मराठीत बोलून कयाधु लोहारने जिंकलं मन; सोनाली कुलकर्णीचं केलं भरभरून कौतुक
'द पॅरेडाईज' चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अभिनेत्री कयाधू लोहारने सोनाली कुलकर्णीची अस्खलित मराठीत स्तुती केली. तिच्या प्रेरणादायी भाषणाने सोनाली भारावून गेली.

नॅचरल स्टार नानी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, कयाधु लोहार आणि राघव जुयाल याच्या महत्वपूर्ण भूमिका असलेला ‘द पॅरेडाईज’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. उद्या म्हणजेच गुरूवार 24 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांची उत्सुकता देखील वाढली आहे. या चित्रपटाचे कलाकार सध्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून नुकताच मुंबईत एक प्रमोशनल इव्हेंट पार पडला. यावेळी सर्व कलाकार आवर्जून उपस्थित होते. मात्र या चित्रपटापेक्षा, त्यातील कलाकार कयाधू लोहारहिच्या विधानाचीच जास्त चर्चा रंगली. असं काय घडलं ?
मराठीत बोलत केलं कौतुक
‘द पॅरेडाईज’या तेलुगू चित्रपटाच्या रिलीज आधी जोरदार प्रमोशन होत असून मुंबईतही त्याचा एक इव्हेंट पार पडला. यावेळी दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री कयाधू लोहारदेखील उपस्थित होती. गुलाबी रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य खुलून दिसत होतं. प्रसिद्ध अभिनेत्री सोनीला कुलकर्णी देखील या चित्रपटाचा भाग असून कयाधूने तिचं खूप कौतुक केलं. विशेष म्हणजे दाक्षिणात्य असूनही कयाधुने अस्खलित मराठी बोलत सोनाली तारीफ केली. तिचं बोलणं ऐकूनच सगळेच अवाक् झाले खरे पण त्यांनी तिच्या प्रयत्नांचं कौतुकंही केलं.
स्टेजवर असलेल्या कयाधुने उपस्थितांशी संवाद साधला आणि बोलता बोलता तिने याच चित्रपटात झळकणारी मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची प्रशंसा केली. ‘ सोनाली मॅम, मला खूप आनंद आहे की मी या फिल्ममध्ये तुमच्यासोबत काम केलं आहे. तुम्ही आमच्यासाठी खरोखरच एक प्रेरणास्थान आहात, मॅम. आजही तुम्ही इतक्या उत्साहाने आणि समर्पणाने, प्रदेश, भाषा व संस्कृतीच्या पलीकडे जाऊन इतकं अप्रतिम काम करत आहात. हे पाहून मला खूप प्रेरणा मिळते. भविष्यात मलाही तुमच्यासारखंच सुंदरपणे, आत्मविश्वासाने काम करायचं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं इतकं सुंदरपणे सांभाळता, ते माझ्यासाठी खरोखरच प्रेरणादायी आहे.’ असं म्हणत कयाधुने सोनालीचं भरभरून कौतुक केलं. तिचं बोलण ऐकून सोनालीही खूप भारवली होती.
नेटकऱ्यांनी केलं कौतुक
कयाधुच्या या बोलण्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला असून त्यावर खूप लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी तिच्या मराठी बोलण्याची तारीफ केली आहे. आमचे मराठी भैय्ये कुठे गेले कोणास ठाऊक. त्यांना दाखवा reel – अशी कमेंट एकाने केली. तर, हेच खरे सामर्थ्य आहे दाक्षिणात्य लोकांचे… ते भाषेचा मान राखतात – असं म्हणत आणखी एका नेटकऱ्याने कयाधुचं कौतुक केलं.