प्रोपेगेंडाचा आरोप होऊनही ‘धुरंधर 2’ची छप्परफाड कमाई; मग ‘या’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी का फिरवली पाठ?

'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाचा बऱ्याच चित्रपटांना मोठा फटका बसला आहे. त्यापैकीच एक हा चित्रपट असून याच्या पहिल्या भागाने तगडी कमाई केली होती. धुरंधरप्रमाणेच या चित्रपटावरही प्रोपेगेंडाचा आरोप झाला होता.

प्रोपेगेंडाचा आरोप होऊनही धुरंधर 2ची छप्परफाड कमाई; मग या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी का फिरवली पाठ?
चित्रपटातील दृश्य
Image Credit source: Youtube
| Updated on: Mar 26, 2026 | 1:21 PM

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ या चित्रपटावर काहींनी प्रोपेगेंडाचा (प्रचारकी असल्याचा) आरोप केला. तरीसुद्धा या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट 19 मार्च रोजी जगभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला असून आतापर्यंत रणवीर सिंहच्या या चित्रपटाने 900 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. प्रोपेगेंडाचा आरोप झालेला असाच एक चित्रपट फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. परंतु या चित्रपटाला प्रेक्षकांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. आता ‘धुरंधर 2’च्या लाटेचा या चित्रपटाला चांगलाच फटका बसला आहे. या चित्रपटावरून बराच वाद झाला होता आणि हा वाद कोर्टापर्यंतही पोहोचला होता. या चित्रपटाचं नाव आहे ‘द केरळ स्टोरी 2: गोज बियाँड’.

उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया या तिघींची मुख्य भूमिका असलेल्या ‘द केरळ स्टोरी 2’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यात फक्त 60 लाख रुपयांची कमाई केली. ‘धुरंधर 2’च्या लाटेत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकू शकला नाही. कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत फक्त 42.10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा प्रवास इथेच संपुष्टात येईल, कारण थिएटरमध्ये ‘धुरंधर 2’चा प्रचंड दबदबा आहे. जर रणवीर सिंहचा हा चित्रपट इतक्यात प्रदर्शित झाला नसता तर कदाचित ‘द केरळ स्टोरी 2’ने बॉक्स ऑफिसवर 50 कोटी रुपये कमावले असते. या चित्रपटाचा बजेट 28 ते 30 कोटी रुपये असल्याने त्या तुलनेत चित्रपटाने बरी कमाई केली आहे.

‘द केरळ स्टोरी’च्या पहिल्या भागाच्या तुलनेत दुसऱ्या भागाला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या भागाने 6.75 कोटी रुपयांनी ओपनिंग केली होती आणि जगभरात या चित्रपटाने 220 कोटी रुपये कमावले होते. ‘द केरळ स्टोरी 2’ हा चित्रपट 27 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रचारकी आणि समाजात द्वेष पसरवणारा असल्याची टीका त्यावर झाली होती. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’चा हा सीक्वेल आहे. धर्मांतराच्या नावाखाली तरुणींची केली जाणारी फसवणूक हा गंभीर मुद्दा यात अधोरेखित करण्यात आला आहे. ‘द केरळ स्टोरी’वरही काही राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली होती. तर काहींनी हा चित्रपट प्रचारकी असल्याचं म्हटलं होतं

Follow Us