धर्म असो वा सण, घरापुरताच ठेवा..; डीजेविरोधातील लढ्यात सुमित राघवन मैदानात, विद्यानंद बापट यांना दिला पाठिंबा
Sumeet Raghavan: सुमित राघवनच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा मनोरंजनविश्व आणि समाजमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

पुण्यात गणेशोत्सव आणि इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. डीजेच्या मोठ्या आवाजाविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांना आता अभिनेता सुमित राघवनने जाहीर पाठिंबा दिला आहे. पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात सुमित राघवनने ध्वनिप्रदूषण, सण साजरा करण्याची पद्धत आणि सामाजिक जबाबदारी यावर आपली भूमिका मांडली. विद्यानंद बापट यांनी पुण्यात डीजे आणि मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकरविरोधात सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या या भूमिकेचा गौरव ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित हे देखील उपस्थित होते. यावेळी सुमित राघवनने बापट यांच्या भूमिकेला समर्थन देत, “आम्ही तुझ्यासोबत आहोत”, असा संदेश दिला.
सुमित राघवनच्या मते, एखाद्या सामाजिक प्रश्नावर केवळ बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भूमिका घेणं महत्त्वाचं आहे. कलाकार म्हणून आपली भूमिका असतेच, मात्र समाजाचा एक भाग म्हणून आपण काय करतो, हेही तितकंच महत्त्वाचं असल्याचं त्याने सांगितलं. विद्यानंद बापट यांच्या भूमिकेची खिल्ली उडवण्यासाठी त्यांचे फोटो लावणं किंवा त्यांच्या विरोधात डीजे वाजवणं योग्य नसल्याचं सुमित राघवनने म्हटलंय. एखाद्या विचाराला वैचारिक किंवा तार्किक उत्तर देता येत नसेल, तेव्हा अशा पद्धतीचा अवलंब केला जात असल्याचं त्यांने नमूद केलं.
यावेळी सुमितने त्याच्या आणि पत्नी चिन्मयी सुमितच्या सामाजिक भूमिकेचाही उल्लेख केला. सतत निर्माता, दिग्दर्शक किंवा सहकलाकार म्हणून भूमिका करण्यापेक्षा माणूस म्हणून समाजात आपली जबाबदारी काय आहे, याचा विचार करणं गरजेचं असल्याचं तो म्हणाला. या विषयावर बोलताना सुमित राघवनने सण आणि धार्मिक कार्यक्रमांबाबतही आपली स्पष्ट भूमिका मांडली. धर्म असो किंवा सण, तो घरापुरता मर्यादित ठेवला पाहिजे, असं त्याने म्हटलं. मात्र, सार्वजनिक ठिकाणी आनंद साजरा करण्याच्या प्रसंगांबाबत त्याने उदाहरणही दिलं. देशातील किंवा राज्यातील खेळाडूंनी एखादा मोठा विजय मिळवल्यास सर्वांनी एकत्र येऊन आनंद साजरा करण्यास हरकत नसल्याचं त्याने सांगितलं.
सुमित राघवनने पुण्यातील इतर नागरी प्रश्नांकडेही लक्ष वेधलं. रस्ते, वाहतूक आणि शहरातील विविध समस्या अजूनही कायम असल्याचं सांगत, नागरिकांनी आपली ऊर्जा अशा प्रश्नांवरही वापरली पाहिजे, असं तो म्हणाला. विद्यानंद बापट यांनी सुरू केलेल्या या जागृतीचा विस्तार व्हावा, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली. दरम्यान, विद्यानंद बापट यांनी यापूर्वीही पुण्यातील डीजे आणि लाऊडस्पीकरच्या आवाजाबाबत आक्षेप नोंदवला आहे. नियम असूनही त्यांचं पालन होत नसल्याचा दावा त्यांनी केला होता. तक्रार केल्यानंतर काही काळासाठी आवाज बंद केला जातो, मात्र पुन्हा परिस्थिती पूर्ववत होत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.