Video : प्रसिद्ध गायकाचा स्टेजवर किळसवाणा प्रकार; चाहत्यावर थुंकला अन्..

गायक अर्पित बालाने त्याच्या परफॉर्मन्सदरम्यान असं काही केलंय, ज्यामुळे त्याच्यावर नेटकरी जोरदार टीका करत आहेत. लाइव्ह कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने त्याच्या दिशेने बॉटल फेकून मारल्याने त्याने असं कृत्य केलं.

Video : प्रसिद्ध गायकाचा स्टेजवर किळसवाणा प्रकार; चाहत्यावर थुंकला अन्..
Arpit Bala
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 30, 2026 | 9:30 AM

गायक अर्पित बाला 2025 मधील त्याच्या ‘बरगद’ या व्हायरल गाण्यामुळे रातोरात प्रकाशझोतात आला. सोशल मीडियावर या गाण्याला खूप पसंती मिळाली होती. परंतु हैदराबादमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका लाइव्ह कॉन्सर्टमुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ही घटना 28 मार्च रोजी किंग्डम क्लब अँड किचनमध्ये घडली, जेव्हा प्रेक्षकांमधील एका व्यक्तीने अर्पितच्या दिशेने स्टेजवर बाटली फेकली. त्यानंतर कॉन्सर्टमध्ये गोंधळ निर्माण झाला. रागाच्या भरात स्टेजवर उभ्या असलेल्या अर्पितने नंतर जे केलं, त्यावरून त्याच्यावर जोरदार टीका होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये अर्पित परफॉर्मन्स थांबवून प्रेक्षकांशी वाद घालताना दिसत आहे. बाटली कोणी फेकली, असं तो संतापून त्यांना विचारतो. त्या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर मात्र त्याचा राग अनावर झाला आणि अर्पित थेट त्याच्यावर थुंकला. इतकंच नव्हे तर भडकून त्याने पुन्हा त्या व्यक्तीकडे बाटली फेकली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी प्रेक्षकांमधील संबंधित व्यक्तीला तिथून बाहेर काढलं. हे सर्व घडताना प्रेक्षकांमधील काही लोक टाळ्या वाजवताना दिसून आले. पुन्हा परफॉर्मन्स सुरू करण्याआधी अर्पित प्रेक्षकांना अशा पद्धतीचं वर्तन पुन्हा न करण्याचा इशारा देतो आणि स्पष्ट करतो की अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. “इथे बघा.. काय झालं? भीती वाटली.. हे तुझ्या बहिणीच्या लग्नात हुंड्यात दे”, अशा शब्दांत तो त्या व्यक्तीला सुनावतो.

पहा व्हिडीओ-

अर्पितचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी अर्पितच्या अशा वागण्यावर टीका केली, तर काहींनी त्याची बाजू घेतली. प्रेक्षकाने आधी बाटली फेकून त्याला डिवचलं, त्यामुळे त्याचा राग अनावर झाला, असा बचाव त्याच्या काही चाहत्यांनी केला.

कोण आहे अर्पित बाला?

अर्पित बाला हा एक भारतीय स्वतंत्र कलाकार आहे. तो रॅपर आणि कंटेंट क्रिएटर आहे. देशी हिप-हॉप गाण्यांसोबत डिजिटल कॉमेडी जोडण्यासाठी तो ओळखला जातो. फूसी गँग या ग्रुपचा सहसंस्थापक म्हणून तो युट्यूबवरील मजेशीर स्केचेसमुळे प्रकाशझोतात आला आणि नंतर ‘महारानी’सारख्या गाण्यांसह त्याने संगीतकार म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली.

Follow Us