कोरोनानंतर नवा हेल्थ क्रायसेस, तरुणांमध्ये 40% वाढली हिप रिप्लेसमेंट सर्जरी
देशात कोरोना काळानंतर आणखी एक संकट आले आहे. डॉक्टरांनी इशारा दिला आहे की ज्या लोकांना कोविडच्या उपचारादरम्यान जास्त स्टेरॉईड दिले गेले होते. त्यांचे माकड हाड ठिसुळ झाल्याने त्यांना हिप रिप्लेसमेंट सर्जरी करावी लागत आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे हा आजार ज्येष्ठ नागरिकांच्या ऐवजी 30 ते 40 वयोगटातील व्यक्तींना होत आहे.

कोविड साथीच्या दरम्यान ज्या रुग्णांची परिस्थिती खूपच नाजूक होती. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी त्यांना स्टेरॉईडची औषधे जास्त दिली होती. हे औषध सूज कमी करण्यासाठी खूप फायद्याचे असते आणि त्यावेळी गरजेचे देखील होते. मात्र, ज्या रुग्णांना ही औषधे जास्त काळ आणि मोठ्या प्रमाणात दिली त्यांच्यात एक साईड इफेक्ट पाहायला मिळाला आहे. या स्टेरॉईड औषधांच्या जास्त प्रमाणाने माकड हाडांचा रक्तप्रवाह बाधित होतो आणि हे नुकसान स्टेरॉईड घेतल्यानंतर काही महिन्यानंतर सुरु होते.
दिल्लीत ‘दिल्ली HIP 360 परिषद’च्या दुसऱ्या अंकाचे आयोजन झाले, ज्यात देशभरातील अस्थिरोग तज्ज्ञ एकत्र आले होते. दिल्ली ऑर्थोपेडिक एसोसिएशन आणि इंडियन आर्थ्रोप्लास्टी एसोसिएशनने एकत्र येऊन ही परिषद भरवली होती. यात डॉक्टरांनी सांगितले की कोरोनानंतर हिप रिप्लेसमेंटच्या प्रकारात वाढ झाली आहे. दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलचे डॉ. एल. तोमर यांनी सांगितले की एकट्या त्यांच्याकडे तरुण रुग्णांच्या हिप सर्जरीचे प्रमाण ४० टक्के वाढले आहे.
सर्वात मोठी अडचण काय ?
हा आजार सुरुवातीला हळूहळू वाढत जातो. रुग्णांना सुरुवातीला वाटते की कंबर वा जांघेतील स्नायूंचे साधे दुखणे आहे.त्यामुळे ते याच्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, ते जेव्हा डॉक्टरांकडे जातात. तेव्हा माकड हाड वाईट प्रकारे खराब झालेले असते. त्याला वाचवण्याचा मार्ग संपलेला असतो. पुष्पांजली मेडिकल सेंटरचे डॉ. करुण जैन यांनी सांगितले की सुरुवातीला MRI केले आणि निदान झाले तर हाडांना वाचवता येते. मात्र, उशीर झाल्यास ऑपरेशन शिवाय कोणताही मार्ग उरत नाही.
ऑपरेशन आता आधुनिक तंत्राने होते
कुल्हे बदलण्याचे ( हिप रिप्लेसमेंट सर्जरी ) ऑपरेशन आधीपेक्षा आता खूप चांगले आणि सुरक्षित झाले आहे. रोबोटिक तंत्रामुळे चांगला इम्प्लांट आणि नवीन सर्जरी पद्धतीने रुग्ण लवकर नॉर्मल होऊन सामान्य जीवन जगू शकतो. पटपडगंज येथील मॅक्स हॉस्पिटलचे डॉ. गौरव गोविल यांनी सांगितले की हे ऑपरेशन आधुनिक उपचारात सर्वात यशस्वी ऑपरेशन्स पैकी एक आहे.
पुढे काय करायचे ?
जर सर्वांना जागरुकता वाढविली नाही आणि योग्य वेळेत तपासणी केली नाही तर येत्या १० वर्षात देशात हिप सर्जरीची मागणी खूपच वाढेल असे डॉक्टरांनी म्हटले आहे. कोविडमधून बरे झाल्यानंतरही जर जांघेत किंवा माकड हाडात दुखत असेल तर लागलीच डॉक्टरांची भेट घ्या, स्टेरॉईड औषधे डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय अजिबात घेऊ नका आणि डॉक्टरांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आणि आपआपसात सहकार्य वाढवावे लागेल अशा तीन प्रकारे रुग्णांना मदत करता येईल असेही या परिषदेत डॉक्टरांनी सांगितले.