Ambani-Reliance Story: धीरूभाई ते मुकेश अंबानी, दूरदृष्टी, जिद्द आणि स्वप्नांचा प्रवास, रिलायन्सची दैदीप्यमान गाथा
Reliance Group Story: एका छोट्या संकल्पनेतून आणि जिद्दीच्या जोरावर आज रिलायन्सने दैदीप्यमान झेप घेतली आहे. धीरूभाई ते मुकेश अंबानी आणि आता आकाश, ईशा आणि अनंत अंबानी असा हा वारसा पुढे जात आहे.

धीरुभाई अंबानी यांच्या छोट्या संकल्पनेतून आज रिलायन्सचा वटवृक्ष झाला आहे. त्यातून धुमारे फुटून इतर अनेक उद्योग आणि क्षेत्रात या समूहाने ठसठशीत असा ठसा उमटवला आहे. धीरूभाईंच्या रोपट्याचे व्यावसायिक विस्तार करण्याचे धोरण उद्योगपती मुकेश अंबानी यांनी राबवले. त्यानंतर आकाश, ईशा आणि अनंत अंबानी या नवीन पिढीने त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी लिलया सांभाळली आहे. पेट्रोकेमिकलच नाही तर तंत्रज्ञान, रिटेल, हरित ऊर्जेपासून देशाच्या औद्योगिक आणि डिजिटल परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. व्यावसायासह वनतारा, सामाजिक कल्याण, कृत्रिम बुद्धमत्तेच्या क्षेत्रातही हा समूह मोठे योगदान देत आहे.
बदलत्या युगाचा पासवर्ड आत्मसात
1970 नंतर जग बदलत गेले. रिलायन्स समूह त्यानंतर घोडदौड करू लागला. या समूहाने बदलत्या युगाचा पासवर्ड आत्मसात केला. प्रत्येक दशकातील आव्हानं लिलया पेलली. ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि संधीचे सोने केले. लवचिकता, नाविन्य आणि भविष्यातील बदलांचा वेध घेतला. काळाच्या ओघात इतर अनेक व्यवसाय मागे पडले. पण रिलायन्स उद्योगाच्या कॅनव्हासवर ठळकपणे समोर आला. आज हा देशातीलच नाही तर जगातील अग्रगण्य उद्योग आहे.
धीरूभाईंची संकल्पना प्रत्यक्षात
धीरुभाई अंबानी यांचा जन्म 28 डिसेंबर 1933 रोजी गुजरातमधील एका गावात झाला. त्यांचे वडील शिक्षक तर आई गृहिणी होती. पाच भाऊ आणि बहिण असे त्यांचे कुटुंब होते. कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून त्यांनी लहानपणापासूनच छोटे-मोठे काम केले.दहावी परीक्षा पास झाल्यावर 1949 मध्ये ते भाऊ रमणीकलाल यांच्याकडे यमन देशात गेले. तिथे त्यांनी एका पेट्रोल पंपावर नोकरी केली. 300 रुपये महिना पगार होता. काम आणि प्रामाणिकपणा पाहून पेट्रोल पंप मालकाने त्यांना व्यवस्थापक केले. पण फार काळ या नोकरीत त्यांचे मन रमले नाही. ते देशात परतले.
खिशात 500 रुपये घेऊन ते मुंबईत दाखल झाले. नातेवाईक चंपकलाल दिमानी यांच्यासोबत त्यांनी रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन कंपनीची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून पश्चिमी देशात अद्रक, हळद आणि इतर मसाले पाठविण्याचे काम सुरु केले. येत्या काळात पॉलिस्टर कपड्यांची मागणी वाढणार हे हेरुन त्यांनी यामध्ये नशीब आजमावण्याचा विचार केला.
