलगी आहे. तिचं राहणीमान, वागणं आणि तिचा साधेपणा साकारण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागत आहे. मला हळू बोलायचं आहे, शब्दांचा तोल राखायचं आहे आणि वागताना स्वतःला ओव्हर दाखवायचं नाही. साध्या मुलीची भूमिका करणं सोपं वाटत असलं तरी माझ्यासाठी ते आव्हानात्मक आहे,” असं पूर्वा पुढे म्हणाली.

“ज्योतीच्या भूमिकेबद्दल मला थोडी भीती आहे. मी कशी दिसेन आणि प्रेक्षकांना कितपत आवडेन याची मला भीती आहे. पण मी पूर्ण प्रयत्न करत आहे की प्रेक्षक ज्योतीवरही तितकंच प्रेम करतील. प्रेक्षकांमध्ये या भूमिकेबद्दल उत्सुकता आहे, याचा मला आनंद आहे. आम्ही सर्वजण पहिल्यांदा भेटलो तेव्हा एपिसोडचं वाचन होतं. तेव्हाच सगळ्यांची ओळख झाली. माझ्या बहिणींच्या भूमिका करणाऱ्या मानसी आणि सलोनी खूप छान आहेत. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी असं वाटलं की आपण खूप दिवसांपासून एकत्र काम करत आहोत. संपूर्ण टीम पहिल्याच दिवशी खूप छान मिसळून गेली,” अशा शब्दांत पूर्वाने शूटिंगचा अनुभव सांगितला.

Follow Us