ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

| Updated on: May 01, 2020 | 7:28 AM

ऋषी कपूर यांना कॅन्सर आहे, त्यांना श्वासोच्छवास करण्यासही त्रास होत आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे, परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती रणधीर कपूर यांनी दिली. (Actor Rishi Kapoor hospitalised)

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तब्येत बिघडल्यामुळे मुंबईतील ‘सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन’ हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं आहे. (Actor Rishi Kapoor hospitalised)

67 वर्षीय ऋषी कपूर यांना 2018 मध्ये कर्करोगाचं निदान झालं होतं. प्रकृती खालावल्यामुळे काल (बुधवारी) कपूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

हॉस्पिटलमध्ये ऋषी कपूर यांच्यासोबत अभिनेत्री-पत्नी नीतू सिंग आणि अभिनेते-बंधू रणधीर कपूर आहेत. “ऋषी कपूर यांना कॅन्सर आहे, त्यांना श्वासोच्छवास करण्यासही त्रास होत आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे, परंतु ऋषी यांची प्रकृती स्थिर आहे”, अशी माहिती रणधीर कपूर यांनी दिली.

गेल्या गुरुवारपासून त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. त्यांना त्यावेळीही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु चार तासांतच त्यांना घरी सोडण्यात आलं. महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊनच्या काळात त्यांना रुग्णालयात जाण्यासाठी विशेष पासही दिला होता. त्यांचे वैद्यकीय अहवालही बीएमसी आणि आरोग्य विभागाला पाठवण्यात आले होते. (Actor Rishi Kapoor hospitalised)

कर्करोगाचं निदान

2018 मध्ये कर्करोगाचं निदान झाल्यानंतर ऋषी कपूर यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु होते. त्यावेळी मुलगा-अभिनेता रणबीर कपूरसोबतच आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा, अनुपम खेर, आमिर खान, शाहरुख खान, दीपिका पदुकोन, करण जोहर आणि मलायका अरोरा असे अनेक कलाकार त्यांना भेटून गेले. उपचाराअंती जवळपास वर्षभराच्या कालावधीनंतर ऋषी कपूर सप्टेंबर 2019 मध्ये मायदेशी परत आले.

‘मला आता बरं वाटतंय आणि मी कोणतंही काम करु शकतो. पुन्हा अभिनय सुरु करण्याचा विचार आहे. प्रेक्षकांना आता माझं काम आवडेल की नाही, हे माहित नाही. न्यूयॉर्कमध्ये मला बर्‍याचदा रक्त देण्यात आलं. तेव्हा मी नीतूला म्हणायचो – मला आशा आहे, नवीन रक्त असूनही मी अभिनय विसरणार नाही” अशी प्रतिक्रिया ऋषी कपूर यांनी सप्टेंबर 2019 मध्ये दिली होती.

ऋषी कपूर यांनी चित्रपटांच्या शूटिंगलाही सुरुवात केली होती. अभिनेत्री जुही चावलासोबत ‘शर्माजी नमकीन’ या सिनेमाचं चित्रीकरण त्यांनी सुरु केलं होतं. त्यासोबतच ते दीपिका पदुकोनसह ‘द इंटर्न’ सिनेमाच्या अधिकृत रिमेकमध्येही झळकणार आहेत.

सोशल मीडियावर आपल्या तिरकस टिप्पण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ऋषी कपूर यांनी 2 एप्रिलनंतर ट्विटर अकाउंटवर एकही पोस्ट केलेली नाही.

हेही वाचा : Irrfan Khan Died | तीन दिवसांपूर्वी इरफान खानच्या आईचे निधन, आईची शेवटची इच्छाही अपूर्ण