मसाल्यानंतर धीरुभाईंनी टेक्सटाईल इंडस्ट्रीजमध्ये नशीब आजमावले. त्यांनी पॉलिस्टर कपड्यांचे उत्पादन आणि विक्री सुरु केली. त्यांनी पहिला ब्रँड Vimal सुरु केले. 1966 मध्ये त्यांनी गुजरात राज्यात अहमदाबाद येथे एक कापड मिल सुरु केली. त्याचे नाव रिलायन्स टेक्सटाईल्स असे ठेवले. त्यांनी हळूहळू प्लास्टिक, मॅग्नम, पेट्रोकेमिकल, वीज उत्पादनात हातपाय पसरले.
मुकेश अंबानी यांनी या पायावरच रिलायन्सची बहुमजली इमारत डौलात उभी केली. व्यवसायात मोठे विचार करण्याची आणि पारंपारिक सीमा ओलंडण्याची जिद्द त्यांना धीरुभाईंकडूनच मिळाली. आज या समूहाची व्याप्ती वाढली आहे. आज आकाश, ईशा आणि अनंत अंबनी हे तत्रंज्ञान, रिटेल आणि हरित ऊर्जा यासारख्या भविष्यातील व्यवसायाचे आताच प्रतिनिधीत्व करत आहेत. बाजारपेठ दिवसागणिक बदलत आहे. त्याची नाडी ओळखत रिलायन्सने जय्यत तयारी केलेली आहे.
रिलायन्सचा प्रवास इतर उद्योग समूहांपेक्षा वेगळा ठरण्यामागे त्यांनी गरजांना तातडीने दिलेला प्रतिसाद आहे. हा प्रवास केवळ व्यावसायिक विस्तार नाही. तर नवीन संधी हेरून त्याआधारे उद्योग उभारणी, नोकरीची संधी, व्यावसायिक संधी, रोजगार आणि देशाच्या विकासात हातभार लावण्याचे धोरण आहे.
डिजिटल सेवांमध्ये विस्तार
काळानुरूप कंपनीने विविध क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक उद्योगांमध्ये कंपनीने आपले वर्चस्व स्थापन केले आहे. सध्या डिजिटल जमाना आहे. तेच हेरून भारतीयांना कनेक्टिव्हिटी आणि तंत्रज्ञानावर आधारीत व्यवसायावर रिलायन्सने भर दिला आहे. नवीन तंत्रज्ञान, ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि आर्थिक प्राधान्यक्रम हा रिलायन्सच्या विस्तारीकरणाचा पुढील टप्पा ठरला आहे. त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल सेवा, रिटेल इनोव्हेशन आणि ग्रीन एनर्जीचा समावेश आहे.
व्यावसायिकतेसोबत सामाजिक भान
रिलायन्सची महत्त्वकांक्षा केवळ व्यावसायापुरती मर्यादीत नाही. सामाजिक भानही या समूहाने जपले आहे. नीता अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्स फाऊंडेशनने देशभरात मोठे काम उभारले आहे. देशातील 54 हजार हून अधिक गावांमधील 6 कोटी 60 लाखांहून अधिक लोकांच्या आयुष्यात या समूहाने सकारात्मक बदल घडवून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे. आर्थिक विकासासोबतच सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी संसाधने पुरवली आहेत. लोककल्याणाचा वसा जपला आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताच्या विकासात डिजिटल सर्वसमावेशकतेचा वापर केला आहे. शिक्षण, व्यवसाय आणि दैनंदिन जीवनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव वेगाने वाढत आहे. त्याचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. जिओ (JIO) च्या माध्यमातून AI तंत्रज्ञान 12 भारतीय भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. यामुळे बौद्धिकत्तेवर केवळ काही लोकांची मक्तेदारी होणार नाही. सर्वसामान्यांनाही त्याचा फायदा होईल. गुजरातमध्ये अगदी छोट्या संकल्पनेपासून सुरू झालेला हा प्रवास टेलिकॉम नेटवर्क उभारण्यापर्यंत पोहचला आणि आता तो रिटेलपासून अनेक उद्योगापर्यंत विस्तारला आहे. आता डिजिटल सेवा, आर्थिक सेवांकडे , रिटेल तंत्रज्ञानाकडे हा प्रवास सुरू झालेला आहे.