अभिनेत्रींमध्ये रस्त्यावरच राडा, पद्मिनी कोल्हापुरे – पूनम ढिल्लो यांच्यात हायव्होल्टेज ड्रामा, पोलीस आले आणि…
CINTAA : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री रस्त्यावरच भांडताना दिसत आहेत. पद्मिनी कोल्हापुरे - पूनम ढिल्लो यांच्यातील हायव्होल्टेज ड्रामा चर्चेचा विषय ठरला आहे. जाणून घ्या अभिनेत्रींमध्ये वाद नेमक्या कोणत्या कारणामुळे झाले.

CINTAA : 80 च्या दशकातील अभिनेत्री आता अभिनय विश्वात सक्रिय नसल्या तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील त्यांचा एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रींनी रस्त्यावरच राडा घातल्याचं दिसत आहे. तर अभिनेत्रींच्या या हायव्होल्टेज ड्रामा पोलिसांना देखली मध्यस्थी करावं लागलं. समोर येत असलेल्या माहितीनुसार, सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (CINTAA) मधील विवाद आता केवळ बंद दारांआडच्या बैठकांपर्यंत मर्यादित न राहता रस्त्यावर आला आहे. भांडणाचं कारण कागदपत्रांमध्ये फेरफारचा आरोप असल्याचं सांगण्यात आलं आहे.
उपासना सिंग आणि कुनिका सदानंद यांच्यासह अनेक सदस्यांनी असा आरोप केला आहे की, पूनम ढिल्लो आणि पद्मिनी कोल्हापुरे CINTAA ची अधिकृत कागदपत्रे आणि साहित्य हटवण्याचा व गाडीतून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होत्या. याच कारणामुळे रस्त्यावर अभिनेत्रींमध्ये मोठे वाद झाले. कुनिका सदानंद हिच्या दाव्यानंतर पद्मिनी कोल्हापुरे आणि प्रीती सप्रू यांच्यात रस्त्यावरच बाचाबाची झाली. या दरम्यान कुनिका व्हिडिओ रेकॉर्ड करत होत्या, ज्यामुळे वातावरण अधिक तणावपूर्ण झाल्याचं सांगण्यात येत आहे.
पोलिसांचा हस्तक्षेप
परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर घटनास्थळी असलेल्या पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. वाद वाढताना पाहून महिला पोलीस अधिकाऱ्याने सर्व सदस्यांना सार्वजनिक ठिकाणी आपली प्रतिष्ठा राखण्याचा आणि शांत राहण्याचा दम दिला. अभिनेत्रींना पोलीस म्हणाले, ‘मला तुमच्यासोबत (सर्व अभिनेत्री) असं बोलायला आवडत नाही . ‘झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांशीही आम्ही अशा प्रकारे बोलत नाही, ज्या प्रकारे तुम्ही बोलत आहात. किमान स्वतःच्या प्रतिष्ठेचा तरी विचार करा; लोक हे सर्व पाहत आहेत. तुम्ही केवळ तुमच्या आरोपांवर ठाम आहात आणि आमचं म्हणणे अजिबात ऐकून घेत नाही आहात. जर ही दुसरी एखादी व्यक्ती असती, तर मी तिला नक्कीच कानशिलात मारली असती. आम्ही तुमच्याशी आदराने वागत आहोत, पण प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. असं पोलीस म्हणाले
सांगायचं झालं तर, ऑगस्ट महिन्यात CINTAA च्या कार्यकारी समितीतील 11 सदस्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले, ज्यामुळे संघटनेत मोठे नेतृत्व संकट निर्माण झाले. या सर्व वादानंतर आणि गतिरोधानंतर ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (FWICE) ने CINTAA साठी नव्याने निवडणुका घेण्याची घोषणा केली आहे.