जीभेचा रंग बदलणे, वारंवार तोंड येणे, लोहाच्या कमतरतेमुळे उद्भवू शकतात या समस्या

| Updated on: Jan 18, 2023 | 11:48 AM

आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते. शरीरात त्यांची कमतरता निर्माण झाल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात.

जीभेचा रंग बदलणे, वारंवार तोंड येणे, लोहाच्या कमतरतेमुळे उद्भवू शकतात या समस्या
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – शरीराला अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची (nutrition) गरज असते. आहाराच्या माध्यमातून ही पोषक तत्वं आपल्या शरीराला मिळतात. लोह (iron) हा असाच एक घटक आहे. लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी लोह आवश्यक असते, जे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करते. लोहाच्या कमतरतेमुळे (iron deficiency) अशक्तपणा येऊ शकतो, ज्यामुळे व्यक्तीला थकवा जाणवणे, ऊर्जा कमी होणे याणि त्वचा फिकट होणे यासह विविध आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.

आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, सर्व लोकांनी अन्नामध्ये लोहयुक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे, ज्यामुळे शरीराची लोहाची गरज भागवता येईल. ज्या लोकांच्या शरीरात लोहाची कमतरता असते, त्यांना खूप अशक्तपणा येतो आणि चक्कर येते. तसेच वारंवार तोंड येणे, जिभेचा रंग बदलणे ही लक्षणे देखील लोहाची कमतरता दर्शवतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

लोहाच्या कमतरतेची लक्षणे

हे सुद्धा वाचा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लोहाच्या कमतरतेचा शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो. अशक्तपणाच्या स्थितीकडे वेळेतच लक्ष देणे फार महत्वाचे आहे, अथवा त्यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात. सर्वसाधारणपणे, लोहाची कमतरता असेल तर खूप थकवा, अशक्तपणा जाणवणे, त्वचा फिकट होणे, हृदयाचे ठोके अनियमित पडणे, हात-पाय वारंवार थंड पडणे तसेच त्वचेत बदल होणे, अशी लक्षणे दिसतात.

तोंडाद्वारेही दिसून येते लोहाची कमतरता

शरीरात लोहाच्या कमतरता असेल तर त्याची चिन्हे तोंडातही अनेक बदलांच्या आधारे दिसून येतात. लोहाच्या कमतरतेमुळे अन्नातून विचित्र चव येण्याची समस्या उद्भवू शकते. याशिवाय तोंडाला लाल भेगा पडणे, ओठ फाटणे, तोंडात वारंवार फोड, अल्सर येणे असाही त्रास होतो.

जिभेचा पांढरा रंग

तोंडाव्यतिरिक्त जिभेत दिसणाऱ्या काही बदलांच्या आधारेही शरीरात लोहाची कमतरता आहे, हे ओळखता येते. शरीरात पुरेसे लोह नसेल तर त्या व्यक्तीची जीभ सुजलेली, पिवळी दिसते, वेदनादायक असते व विचित्रपणे स्निग्ध वाटू शकते. साधारणपणे आपल्या जिभेचा रंग हलका गुलाबी असतो, तो पांढरा झाल्यास हेही लोहाच्या कमतरेचे लक्षण असू शकते. याबद्दल तज्ज्ञांचा योग्य सल्ला घ्यावा.

लोहाची कमतरता कशी पूर्ण करावी ?

आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, काही पदार्थांचा आहारात समावेश करून लोहाची रोजची गरज भागवता येते. शरीरात ऑक्सिजनचे संतुलन चांगले राहण्यासाठी पौष्टिक आहार आवश्यक आहे. मांस, मासे, पालक, दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने लोहाची गरज भागवता येते. तसेच हिरव्या पालेभाज्या आणि हिरव्या भाज्या, मनुका आणि जर्दाळू हेही लोहाचे उत्तम स्त्रोत आहेत. त्यांचे सेवन फायदेशीर ठरते.