Vaibhav Mangale: मुलांच्या भरवश्यावर राहिले अन्..; वैभव मांगले यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल
अभिनेते वैभव मांगले यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. कशाला काळजी करायची. मुलं आहेत की माझी काळजी घ्यायला, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते वैभव मांगले आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवतात. नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. गंभीर भूमिका असो किंवा विनोदी व्यक्तिरेखा, वैभव मांगले प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. आता त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका भन्नाट व्हिडीओमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या व्हिडीओमध्ये ते त्यांच्या दोन्ही मुलांसोबत टीव्ही पाहताना दिसत आहेत. मात्र, त्यानंतर जे काही घडतं, ते पाहून तुम्हालाही हसू आवरणं कठीण होईल. विशेष म्हणजे, या व्हिडीओला जवळपास 40 लाख व्ह्यूज मिळाले असून, नेटकऱ्यांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
वैभव मांगले यांनी हा व्हिडीओ पोस्ट करताना त्यावर कॅप्शन लिहिलं, ‘कशाला काळजी करायची. मुलं आहे की माझी काळजी घ्यायला.’ या कॅप्शनमुळेच अनेकांचं लक्ष या व्हिडीओकडे वेधलं गेलं. व्हिडीओमध्ये वैभव मांगले आपल्या मुलांसोबत सोफ्यावर बसून टीव्ही पाहत आहेत. त्याचवेळी ते काहीतरी खातानाही दिसतात. खाऊन झाल्यानंतर त्यांच्या हातात एक रिकामी वाटी असते. ती बाजूला ठेवण्यासाठी ते उठण्याच्या तयारीत असतात. मात्र, अचानक त्यांना आठवतं की, आपली मुलं जवळच आहेत. मग काय, मुलं आहेत तर त्यांच्याकडूनच काम करून घ्यावं, असा विचार त्यांच्या मनात येतो.
पहा व्हिडीओ-
वैभव मांगले आपल्या हातातील वाटी बाजूला बसलेल्या मुलीकडे देण्यासाठी पुढे करतात. मात्र, त्यांची मुलगी त्यांच्याकडे पाहते आणि स्वतःच्या हातातील वाटी उचलून उलट त्यांच्याच हातात देते. मुलीकडून अशी प्रतिक्रिया मिळाल्यानंतरही वैभव यांची अडचण संपत नाही. त्यांचा मुलगाही स्वतःची वाटी त्यांच्याच हातात देतो. त्यामुळे मुलांनी आपली काळजी घेण्याऐवजी आपल्यालाच त्यांची काळजी घ्यावी लागत असल्याचं त्यांच्या लक्षात येतं. यानंतर वैभव मांगले यांच्या चेहऱ्यावर उमटणारे हावभाव पाहण्यासारखे आहेत. मुलांकडून मदतीची अपेक्षा ठेवणाऱ्या बाबांना अखेर स्वतःच उठून वाट्या ठेवण्यासाठी जावं लागतं. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि या प्रसंगातील विनोदामुळे व्हिडीओ अधिकच मजेशीर झाला आहे.
नेटकऱ्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया
वैभव मांगले यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला जवळपास 40 लाख व्ह्यूज आणि 75 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुलं असली की घरात अशीच परिस्थिती असते, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे. तर काहींनी वैभव मांगले यांच्या चेहऱ्यावरील हावभावांचं कौतुक केलं आहे.