मोठी बातमी! युद्धाला पुन्हा सुरुवात? अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला, थेट एअर डिफेन्स सिस्टम…

अमेरिका आणि इराणमध्ये जरी सध्या युद्धविराम सुरू असला तरी देखील अजूनही संघर्ष कायमच आहे. अमेरिकेकडून आता इराणवर भीषण हल्ला करण्यात आला आहे.

मोठी बातमी! युद्धाला पुन्हा सुरुवात? अमेरिकेचा इराणवर भीषण हल्ला, थेट एअर डिफेन्स सिस्टम...
अमेरिकेचा इराणवर पुन्हा हल्ला
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 01, 2026 | 5:56 PM

अमेरिका आणि इराणमध्ये जरी सध्या युद्धविराम सुरू असला तरी देखील अजूनही संघर्ष कायमच आहे. अमेरिकेकडून आता इराणवर भीषण हल्ला करण्यात आला आहे. अमेरिकेनं इराणच्या रडार ड्रोन साईट्सवर हल्ला केला आहे. यामध्ये इराणचं मोठं नुकसान झाल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. हल्ल्यात इराणचं एअर डिफेन्स सिस्टम आणि ड्रोन नष्ट केल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. परंतु दुसरीकडे मात्र इराणने अमेरिकेचा हा दावा फेटाळून लावला आहे.  तर आपण अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ला केल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिका आणि इराणमध्ये पूर्ण युद्धविराम व्हावा यासाठी चर्चा सुरू आहे. मात्र आता अमेरिकेकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे ही चर्चा फिस्कटण्याची शक्यता आहे.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी मोठं विधान केलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये अजून कोणताही करार झालेला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे इराणकडून चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, लवकरच करार देखील होईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.  मात्र आता अमेरिकेकडून इराणच्या रडार ड्रोन साईट्सवर हल्ला करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं आहे, यामुळे पुन्हा एकदा युद्ध पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इराणने अमेरिकेसोबत अणु करार करावा यासाठी वारंवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणवर दबाव निर्माण केला जात आहे.  मात्र दुसरीकडे रविवारी इराणकडून देखील अमेरिकेला धमकी देण्यात आली आहे. युद्धानंतर आम्ही आणखी कणखर बनलो आहोत. त्यामुळे अमेरिकेसमोर दोनच पर्याय आहेत, एक म्हणजे वाईट आणि दुसरा म्हणजे आधिक वाईट. अमेरिकेनं एक तर इराणचे अधिकार मान्य करावेत अन्यथा युद्धाला तयार राहावं असं इराणने म्हटलं आहे.  त्यामुळे आता अमेरिका आणि इराणमधील संघर्ष अधिक भडकण्याची शक्यता आहे. दुसरीकडे स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये देखील अमेरिका आणि इराणकडून एकमेकांच्या जहाजांवर हल्ले सुरूच आहेत.

 

 

 

Follow Us