‘वागळे की दुनिया’ फेम अभिनेत्रीचं 5 वर्षांनंतर दमदार कमबॅक; या मराठी मालिकेत साकारणार भूमिका

'वागळे की दुनिया' या गाजलेल्या मालिकेत भूमिका साकारलेली अभिनेत्री चिन्मयी साळवी तब्बल पाच वर्षांनंतर एका मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. झी मराठी वाहिनीवरील या मालिकेत चिन्मयी मुख्य भूमिका साकारणार आहे.

वागळे की दुनिया फेम अभिनेत्रीचं 5 वर्षांनंतर दमदार कमबॅक; या मराठी मालिकेत साकारणार भूमिका
चिन्मयी साळवी
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 17, 2026 | 7:26 PM

‘सनई चौघडे’ मालिकेतून अभिनेत्री चिन्मयी साळवी एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. ‘शर्वरी परब’ ही तिची व्यक्तिरेखा एकदम बेधडक आणि बिनधास्त आहे. या भूमिकेबद्दल, ऑडिशन प्रक्रियेबद्दल, तयारी, सहकलाकार आणि त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल चिन्मयीने मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. “माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे शर्वरी प्रमिला सुभाष परब. शर्वरी ही प्रचंड निर्मळ, स्वच्छंद आणि आनंदी मुलगी आहे. ती कुटुंबाशी खूप जोडलेली आहे. तिचा स्वभाव म्हणजे जशास तसे एकदम स्पष्टव्यक्ती अशी ती आहे. तिला पाठीमागून बोलणं अजिबात आवडत नाही. काही घडत असेल, बरोबर किंवा चुकीचं, जे काही असेल त्यासाठी ती स्वतःचं स्पष्ट मत मांडणारी मुलगी आहे,” असं चिन्मयीने सांगितलं आहे.

भूमिकेविषयी ती पुढे म्हणाली, “शर्वरीचा तिच्या कुटुंबावर खूप जीव आहे. मालिकेमध्ये परब फॅमिली ही स्वामीभक्त आहे, स्वामींच्या कृपेने त्यांना जे काही मिळालेलं आहे, त्यात ते समाधानी आहेत. स्वामी सोबत असल्यामुळे आपल्याकडे काही गोष्टी नाहीत किंवा आपल्याकडे बऱ्याच गोष्टींची कमतरता आहे, अशा गोष्टी त्यांच्या मनात येत नाहीत. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक जण आपल्या आयुष्यात खूप खुश आहे. शर्वरी ही ग्रॅज्युएट मुलगी आहे. ती एम.डी.ची रोज क्वीन आहे आणि हा तिचा वेगळा स्वॅग आहे. ती नोकरीच्या शोधात आहे. पण नोकरी मिळेपर्यंत ती तिच्या आईला, म्हणजे पमाला, तिच्या टिफिन व्यवसायात मदत करत असते. ती आपल्या स्कूटीवरून टिफिन डिलिव्हरी करत असते. या मालिकेत शर्वरीच्या स्कूटीचं नाव ‘बेबो’ आहे. बेबोचंही शर्वरीच्या आयुष्यात एक वेगळं स्थान आहे. तसेच तिचे वडील कंडक्टर आहेत, त्यामुळे या सगळ्यांची जान शर्वरीला आहे. शर्वरीमध्ये एक भावना आहे की आपली मॅनेजमेंट स्किल्स आणि व्यवहाराची समज वापरून तिने आपल्या आई-बाबांना मदत करावी, आपल्या कुटुंबासाठी कसा हातभार लावता येईल यासाठी ती नेहमी प्रयत्न करत असते.”

“शर्वरी या व्यक्तिरेखेसाठी जेव्हा मला कॉल आला तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. ‘वागळे की दुनिया ‘ ही हिंदी मालिका तब्बल ५ वर्ष केल्यानंतर मला शर्वरीची भूमिकेसाठी कॉल आला. मराठी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली यासाठी स्वतःला खूप भाग्यवान समजते. माझी इच्छा होती की मला मराठी मालिका करायला मिळावी, ज्यामधली माझी भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहावी आणि स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली. मालिकेत शर्वरी आणि जय हे खूप विरुद्ध कॅरेक्टर असणार आहेत. जेव्हा हे दोन्ही कॅरेक्टर एकमेकांच्या समोर येतील, तेव्हा काय धुमाकूळ होणार आहे हे बघण्यासारखं असेल,” अशा शब्दांत चिन्मयी व्यक्त झाली.

शर्वरीच्या भूमिकेसाठी चिन्मयी स्कूटी चालवायला शिकली. कारण शर्वरी तिच्या आईला टिफिन व्यवसायात मदत करण्यासाठी टिफिन डिलिव्हरीसाठी स्कूटीवरून जाते. चिन्मयीला आधी स्कूटी चालवायला भीती वाटायची, पण शर्वरीची भूमिका लक्षात घेऊन ती स्कूटी शिकली आणि आता ती गर्दीतसुद्धा स्कूटी चालवू शकते, असं ती सांगते. चिन्मयीची ‘सनई चौघडे’ ही मालिका दररोज रात्री 8.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Follow Us