घरात एकटीच होते, अचानक अज्ञात व्यक्ती घुसली अन्..; मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव

या मराठमोळ्या अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला. एक अज्ञात व्यक्ती दररोज तिचा पाठलाग करायची आणि अचानक एकेदिवशी ती व्यक्ती तिच्या घरात घुसली होती.

घरात एकटीच होते, अचानक अज्ञात व्यक्ती घुसली अन्..; मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव
मराठी अभिनेत्री
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 18, 2026 | 3:37 PM

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तेजस्वीचा खूप मोठा चाहतावर्ग असून तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. अशाच एका चाहत्याचा धक्कादायक प्रसंग तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला. एक अज्ञात व्यक्ती तिचा पाठलाग करत अचानक एकेदिवशी थेट तिच्या घरात घुसली होती. त्यावेळी तेजस्वी घरात एकटीच होती. या परिस्थितीला ती कशी सामोरी गेली, याविषयी तिने या मुलाखतीत सांगितलं आहे.

‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत तेजस्वी प्रकाशने सांगितलं की, एक व्यक्ती दररोज तिला विचित्र पत्र पाठवत होता आणि तिचा पाठलागसुद्धा करत होता. “एक व्यक्ती माझा पाठलाग करायची आणि दररोज तो माझ्या घरापर्यंत यायचा. माझ्या घरासमोर एक अंगण आहे, तिथे तो पत्र ठेवून जायचा. जेव्हा जेव्हा मी घरातून बाहेर पडायची, तेव्हा मला अंगणात त्याचं पत्र मिळायचं. हे कोण करत असेल, याचा मी खूप विचार केला. अखेर सुरक्षेचा विचार करून आम्ही सीसीटीव्ही कॅमेरेसुद्धा लावून घेतले. परंतु तरीही आम्ही त्या व्यक्तीला पकडू शकलो नाही”, असं तिने सांगितलं.

हे प्रकरण इथेच थांबलं नाही, तर अचानक एके दिवशी तेजस्वीचा पाठलाग करणारी आणि तिच्या अंगणात पत्र ठेवून जाणारी व्यक्ती बाल्कनीतून तिच्या घरात घुसली होती. याविषयी ती पुढे म्हणाली, “एकेदिवशी तो थेट माझ्या घरात घुसला. त्यावेळी मी घरात एकटीच होती. सुदैवाने वेळीच माझा ड्राइव्हर आणि आई आली. त्यांनी त्याला बाल्कनीतच पकडलं आणि आम्हाला त्याला पोलिसांकडे घेऊन जावं लागलं होतं. तो खूप चित्रविचित्र चिठ्ठ्या लिहून जायचा. आधी करणने त्याला दम दिला आणि त्यानंतर आम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.”

तेजस्वी प्रकाश ही गेल्या काही वर्षांपासून अभिनेता करण कुंद्राला डेट करत आहे. ‘बिग बॉस 15’पासून या दोघांच्या लव्ह-स्टोरीची सुरुवात झाली. शोदरम्यान तेजस्वी आणि करण यांच्यात जवळीक निर्माण झाली आणि शोमधून बाहेर पडल्यानंतरही त्यांचं नातं टिकून राहिलं. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

Follow Us