Tejaswini Pandit: चार खोल्यांच्या घरात एकट्याने परतावं लागतं.., आई-बाबांच्या आठवणीत तेजस्विनीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

Tejaswini Pandit: तेजस्विनीच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि कलाविश्वातील सेलिब्रिटींनीही कमेंट करत भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांना तुझ्यावर कायम अभिमान असेल, असं कुशल बद्रिकेनं म्हटलंय.

Tejaswini Pandit: चार खोल्यांच्या घरात एकट्याने परतावं लागतं.., आई-बाबांच्या आठवणीत तेजस्विनीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
तेजस्विनी पंडित, ज्योती चांदेकर
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 31, 2026 | 8:44 AM

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर तिच्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. मात्र आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींबद्दल ती फारशी व्यक्त झालेली पाहायला मिळाली नाही. आता आईच्या 70व्या वाढदिवसानिमित्त तेजस्विनीने एक भावूक पोस्ट शेअर करत तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमधून आई-वडिलांना गमावल्यानंतर आयुष्यात निर्माण झालेली पोकळी आणि त्यातून सावरण्याचा तिचा प्रवास दिसून येतो. तेजस्विनीने पोस्टच्या सुरुवातीलाच सांगितलं की, ही कोणतीही ‘रँडम पोस्ट’ नसून आई गेल्यापासून सोशल मीडियावर व्यक्त होणं तिला फारसं जमलं नाही. “किंबहुना, नाहीच व्यक्त होता आलं,” असं म्हणत तिने आपल्या भावनांना वाट करून दिली.

तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर यांचा हा 70वा वाढदिवस असता. हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा प्लॅन होता, मात्र आईच्या अनुपस्थितीत तो दिवस आठवणींमध्येच गेला. तेजस्विनीने आई-वडिलांनी दिलेल्या शिकवणीची आठवणही या पोस्टमधून करून दिली. तिचे आई-बाबा नेहमी “शिकत राहिलं पाहिजे, शेवटच्या श्वासापर्यंत शिकण्याची वृत्ती पाहिजे,” असं सांगायचे. याच विचारातून तिने पालक गमावल्यानंतरच्या आयुष्याचं वास्तव मांडलं. “आई-वडील बनल्यावर मूल वाढवायला कुणी शिकवत नाही, ते अपसूक येतं. दुर्दैवाने, आई-वडील गेल्यावर मुलांना एकट्याने मोठं व्हायला आपसूक येत नाही, ते शिकावं लागतं,” असं ती म्हणते.

तेजस्विनीची पोस्ट-

तेजस्विनीने सांगितलं की, तिचे आई-बाबा दोघेही अचानक या जगातून गेले. तिच्या वडिलांना जाऊन 11 वर्षे झाली आहेत, तर आईला जाऊन एक वर्ष झालं आहे. पालकांना लहान वयात गमावल्यानंतर आयुष्यातील अनेक गोष्टी पूर्वीसारख्या राहत नाहीत, असंही तिने नमूद केलं. “चार खोल्यांच्या घरात एकट्याने परतावं लागतं. झोप येत नसेल किंवा थकवा आला असेल तर डोक्यावरून हात फिरवायला कुणी येणार नाही, हे गृहीत धरावं लागतं,” या शब्दांत तिने पालकांच्या अनुपस्थितीची जाणीव व्यक्त केली.

मात्र या दुःखातून ‘मूव्ह ऑन’ होण्यापेक्षा ‘मूव्ह फॉरवर्ड’ करण्याचा निर्णय तिने घेतला आहे. आई-वडिलांच्या आठवणींचं बोट धरून आणि त्यांच्या संस्कारांचं दप्तर घेऊन आयुष्याच्या पुढच्या परीक्षेसाठी शिकत राहणार असल्याचं तेजस्विनीने म्हटलं. “आई बाबा… आम्ही शिकत राहू. तुमच्यासारखंच. शेवटच्या श्वासापर्यंत,” असं म्हणत तिने आई-वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. “तुमचे संस्कारच आमची सगळ्यात मोठी कमाई आहे,” असंही तिने आवर्जून सांगितलं. अखेरीस “आई बाबा… अमर रहा” आणि आईला “वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्योती” असं म्हणत तिने ही भावूक पोस्ट पूर्ण केली.

Follow Us